प्रतिनिधी / शिरोडा
बोरी पंचायत क्षेत्रासाठी नियोजित केलेला किनारी विभाग व्यावस्थापन आरखाडा सदोष असून त्यात नागरिकांनी सूचविलेल्या हरकतींचा कुठलाच विचार झालेला नाही. नियोजित आराखडा अंमलात आल्यास अनेक लोकांची घरे, पारंपरिक मत्स्य उत्पादन व्यावसाय व खाजन शेती धोक्यात येणार आहे, असे आक्षेप घेत या संभाव्य आरखडय़ाला बोरी ग्रामस्थांकडून विरोध करण्यात आला.
नागरिकांच्या सूचना व हरकती ग्राह धरुन त्यानुसार आरखाडा तयार करा अन्यथा तो पूर्ण रद्द करा अशी मागणी नुकत्याच झालेल्या विशेष ग्रामसभेत करण्यात आली. संभाव्य किनारी विभाग व्यावस्थापन आराखडय़ावर चर्चा करण्यासाठी बोरी पंचायतीची खास ग्रामसभा गुरुवारी सकाळी बोरी पंचायत सभागृहात बोलावण्यात आली होती. स्थानिक नागरिक डेविड रॉड्रिगिस व त्यांच्या सहकाऱयांनी ग्रामस्थांसमोर संभाव्य आरखडा सादर केला. या आरखडय़ात बोरी पंचायत क्षेत्रातील जुवारी नदीच्या काठावर असलेल्या काही जागा बंदराच्या हद्दी म्हणून दाखविण्यात आलेल्या आहेत. याठिकाणी जेटी उभारुन कोळसा वाहतूक करण्याचा विचार असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला. आरखडा सन 2011 सालचा असून त्यात 1991 पर्यंत बांधण्यात आलेले घरे दाखविण्यात आली आहेत. तसे झाल्यास त्यानंतर बांधण्यात आलेली घरे धोक्यात येणार असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या आरखडय़ात सुधारण करुन आत्तापर्यंत अस्थित्त्वात असलेली सर्व घरे नोंद करण्याची मागणी करण्यात आली.
गोव्यातील पारंपरिक मत्स्य व्यवसायाला या आरखडय़ानुसार संरक्षण मिळाले पाहिजे. शिवाय त्यातून वगळण्यात आलेली खाजन शेतीही समाविष्ट करण्यात यावी. सन 2019 साली झालेली ग्रामसभा व जनसुनावणीच्यावेळी ग्रामस्थांनी नियोजित आरखडय़ात आपल्या अनेक सूचना व हरकती मांडल्या होत्या. सुधारीत आरखडय़ात त्यात समाविष्ट केलेल्या नाहीत. आखडय़ात बदल न केल्यास येत्या जनसुनावणीत आरखडय़ाला जोरदार विरोध करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला. सरपंच ज्योती नाईक यांनी सदर आराखडय़ाला ग्रामस्थांचा विरोध असल्यास पंचायत ग्रामस्थांसोबत राहणार असून स्थानिकांचे म्हणणे सरकारपर्यंत पोचविणार असल्याचे सांगितले.