तरुण भारत

धनंजय महाडिकांचे आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा; सतेज पाटील यांच्यावरील टीकेला देशमुखांचे प्रत्युत्तर

काँग्रेसचे माजी गटनेते शारंगधर देशमुख यांचे प्रत्युत्तर

सयाजी, डीवायपी मॉल, ड्रीमवर्ल्डचा घरफाळा नियमानुसारच भरल्याची स्पष्टोक्ती

प्रतिनिधी / कोल्हापूर

ताराबाई पार्कमधील कृष्णा सेलिब्रिटी या इमारतीतील पार्कींगच्या जागेत गाळे पाडून त्याची विक्री केली. आदर्श भीमा वस्त्रमचे पार्कीगमध्ये गोडावून उभारुन त्याचा वापर स्वतःच्या व्यवसायासाठी करणाऱ्या माजी खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापूर महानगरपालिकेची घोर फसवणूक केली आहे. भिमा सहकारी साखर कारखान्यातील कामगारांना पगार न देता देशोधडीला लावण्याचे कामही त्यांनी केले आहे. अनेक बेकायदेशीर गोष्टी करणाऱया दलबदलू महाडिक यांचे आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत. सध्या त्यांच्याकडे कोणताही ठोस मुद्दा नसल्याने ते पालकमंत्री सतेज पाटील यांच्यावर वैयक्तिक आरोप करत आहेत, अशा शब्दात काँग्रेस माजी गटनेते शारंगधर देशमुख यांनी महाडिक यांच्या आरोपांवर टीकास्त्र सोडले आहे.

खासदार असताना महाडिक यांनी कोल्हापूर महापालिकेला एक रूपयांचा निधी दिला नाही. मात्र आता ते उपोषण करण्याच्या निमित्ताने जर महापालिकेत येणार असतील तर त्यांचे स्वागत आहे, असा टोलाही देशमुख यांनी लगावला. देशमुख यांनी पत्रकार परिषदेत महाडिक यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांच्यावर घरफाळाविषयक केलेले सर्व आरोप फेटाळून लावले.

देशमुख म्हणाले, सयाजी, डीवायपी मॉल, ड्रीमवर्ल्ड वॉटर पार्क संदर्भात माजी खासदार धनंजय महाडिक यांनी केलेले आरोप चुकीचे आहेत. यासर्व मिळकतींचा महापालिकेच्या मागणी पत्रानुसार घरफाळा भरला आहे. डीवायपी मॉलमधील गाळ्यांमध्ये असणाऱ्या सर्व भाडेकरुंची माहिती रितसर महापालिकेला देण्यात आली आहे. त्यानुसार घरफाळा हि भरला आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर बोलण्यासाठी कोणताही मुद्दा नसल्याने ते जुनेचे विषय पुन्हा उकरुन काढत आहेत. चुकीची माहिती सांगत ते जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी वैयक्तीक टिका न करता विकासकामांवर बोलावे असे प्रत्युत्तर देशमुख यांनी केले.

भीमा कारखान्यासमोर काँग्रेस उपोषण करणार

माजी खासदार महाडिक यांनी महापालिकेसमोर उपोषणाचा इशारा दिला आहे. मात्र ते चेअरमन असलेल्या पंढरपुर येथील भीमा कारखान्याने चालू हंगामातील जानेवारी व फेब्रुवारीचे उस बिले दिलेली नाहीत, कामगारांचा 21 महिन्यांचा पगार थकवला आहे. 20 महिन्यांचा प्रॉव्हिडंट फंड भरलेला नाही, निवृत्त कर्मचाऱयांचे 7 कोटी देणे आहे. सन 2017-18चे 80 लाखांचे वाहतूक बिल दिलेले नाही हि सर्व देणी त्यांनी पुढील आठ दिवसात द्यावीत, अन्याथ तेथील काँग्रेसचे कार्यकर्ते कारखान्याच्या दारात उपोषण करतील, असेही देशमुख यांनी सांगितले.

कोल्हापूरच्या विकासासाठी काय केले

सयाजी हॉटेलमुळे कोल्हापुरच्या वैभवात भर पडली. तसेच पाटील कुटुंबियांनी शैक्षणिक संस्था, हॉटेल, हॉस्पिटलच्या माध्यमातून शहराच्या विकासात योगदान दिले. 5 हजारहून अधिक कुटुंबांना रोजगार दिला. मात्र महाडिक यांनी कोल्हापुरच्या विकासासाठी काय केले. एक शिक्षण संस्था सुरु केली मात्र ती ही फार काळा चालवता आली नाही. राजाराम कारखाना, गोकुळमध्ये वाहतूक ठेक्याच्या निमित्ताने घुसखोरी करत या संस्था गिळंकृत केल्या. कोल्हापुरात कारखाना न उभारता त्यांनी कर्नाटकमध्ये कारखाना उभारला. कोल्हापुरच्या विकासात त्यांचे योगदान काय हे ही महाडिक यांनी स्पष्ट करावे, असे आवाहन देशमुख यांनी केले.

Related Stories

निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार अंतिम मतदार यादी होणार जाहीर

triratna

कोडोली सरपंचपदी शंकर पाटीलांची बिनविरोध निवड

triratna

कोल्हापूर : वारणेची एफआरपी २९५१ रुपये जाहिर : आ. विनय कोरे

triratna

जागेच्या वादातून झालेल्या मारहाणीतील जखमीचा मृत्यू

triratna

पिंपळगावमधील बाजारपेठ, दुकाने सुरू करण्याची मागणी

triratna

पिंपळगावमध्ये माऊली गिफ्ट शॉपीस आग – सुमारे एक लाखाचे नुकसान

triratna
error: Content is protected !!