तरुण भारत

कोरोना साहित्य खरेदीबाबत जि.प.ची बदनामी नको – मंत्री मुश्रीफ

जि.प.पदाधिकारी अथवा सदस्यांचा कोणताही संबंध नाही

प्रतिनिधी / कोल्हापूर

Advertisements

कोरोना काळात औषध व साहित्य खरेदीबाबत गेले काही दिवस जिल्हा परिषदेवर विनाकारण आरोप केले जात असून बदनाम केले जात आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीने ही खरेदी केली आहे. या प्रक्रियेत जिल्हा परिषदेतील पदाधिकारी अथवा सदस्यांचा कोणताही संबंध नसून सभागृहाची बदनामी थांबवावी असे आवाहन ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी शासकीय विश्रामगृहामध्ये पत्रकारांशी बोलताना केले.

कोरोना काळातील साहित्य खरेदीत घोटाळा झाल्याची जिल्हाभर चर्चा सुरू आहे. यातून जिल्हा परिषदेची बदनामी होत आहे. याबाबत मंत्री मुश्रीफ यांना विचारले असता ते म्हणाले, जगातील 210 राष्ट्रांमध्ये आलेली कोरोनाची आपत्ती आपल्या देशातही आली. महामारीचे हे संकट सर्व शासकीय यंत्रणेसाठी नवीन होते. कोरोनाचा सामना कसा करायचा याबद्दल सर्वांच्या मनामध्ये संभ्रम होता. या काळात उपचारासाठी कोणीही पुढे येत नव्हते.

सर्व खासगी हॉस्पिटल्स बंद असताना केवळ सरकारी रुग्णालयांनी कोरोनाबाधितांवर उपचार केले. शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही अतिशय धाडसाने चांगले काम केले. रुग्णांना चांगल्या सुविधा देऊन संसर्ग रोखण्याचा प्रयत्न केला. कोरोना उपचारासाठी आवश्यक त्या साहित्याची खरेदी करण्यासाठी शासनाकडून जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद सीईओ, जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकाऱयांची एक समिती नियुक्त केली. या समितीनेच सर्व खरेदी प्रक्रिया राबवली आहे.

मुश्रीफ म्हणाले, जिल्हा नियोजन, आमदार फंडासह केंद्रसरकारकडून त्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली. या निधीतून रुग्णांसाठी तत्काळ सर्व आवश्यक सोयी-सुविधा पुरविण्यात आल्या. जिल्हा परिषदेकडून तब्बल 47 हजार रेमडिसिवीर इंजेक्शनचे मोफत वाटप करण्यात आले. यासाठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च झाला. त्यामुळे भ्रष्टाचाराच्या आरोपात कितपत तथ्य आहे याची शासनाच्या आरोग्य विभागाकडून चौकशी होईल. त्यामुळे या काळात झालेली खरेदी आणि तथाकथीत भ्रष्टाचाराशी जिल्हा परिषदेचा कोणताही संबंध नाही. खरेदीच्या ऑडिट रिपोर्टवर चर्चा सुरू आहे. लेखापरिक्षणात आलेल्या त्रुटीबाबत चर्चा व चौकशी होऊ शकते. मात्र कोल्हापूर जिल्हा परिषदेला बदनाम करण्याची आवश्यकता नाही. याबाबत शासनाच्या आरोग्य विभागाकडून चौकशी होईल आणि दोषींवर कारवाई केली जाईल असेही मुश्रीफ यांनी सांगितले.

माजी खासदार महाडिकांनी पालकमंत्र्यांवर केलेले आरोप अनाकलनीय

पालकमंत्री सतेज पाटील यांनी सयाजी हॉटेल आणि डी.वाय.पी. मॉलची चुकीची माहिती प्रशासनाला देत 15 घोटींचा घरफाळा बुडवल्याचा आरोप माजी खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकार बैठकीत केला आहे. त्यांच्या आरोपाला योग्य ते उत्तर देण्यासाठी पालकमंत्री पाटील समर्थ आहेत. पण हा आरोप त्यांनी आताच का केला ? त्याचे औचित्य काय आहे ? हे मात्र अनाकलनीय असल्याचे ग्रामविकासमंत्री मुश्रीफ यांनी स्पष्ट केले. महानगरपालिकेची आगामी निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावरच लढवणार असल्याचेही मुश्रीफ यांनी सांगितले.

Related Stories

कबनूरात दोन महिलांना कोरोना लागण एक मृत्यू

triratna

सीपीआरचे 8 कोटी पाणीबिल वसूल करायचे कसे?

triratna

कोल्हापूर : गगनबावडा तालुक्‍यातील १४ ग्रामपंचायतीत महिलाराज

triratna

लॉकडाऊन : कर्मचाऱ्यांना लागली पगाराची ओढ

triratna

कोल्हापूर : शेतकऱ्यांच्याकडून लिहून घेण्यात येणारे हमीपत्र त्वरित थांबवावे

triratna

कोल्हापूर : कोरोनामुळे जिल्हा बँकेला दोन हजार कोटींचा फटका

triratna
error: Content is protected !!