25 C
Belgaum
April 18, 2021
तरुण भारत

रिषभ, वॉशिंग्टनची नितांत ‘सुंदर’ फलंदाजी!

दुसऱया दिवसअखेर 7 बाद 294 धावांसह भारताकडे 89 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी

अहमदाबाद / वृत्तसंस्था

यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंत (13 चौकार, 2 षटकारांसह 101) व वॉशिंग्टन सुंदर (नाबाद 60) यांच्या नितांतसुंदर फलंदाजीमुळे भारताने इंग्लंडविरुद्ध चौथ्या व शेवटच्या कसोटी सामन्यातील दुसऱया दिवशी 7 बाद 294 धावांपर्यंत जोरदार मजल गाठत उत्तम वर्चस्व प्रस्थापित केले. पहिल्या डावाअखेर आणखी 3 गडी हाताशी असताना भारतीय संघाकडे 89 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी प्राप्त झाली आहे.

सहाव्या स्थानी फलंदाजीला उतरलेल्या रिषभ पंतने 118 चेंडूंचा सामना करत 101 धावांची बहारदार खेळी साकारली तर आठव्या स्थानी उतरणाऱया वॉशिंग्टन सुंदरने देखील 117 चेंडूत 8 चौकारांसह 60 धावांची आक्रमक खेळी साकारत आपली गुणवत्ता आणखी एकदा अधोरेखित केली. शुक्रवारी दिवसाचा खेळ थांबवला गेला, त्यावेळी वॉशिंग्टन सुंदर 60 तर अक्षर पटेल 11 धावांवर नाबाद राहिले. रोहितचे (49) अर्धशतक अवघ्या एका धावेने हुकले असले तरी त्याने प्रतिस्पर्धी गोलंदाजांवर उत्तम वर्चस्व गाजवले.

इंग्लंडतर्फे जलद गोलंदाज जेम्स अँडरसनने 40 धावात 3 बळी घेत सर्वोत्तम मारा साकारला तर बेन स्टोक्स (2-73), जॅक लीच (2-66) यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले. भारतीय संघ या मालिकेत 2-1 फरकाने आघाडीवर असून जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या फायनलमधील स्थान निश्चित करण्यासाठी भारताला ही लढत ड्रॉ राखली तरी पुरेसे ठरणार आहे.

रोहितची तडफदार फलंदाजी

शुक्रवारी भारताने 1 बाद 24 या धावसंख्येवरुन डावाला पुढे सुरुवात केल्यानंतर रोहित शर्माने (144 चेंडूत 7 चौकारांसह 49) आपल्या नेहमीच्या आक्रमक शैलीत तडफदार फलंदाजी साकारली. पण, नंतर स्टोक्सच्या गोलंदाजीवर पायचीत झाल्याने त्याचे अर्धशतक अवघ्या एका धावेने हुकले. कसोटी स्पेशालिस्ट चेतेश्वर पुजाराने (66 चेंडूत 17) येथे आणखी एकदा निराशा केली. पुजाराला लीचने पायचीत पेले. कर्णधार विराट शून्यावर बाद झाल्याने भारताला आणखी एक धक्का बसला. आऊटसाईड ऑफस्टम्पवरील चेंडूवर कोहलीने यष्टीमागे फोक्सकडे सोपा झेल दिला. त्यानंतर रहाणे व रोहित या जोडीने संघाला 4 बाद 80 धावांपर्यंत नेले. आक्रमक खेळणारा रहाणे (45 चेंडूत 4 चौकारांसह 27) अँडरसनच्या गोलंदाजीवर दुसऱया स्लीपवरील स्टोक्सकडे झेल देत परतला.

रिषभची आक्रमक सुरुवात

रोहित पाचव्या गडय़ाच्या रुपाने बाद झाला, त्यावेळी भारताच्या खात्यावर जेमतेम 121 धावा असताना आणखी 84 धावांची पिछाडी होती. यावेळी क्रीझवर उतरलेल्या अश्विनने 11 धावा केल्या. तो बाद झाल्यानंतर रिषभ पंतने पुन्हा एकदा संघाच्या मदतीला धावून येत आक्रमक फटकेबाजीवर भर देताना इंग्लिश गोलंदाजांना अक्षरशः सळो की पळो करुन सोडले. इंग्लंडने दिवसभरातील पहिल्या दोन सत्रात वर्चस्व गाजवले. त्यानंतर तिसऱया सत्रात पंत व वॉशिंग्टन सुंदर यांच्या फटकेबाजीने सामन्याचा सारा नूरच बदलून टाकला.

अनुभवी जलद गोलंदाज जेम्स अँडरसनने रिषभची शतकी खेळी संपुष्टात आणली. पंतने रुटकडे झेल देत तंबूचा रस्ता धरला. तो सातव्या गडय़ाच्या रुपाने बाद झाला, त्यावेळी भारताने 84.1 षटकात 259 धावांपर्यंत मजल मारली होती. आक्रमक फलंदाजीची परंपरा कायम राखणाऱया वॉशिंग्टन सुंदर व अक्षर पटेल या जोडीने 8 व्या गडय़ासाठी 35 धावांची अभेद्य भागीदारी साकारत इंग्लंडच्या जखमेवर आणखी मीठ चोळले.

धावफलक

इंग्लंड पहिला डाव- सर्वबाद 205

भारत पहिला डाव ः शुभमन गिल पायचीत गो. अँडरसन 0 (3 चेंडू), रोहित शर्मा पायचीत गो. स्टोक्स 49 (144 चेंडूत 7 चौकार), चेतेश्वर पुजारा पायचीत गो. लीच 17 (66 चेंडूत 1 चौकार), विराट कोहली झे. फोक्स, गो. स्टोक्स 0 (8 चेंडू), अजिंक्य रहाणे झे. स्टोक्स, गो. अँडरसन 27 (45 चेंडूत 4 चौकार), रिषभ पंत झे. रुट, गो. अँडरसन 101 (118 चेंडूत 13 चौकार, 2 षटकार), रविचंद्रन अश्विन झे. पोप, गो. लीच 13 (32 चेंडूत 2 चौकार), वॉशिंग्टन सुंदर खेळत आहे 60 (117 चेंडूत 8 चौकार), अक्षर पटेल खेळत आहे 11 (34 चेंडूत 2 चौकार). अवांतर 16. एकूण 94 षटकात 7 बाद 294.

गडी बाद होण्याचा क्रम

1-0 (शुभमन, 0.3), 2-40 (पुजारा, 23.6), 3-41 (विराट, 26.4), 4-80 (रहाणे, 37.5), 5-121 (रोहित, 49.6), 6-146 (अश्विन, 58.1), 7-259 (रिषभ पंत, 84.1).

गोलंदाजी

जेम्स अँडरसन 20-11-40-3, बेन स्टोक्स 22-6-73-2, जॅक लीच 23-5-66-2, डॉम बेस 15-1-56-0, जो रुट 14-1-46-0.

तिन्ही क्रिकेट प्रकारात मिळून एकत्रित सर्वाधिक बळी

गोलंदाज / संघ /सामने / बळी / डावात सर्वोत्तम / सामन्यात सर्वोत्तम

मुथय्या मुरलीधरन / श्रीलंका / 495 / 1347 / 9-51 / 16-220

शेन वॉर्न / ऑस्ट्रेलिया / 339 / 1001 / 8-71 / 16-220

अनिल कुंबळे / भारत / 403 / 956 / 10-74 / 14-149

ग्लेन मॅकग्रा / ऑस्ट्रेलिया / 376 / 949 / 8-24 / 10-27

वासिम अक्रम / ऑस्ट्रेलिया / 460 / 916 / 7-119 / 11-110

जेम्स अँडरसन / इंग्लंड / 372 / 900 / 7-42 / 11-71

शॉन पोलॉक / द. आफ्रिका / 423 / 829 / 7-87 / 10-147.

बॉक्स

धोनीच्या त्या नकोशा विक्रमाशी विराटची बरोबरी

भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या खराब फॉर्मची परंपरा येथे शेवटच्या कसोटीतही कायम राहिली असून शुक्रवारी तो पहिल्या डावात शून्यावर बाद झालाच. शिवाय, सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणाऱया भारतीय कर्णधारांच्या यादीत धोनीशी बरोबरी करण्याची नामुष्कीही त्याच्यावर आली. धोनी कर्णधार असताना 8 वेळा शून्यावर बाद झाला असून विराटने शून्यावर बाद होण्याची देखील ही आठवी वेळ ठरली. विराट या मालिकेत शून्यावर बाद होण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी दुसऱया कसोटीत मोईन अलीने देखील विराटला भोपळा फोडण्यापूर्वीच तंबूचा रस्ता दाखवला होता.

कोटस

रिषभ पंतची स्वतःची खास फलंदाजी शैली आहे आणि तो या शैलीने आपली जबाबदारी चोख पार पाडत असेल तर संघव्यवस्थापन त्याच्या शैलीत बदलाची अपेक्षा करणार नाही. पंतसारख्या खेळाडूंना त्यांचा नैसर्गिक खेळ साकारु देणे अधिक फलद्रूप ठरते.

-भारताचा अनुभवी सलामीवीर रोहित शर्मा

जागतिक मालिकेत 1 हजार धावा जमवणारा रोहित पहिला सलामीवीर

सध्या सुरु असलेल्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिप मालिकेत रोहित शर्मा 1 हजार धावा जमवणारा पहिला सलामीवीर ठरला आहे. जागतिक मालिकेत सर्वाधिक धावा जमवणाऱया फलंदाजांच्या यादीत डेव्हिड वॉर्नर (948) व डीन एल्गार (848) अनुक्रमे दुसऱया व तिसऱया स्थानी आहेत. रोहित शर्मा उद्घाटनाच्या या कसोटी चॅम्पियनशिप मालिकेत सर्वात जलद 1 हजार धावा जमवणारा अव्वल फलंदाजही ठरला. त्याच्याशिवाय भारताच्या केवळ अजिंक्य रहाणेलाच (1008) मालिकेत 1 हजार धावांचा टप्पा सर करता आला आहे. मार्नस लाबुशाने (1675), स्टीव्ह स्मिथ (1341), जो रूट (1630), बेन स्टोक्स (1301) यांनीही हजार धावांचा टप्पा ओलांडला आहे.

Related Stories

फुटबॉल शौकिनांच्या संख्येवर निर्बंध

Patil_p

रोमांचक टायनंतर आरसीबीचा सनसनाटी विजय

Patil_p

इंग्लंड-पाकिस्तान पहिली टी-20 लढत रद्द

Patil_p

फुटबॉल प्रशिक्षक रॉबर्टसन यांचे लवकरच मायदेशी प्रयाण

Patil_p

तामिळनाडू संघाचे नेतृत्व दिनेश कार्तिककडे

Omkar B

रैनाने खरोखरच चेन्नईला ‘अनफॉलो’ केले?

Patil_p
error: Content is protected !!