तरुण भारत

कुड्डेगाळ येथील परिस्थिती दुसऱया दिवशीही तणावग्रस्त

फोमेन्तो खाण कंपनीच्या मालवाहतुकीला कामगारांचा विरोध कायम, पोलीस बंदोबस्तात मालवाहतूक

प्रतिनिधी / कुडचडे

कुड्डेगाळ, दाभाळ येथील फोमेन्तो खाण कंपनीच्या मालवाहतुकीला विरोध करणाऱया ज्या कामगारांना गुरुवारी सकाळी 8 वा. पोलीस आपल्या ताब्यात घेऊन गेले होते त्या कामगारांना शुक्रवारी पहाटे 4.30 वा. कुड्डेगाळ खाणीच्या गेटवर आणून सोडले गेले. याबद्दल सदर कामगारांच्या कुटुंबियांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला असून सरकारचा निषेध करण्यात आला आहे. कुड्डेगाळ येथील सदर ठिकाणी स्थिती शुक्रवारीही तणावग्रस्त झाल्यामुळे दोनशेहून जास्त पोलिसांच्या उपस्थितीत दुपारी 12 च्या सुमारास मालवाहतूक सुरू करण्यात आली. दरम्यान, सदर परिस्थितीची माहिती मुख्यमंत्र्यांजवळ पोहोचताच आंदोलक कामगारांपैकी पाच जणांना चर्चा करण्यासाठी बोलाविण्यात आले असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.

यावेळी उपस्थित नरेश शिगावकर, नीलेश वेळीप, नीलेश नाईक, आशेंद तसेच दया यांनी कामगाराची ही स्थिती कशामुळे झाली आहे त्याची माहिती दिली तसेच याला जबाबदार फक्त भाजप सरकार असल्याची टीका केली. कायदा हा सर्वांसाठी समान ठेवला असता, तर अशी पाळी कामगारांवर आली नसती. अडचणीत असलेल्या कामगारांना सहकार्य करणार असे लोकप्रतिनिधी सांगतात व दुसऱया बाजूने आपली तिजोरी भरण्यासाठी लपाछपीचा खेळ खेळतात. या ठिकाणी स्वतः येऊन कामगारांशी चर्चा करण्याची गरज असताना पोलीस यंत्रणेचा वापर करून सरकारात मंत्री असलेले सावर्डेचे आमदार आपल्या बंधूना घेऊन हे कारस्थान करत आहेत, असा आरोप नीलेश वेळीप यांनी केला. जे कामगारांच्या पोटावर पाय देऊन आपली तिजोरी भरण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना याचे उत्तर देवच देणार, असे उद्गार त्यांनी काढले.

कामगारांना रस्त्यावर ठेऊन स्वप्ने पूर्ण करणार ?

कामगारांची बाजू घेणारेच संगनमत करून आपली तिजोरी भरण्याचे योजत आहेत. त्याला सामान्य कामगार काही करू शकत नाही. तरी कामगारांजवळ एकच आंदोलनाचा मार्ग राहिला आहे. तोही पत्करल्यास सध्या अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत. एका बाजूला पंतप्रधान आत्मनिर्भर भारतचे स्वप्न पाहत आहेत तसेच गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत स्वयंपूर्ण गोवा करण्याची भाषा बोलत आहेत. कामगारांना रस्त्यावर ठेऊन ही स्वप्ने पूर्ण करण्याचे सरकारने योजले असेल, तर तसे ते जनतेला सांगावे, अशी प्रतिक्रिया येथे उपस्थित असलेल्या महिलांनी व्यक्त केली.

कामगारांचा प्रश्न आधी सोडवा : गावकर

कंपनीकडून कोणत्याही कामगाराला घरी पाठविण्यात आले असेल, तर जेव्हा कंपनीत काम सुरू होते तेव्हा सर्वांत आधी जुन्या कामगाराला कामावर रूजू करून घेण्याचा कायदा आहे. उपस्थित जिल्हाधिकारी, मामलेदार, पोलीस अधिकारी यांना कायद्याची जास्त माहिती आहे. त्यांनी त्याप्रमाणे अंमलबजावणी करायला लावावी, अशी मागणी गोवा मायनिंग पिपल्स प्रंटच्या पुती गावकर यांनी केली. आज कामगारांमुळे खाण व्यवसाय बंद पडलेला नसून कायद्याचे उल्लंघन केल्यामुळे तो बंद पडलेला आहे. आज सरकार कामगारांना सहकार्य न करता कंत्राटी पद्धतीवर मालवाहतूक करण्याचा प्रयत्न करत आहे. हे चुकीचे असून कंपनीच्या कामगारांचा प्रश्न अगोदर सोडवावा व नंतरच मालवाहतूक करण्यावर भर द्यावा, असे मत गावकर यांनी व्यक्त केले. कुड्डेगाळ फोमेंतो खाण कंपनी कामगारांच्या या आंदोलनाला पूर्ण समर्थन असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Related Stories

दिवगाळी नार्वे येथे गव्याची गोळी झाडून हत्या

Omkar B

चरावणे,हिवरे,गोळावली,रिवे गावात अस्वलांचा वावर वाढला

Omkar B

खाण प्रश्नावरील फेरविचार याचिकेवर आज सुनावणी

Patil_p

राज्यपाल मलिक यांची बदली योग्य जागी

Omkar B

राज्यात सनबर्न पार्टी उधळून लावणार

Patil_p

वीज खांबावरून पडून कर्मचाऱयाचा मृत्यू

Omkar B
error: Content is protected !!