क्रीडा प्रतिनिधी / मडगाव
इंज्युरी वेळेत प्रेडसन मार्शलने नोंदविलेल्या गोलामुळे चर्चिल ब्रदर्स स्पोर्ट्स क्लबने रियल काश्मीरचा 2-1 गोलानी पराभव करून आय-लीग फुटबॉल स्पर्धेतील लढतीत विजयाचे पूर्ण 3 गुण प्राप्त केले. कोलकातात विवेकानंद युवा भारती स्टेडियमवर शुक्रवारी हा सामना खेळविण्यात आला. अन्य लढतीत ट्राव आणि गोकुळम केरळने विजयाची नोंद केली. पहिल्या सत्रातील इंज्युरी वेळेत लुका माजसेनने विनील पुजारीच्या लाँग बॉलवर ताबा मिळवित प्रतिस्पर्धी गोलरक्षकाला भेदले आणि गोल केला. दुसऱया सत्रात 67 व्या मिनिटाला रिया काश्मीरने बरोबरीचा गोल केला. लूकमन आदेफेमीने प्रथम चर्चिल ब्रदर्सच्या जोसेफ क्लेमेंतला व नंतर गोलरक्षक शिल्टन पॉलला भेदले व चेंडू जाळीत टोलविला. चर्चिल ब्रदर्सच्या प्रेडसन मार्शलने इंज्युरी वेळीतील चौथ्या मिनिटाला लांब पल्ल्यावरून फटका हाणला आणि विजयी गोल केला. या विजयाने चर्चिल ब्रदर्स स्पोर्ट्स क्लबला 3 गुण प्राप्त झाले. त्यांचे आता 11 सामन्यांतून 25 तर रियल काश्मीरचे 11 सामन्यांतून 17 गुण झाले आहेत. दुसऱया सामन्यात ट्राव संघाने मोठा विजय संपादन करताना मोहम्मेडन स्पोर्टिंग क्लबला 4-0 गोलानी पराभूत केले. ट्रावसाठी बिद्यासागर सिंगने शानदार हॅट्ट्रिकची नोंद केली तर एक गोल कोन्साम फाल्गुनी सिंगने केला. विजयाच्या तीन गुणांनी ट्रावचे आता 11 सामन्यांतून 19 तर मोहम्मेडन स्पोर्टिंगचे 16 गुण झाले आहेत. प्रकाशझोतात खेळविण्यात आलेल्या सामन्यात गोकुळम केरळने डॅनी अँटवीने केलेल्या एकमेव गोलने पंजाब एफसीला पराभूत केले. या विजयाने गोकुळमला 3 गुण प्राप्त झाले.