म्हापसा, मडगांव, मुरगांव, केपे, सांगेसाठी पहिल्याच दिवशी तब्बल 193 अर्ज : आज उमेदवारीचा शेवटचा दिवस अजूनही संख्या वाढण्याची शक्यता
प्रतिनिधी / पणजी


म्हापसा, मडगांव, मुरगांव, केपे व सांगे या 5 पालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याकरीता काल शुक्रवारी पहिल्याच दिवशी मोठी भाऊ गर्दी झाली. एकाच दिवशी वरील 5 पालिकांसाठी मिळून एकूण तब्बल 193 अर्ज सादर झाले. आज शनिवार दि. 6 मार्च रोजी वरील 5 पालिकांसाठी अर्ज भर भरण्याचा शेवटचा दिवस असून सर्व अर्जांची संख्या 250 पर्यंत जाण्याची शक्यता दिसून येत आहे.
वरील 5 पालिकांसाठी काल सादर झालेल्या उमेदवारी अर्जांची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. म्हापसा – 26, मडगांव – 38, केपे – 42, सांगे – 20, मुरगांव – 67.
महापालिकेसाठी 106 जणांचे अर्ज वैध
पणजी महापालिका निवडणुकीसाठी 106 जणांचे अर्ज वैध ठरले असून सर्व 6 पालिका, सांखळी पालिकेच्या वॉर्ड नं. 9, पंचायतींचे 22 वॉर्ड, नावेली जिल्हा पंचायत अशा सर्वांचे मिळून एकूण 505 उमेदवारांचे अर्ज छाननीत पात्र ठरले आहेत.
सहा पालिकांचा आज अर्ज मागे घेण्याचा दिवस
पणजी मनपा व सहा पालिकांचा आज शनिवारी अर्ज मागे घेण्याचा दिवस असून सायंकाळपर्यंत अंतिम उमेदवारांची यादी निश्चित होणार आहे. त्यानंतरच प्रत्येक वॉर्डात किती रंगी निवडणूक होणार हे कळणार आहे. काहीजण अर्ज मागे घेणार असल्यामुळे उमेदवारांची संख्या आणखी कमी होण्याची शक्यता आहे.
विविध पालिकांसाठी पात्र उमेदवारांची आकडेवारी पुढीलप्रमाणे ः डिचोली – 76, वाळपई – 34, पेडणे – 45, कुंकळ्ळी – 67, कुडचडे – 59, काणकोण – 42. प्रत्येक पालिका वॉर्डात साधारपणे 2 ते 4 उमेदवारांचे अर्ज आहेत.
साखळी प्रभाग 9 साठी 3 अर्ज ग्राहय़
सांखळी पालिकेच्या क्र. 9 वॉर्ड पोटनिवडणुकीसाठी 3 जणांचे अर्ज पात्र ठरले आहेत तर पंचायतीच्या एकूण 22 वार्डासाठी 66 उमेदवारांचे अर्ज मान्य झाले आहेत. नावेली जिल्हा पंचायत पोटनिवडणुकीसाठी 7 जणांचे अर्ज ग्राह्य झाले असून प्रत्येक उमेदवाराचा एकच अर्ज मान्य करुन इतर जादा अर्ज फेटाळण्यात आले आहेत.
मुरगावात एकच दिवशी तब्बल 68 अर्ज
मुरगाव पालिका निवडणुकीसाठी काल गुरूवारी दुपारी 1 वा. पर्यंत 68 उमेदवारी अर्ज दाखल झाले. यापूर्वी तारा केरकर, पुष्पा ओमप्रकाश यादव व सय्यद अकिफ हुसेन या तिघा उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यामुळे आतापर्यंत मुरगाव पालिका क्षेत्रातील विविध प्रभागांसाठी एकूण 73 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. काल गुरूवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुक उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांची गर्दी पडली होती. दुपारपर्यंत प्रस्थापित तसेच नवोदीत अशा एकूण 68 इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. आतापर्यंत दाखल झालेल्या 73 उमेदवारी अर्जांमध्ये 14 माजी नगरसेवकांचा समावेश आहे.
म्हापशात 20 प्रभागांसाठी 26 जणांची उमेदवारी
म्हापसा नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आज पहिल्या दिवशी 20 वॉर्डासाठी एकूण 26 जणांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. न्यायालयाच्या आदेशानुसार म्हापशाची निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती, मात्र ऐनवेळी निवडणुकांच्या स्थगितीला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिल्याने आता ही निवडणूक 21 मार्चला होणार आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज सादर करण्याची 6 मार्च रोजी अंतिम तारीख असल्याने शनिवार दि. 6 मार्च रोजी म्हापशात उमेदवारी अर्ज दाखल करण्यास झुंबड पडणार आहे. शुक्रवारी पहिल्या दिवशी एकूण 26 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले असून त्यात माजी नगराध्यक्ष सुधीर कांदोळकर, उपनगराध्यक्ष मर्लीन डिसौजा, माजी नगरसेविका स्नेहा भोबे, माजी उपनगराध्यक्ष विजेता नाईक, माजी नगरसेवक विश्वास साळगावकर, माजी उपनगराध्यक्ष प्रकाश भिवशेट, माजी नगरसेवक दीपक म्हाडेश्री यांचा समावेश आहे.