प्रतिनिधी / कोल्हापूर
महापालिकेच्या निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीवर प्रचंड आक्षेप आणि हरकती दाखल झाल्या होत्या. त्यानंतर महापालिका प्रशासनाने अंतिम मतदार यादी तयार करताना अहोरात्र परिश्रम घेतले आहेत. अंतिम यादी अचूक व्हावी यासाठी संपूर्ण यंत्रणा गेले काही दिवस कार्यरत आहे. सर्व अधिकारी, कर्मचारी प्रत्येक विभागीय कार्यालयात ठाण मांडून बसले असून प्रभाग निहाय दुरूस्त करण्यात आलेली मतदार यादी अचूक आहे काय? त्यामध्ये काही उणीवा तर राहिलेल्या नाहीत ना? याची तपासणी करत आहेत. दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाने अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यास मुदतवाढ दिली आहे. त्याचा लाभ घेत यादी जास्तीत जास्त अचूक करण्याचे महापालिकेचे प्रयत्न आहे. यादीचे काम जवळपासून पूर्ण झाले असून सोमवारनंतर राज्य निवडणूक आयोगाकडे अहवाल पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर येणाऱ्या आदेशानुसार मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
शुक्रवारी दिवसभर प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी ताराबाई पार्क येथील महापालिकेच्या निवडणूक कार्यालयात ठाण मांडून उपायुक्त, सहाय्यक आयुक्तांसह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून मतदार याद्यांच्या दुरूस्ती संदर्भातील सर्व माहिती घेतली. तसेच सूचनाही केल्या. प्रभाग निहाय तयार केलेल्या याद्या विशेष प्रभाग समिती, पदनिर्देशित अधिकारी आणि नियंत्रण अधिकारी यांनी तपासली आहे काय? याचाही आढावा प्रशासक डॉ. बलकवडे यांनी घेतला.
यावेळी उपायुक्त निखिल मोरे, उपायुक्त रविकांत आडसूळ, उपायुक्त शिल्पा दरेकर यांच्यासह सहाय्यक आयुक्त विनायक औंधकर, सहाय्यक आयुक्त संदीप घारे, निवडणूक नगरसचिव सुनील बिद्रे, अधिकारी कार्यालयातील विजय वणकुद्रे, विभागीय कार्यालयातील उपशहर अभियंता उपस्थित होते. शहराची संपूर्ण माहिती असणाऱया शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनाही प्रशासकांनी बोलविले होते. त्यांच्याकडूनही सूचना घेण्यात आल्या.