22 C
Belgaum
April 18, 2021
तरुण भारत

कृष्णेच्या महापूर-नियोजनाचा केंद्रबिंदू

दरवषी जुलै-ऑगस्ट महिना आला की, कृष्णेच्या काठावर वास करणाऱया कर्नाटक व महाराष्ट्र राज्यातील 236 गावातील लोकांना धडकी भरते. कृष्णा नदीतून दरवषी एक कोयना धरण पाणी कर्नाटकात वाहून जाते, म्हणजे सुमारे 100 टीएमसी पाणी वाहून जाते अशी राजापूर धरणावरील प्रवाह मोजणी यंत्राने दिलेली माहिती आहे. सांगलीपासून म्हैसाळ आणि म्हैसाळपासून नरसोबावाडी आणि तेथून खिद्रापूर आणि पुढे चंदूर टेकाजवळची नदीची वळणे अशी एकूण चार वळणे साधारण 10 ते 15 कि.मी.च्या अंतरावर आहेत. तीन ठिकाणच्या वळणावर दूधगंगा-वेदगंगा आणि पंचगंगा नद्या कृष्णेला मिळतात. त्या नद्यांचे पाणी कृष्णेत मिसळल्यानंतर तेथून पुढे कृष्णेचे रौद्र रूप पहावयास मिळते. सातारा ते कर्नाटकातील अंकली ते सातारापर्यंतचा टप्पा सॅटेलाईटवरून पाहिल्यास समुद्रासारखी स्थिती निदर्शनास आलेली आहे. सांगली हे शहर मध्यावर येते. तेथूनच्या वळणामुळे (मँडेटरी कर्व्ह) प्रवाहातील पाणी तुंबून वाहते. याचे कारण म्हणजे आलमट्टी धरणाचे बॅकवॉटर आहे. 2019 च्या महापुराच्यावेळी असे निदर्शनास आले आहे, की नदीच्या पात्राबाहेर जे पाणी तुंबून राहिले त्या भागात गाळ पडला नाही. म्हणजे बॅकवॉटरच्या पाण्यामुळे प्रवाहाला गती नव्हती. स्थानिक लोकांच्या निरीक्षणावरून असे स्पष्ट दिसते, की विकासाच्या नावाखाली सांगली ते कुडचीपर्यंत जी कामे झाली, विशेषतः रस्त्यांची उंची वाढली त्यामुळे प्रवाहातील पाणी आणखी तुंबून राहिले. शिरगुप्पी ते मांजरी गावांच्या मध्य अंतरावरील रस्ता जसा फुटला तसा पाण्याचा प्रवाह अधिक गतीने वाहू लागला. अन्यथा शेजारचे येडूरवाडी, येडूर आणि चंदूर ही गावे आणखी बुडाली असती.

शिरगुप्पीजवळच्या मांजरीवाडी ते मांजरी या गावांमधील रस्त्यावर भराव अधिक झाला आहे. तशीच स्थिती मांजरी पूल ते अंकलीपर्यंत रस्त्यावर खूप मोठा भराव झाला आहे. त्यामुळे महापुरातील पाण्याचा विसर्ग हळूहळू अथवा मंद झालेला दिसतो. ज्यावेळी आलमट्टी धरणातून एक लाखापेक्षा अधिक क्मयुसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू होतो आणि नदी प्रवाहातील पाण्याचाही जोर वाढतो, त्यावेळी शिरगुप्पी ते मांजरी या गावादरम्यानच्या रस्त्यावरील भराव वाहून जाण्यास प्रारंभ होतो. भविष्यकाळात हेच केंद्र अधिक बाधित होणार आहे. अंकलीलगत भू-भागाची उंची असल्यामुळे आणि प्रवाह ईशान्य दिशेने उगारकडे जात असल्यामुळे अंकली कडेच्या भरावाला फारसा अपाय नाही. पण भविष्यकाळात तो भराव विशेषतः पुलाजवळचा भराव वाहून जाऊ शकतो. असे झाल्यास सौंदत्ती, दिग्गेवाडी गावांना त्याचा अधिक फटका बसू शकतो. यातून एकच मार्ग म्हणजे, भरावाऐवजी थेट पूल बांधून घेणे. त्यामुळे प्रवाह बिन अडथळय़ांनी पूर्वेकडे वाहात जाऊ शकतो. मांजरी पुलाच्या नदीपात्रातील संकोच अधिक असल्यामुळे प्रवाहित पाणी तुंबून राहते. ज्याचा बॅकवॉटर मागे सर्व नद्यांना मिळतो आणि अधिक भूभाग नुकसानग्रस्त होतो. ज्या बॅकवॉटरला ज्यावेळी विसर्ग मिळतो, त्यावेळी नदीकाठच्या जमिनी वेगाने प्रवाहित होऊन नदीची रुंदी वाढत राहते. भूस्खलन मोठय़ा प्रमाणात होऊ लागते. विकासाबरोबर विनाश येतोच. पण स्थानिक लोकांचा अभ्यास खूप महत्त्वाचा आहे. ते इंजिनिअर्सनी समजून घेतले पाहिजे. भविष्यातील संभाव्य गोष्टींची कल्पना आल्यास नियोजन सोपे होते.

दुसरा एक महत्त्वाचा पर्याय आहे, तो म्हणजे म्हैसाळ आणि कल्लोळ-मांजरी येथील बंधाऱयात पाणी साठविण्याची सोय आहे. त्या दोन्ही बंधाऱयांची उंची वाढविण्यास परवानगी मिळाली आहे. शिवाय कल्लोळ गावाजवळच्या येडूर येथील बंधारा खचल्यामुळे त्याच्याऐवजी कर्नाटक सरकारने मांजरी जवळच्या जुन्या पुलाला लागून बंधारा बांधण्याचे कामदेखील सुरू झाले आहे. या बंधाऱयामुळे अंकलीजवळच्या ओढय़ावाटे पाणी वर सरकू शकते. तसेच काही भूभाग सिंचनाखाली येऊ शकतो. पावसाळय़ात म्हैसाळ व मांजरी धरणामध्ये साठणाऱया पाण्याचा उपसा करून अनुक्रमे पूर्वेकडील व दक्षिणेकडील गावांना पाणी उपसा करून सिंचन क्षेत्र वाढविता येते.

म्हैसाळ गावच्या पूर्वेकडील सुमारे 150 ते 200 गावांना उपसा पद्धतीने भूगर्भामध्ये, विहिरी, तळे, तलावाद्वारे पाणी भरून घेता येते. म्हैसाळ धरणाच्या इतिहासात 2020-21 साली सर्वाधिक पाण्याचा उपसा करून जत, आटपाडी, कवठेमहांकाळ आणि जतजवळच्या 42 गावांना पाणी मिळाले. हे फक्त खरीप हंगामामध्ये होऊ शकते. त्यामुळे दुष्काळी भागातील संरक्षित सिंचन सुविधेमुळे शेती बहरू शकते. त्याच पद्धतीची भूवैज्ञानिक बाब अभ्यासून तलावाला तलाव जोडून सर्वत्र पाणी पोचविण्याची योजना महाराष्ट्र सरकारने आखावी. रब्बी हंगामामध्ये संरक्षित पाण्याचा स्रोत म्हणून म्हैसाळ धरणातून पाण्याचा उपसा केला जावा. त्यासाठी पीक-संरचना निर्धारित करून त्या पद्धतीने समन्यायी पाणीवाटप योजना आखावी. कॅनॉलवर सोलार पॅनेल्स बसवून ठिकठिकाणी सोलार पंप उभारावेत. जेणेकरून पाण्याचा पुरवठा शेतीला होऊ शकेल. प्रत्येक गावासाठी पाणी वापर संस्था स्थापन केल्या जाव्यात. अशा संस्थांचे एक फेडरेशन असावे. धरणातून पाणी व्हाल्युमेट्रिक पद्धतीने फेडरेशनमार्फत विकत घेऊन ते गावातील पाणी वापर संस्थांना दिले जावे. प्रत्येक पाणीवापर संस्थेने पाण्याच्या पुरवठय़ाचा आणि मागणीचा विचार करून पीक-संरचना निर्माण करावी. ती काटेकोरपणे पाळली जावी.

अशाच पद्धतीचे नियोजन मांजरीजवळच्या धरणाच्या माध्यमातून व्हावे. सदर धरणातून पावसाळय़ात उपसा करून कर्नाटकातील निडसोसीच्या माळापर्यंत पाणी पोहोचवावे. यामुळे दुष्काळी भागात सुमारे पाच लाख हेक्टर क्षेत्राला पाणी मिळेल. यामध्ये गडहिंग्लजकडील महाराष्ट्रातील काही गावांचा समावेश होऊ शकतो. सुमारे 250 गावांना त्याचा फायदा होईल. या दोन्ही धरणातून पाण्याचा उपसा झाल्यास पावसाळय़ातील महापुराचा धोका कमी होऊ शकतो. समुद्राला मिळणारे पाणी अडवून मानवी उपयोगासाठी त्याचा वापर होऊ शकतो. दोन्ही भागातील दुष्काळी गावे संरक्षित सिंचन योजनेमध्ये आणता येतील.

संसाधनांचे नियोजन, पर्यावरणाच्या शाश्वत विकास प्रणालीतून झाले पाहिजे. त्यामुळे विकासाची शाश्वती निर्माण होते. मिरज शहराच्या आजूबाजूला फूड पार्क, कृषी मालाचे पार्क, डेअरी इंडस्ट्री, पशुधन विद्यापीठ प्रक्रिया उद्योगाची उभारणी केली जावी. मिरजेतील फळांचे कंटेनर थेट जेएनपीटीपर्यंत गेले पाहिजेत. किसान रेल्वेचा लाभ परिसरातील लोकांनी घेतला पाहिजे. बेदाणे पार्क, हळद पार्क, डेअरी पदार्थांचे प्रसंस्करण उद्योग यांची निर्मिती केंदे कर्नाटक-महाराष्ट्राच्या सीमेवर होऊ शकतात. त्याचे व्यापक ऍग्रीबिझनेस मॉडेल बनवून औद्योगिक कॉरिडोर निर्माण करता येतो. रेल्वे आणि राष्ट्रीय मार्ग अधिक चिन्हासारखे मिरजेतून पास होतात. कृषी-उडान व्यवस्था या परिसरातून झाल्यास गूळ, हळद, बेदाणे, भाजीपाला, दुग्धपदार्थ, कोल्हापुरी चपला, निर्यात मोठय़ा प्रमाणात होऊ शकेल. यामध्ये कोणतेही राजकारण आणू नये. अन्यथा 236 गावांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होईल. विकासाची सामर्थ्ये असलेला परिसर नियोजनाअभावी ऍबॉर्टेड (वांझ) राहील, वेळीच सावध व्हावे.

डॉ. वसंतराव जुगळे 9422040684

Related Stories

आयुष्याशी घ्यावा पंगा…

Patil_p

ऐसी अनिरुद्धे पर्णिली उषा

Omkar B

हल्ली आणि आमच्या वेळी

Patil_p

महाराष्ट्राचा युपी, युपीचा महाराष्ट्र

Omkar B

प्रतापें नांदे भौमासुर

Patil_p

तळीरामांकडे लक्ष तर बळीराजाकडे दुर्लक्ष

Patil_p
error: Content is protected !!