कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डॉ. अश्वथ नारायण यांची माहिती : करवीर निवासिनी अंबाबाईचे घेतले दर्शन
प्रतिनिधी / कोल्हापूर
देशात महाराष्ट्र, तामिळनाडू राज्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. त्यामुळे कोरोना प्रतिबंधासाठी कर्नाटकच्या सीमेवर स्बॅब तपासणी सुरू आहे. साथ नियंत्रणात आल्यानंतर हे नियम शिथिल केले जातील, अशी ग्वाही कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डॉ. अश्वथ नारायण यांनी दिली.
कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डॉ. अश्वथ नारायण यांनी शुक्रवारी सकाळी शिर्डी येथील साईबाबा मंदिराला भेट दिली. दुपारी ते कोल्हापुरात आले. त्यांनी करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराला भेट देऊन अंबाबाईचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासमवेत कन्नड अभिनेता सुपरस्टार राजकुमार यांचे सुपुत्र पुनीत राजकुमार, डॉ. विजय व्हरांबळे, संतोष आनंददास व भाविक वेणू गोपाल उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री डॉ. नारायण यांनी अंबाबाईचे दर्शन घेतले. त्यानंतर मातृलिंग मंदिर, महाकाली आणि सरस्वतीदेवीचे दर्शन घेतले. मंदिर प्रदक्षिणा केल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
उपमुख्यमंत्री डॉ. नारायण म्हणाले, आपण अंबाबाईचे भक्त आहोत. त्यामुळे या जगन्मातेचा आशीर्वाद सर्वांवर असावा, कोरोनापासून तिने सर्वांचे रक्षण करावे, असे साकडे घातल्याचे सांगितले.