तरुण भारत

बंगाली खेला

बंगाल निवडणुकीत आता गहिरे रंग भरू लागले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रिगेड मैदानात घेतलेली विशाल जनसभा आणि त्यामध्ये गेल्या पिढीतील गाजलेला अभिनेता मिथुन चक्रवर्ती याने तृणमूल काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये केलेला प्रवेश चर्चेला आला आहे. पंतप्रधानांची सभा सुरू असतानाच सिलिगुडीमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शक्तिप्रदर्शन करून पंतप्रधान जनतेला खोटी आश्वासने देत आहेत आणि बंगालमध्ये पुन्हा तृणमूल काँग्रेस विजयी होईल असा आत्मविश्वास व्यक्त केला आहे. ममतादीदींना भाच्याच्या पलीकडे आता काही दिसत नाही. त्याला सत्तेवर आणण्यासाठी त्यांची सगळी धडपड सुरू आहे. ‘मां, माटी माणूष’ या तीन घटकांचा उल्लेख करत त्या सत्तेवर आल्या आणि गेल्या दहा वर्षात त्यांनी याच घटकांचा विश्वासघात केला अशी टीका पंतप्रधान मोदी यांनी केली आहे. बंगालची जनता आता ममता बॅनर्जी यांच्यावर नाराज झाली आहे. यावेळी ही जनता सत्तांतर करून भाजपच्या हातात राज्य सोपवेल असा ठाम विश्वास व्यक्त केला आहे. 1978 सालापासून डाव्या पक्षांनी आणि त्यानंतर दहा वर्षे ममता बॅनर्जी यांनी बंगालची दुर्दशा केली आहे. आता या राज्याला झपाटय़ाने विकास हवा आहे आणि तो देण्याची क्षमता केवळ भाजपमध्ये आहे, असे मत व्यक्त करत मोदी यांनी बंगाल निवडणुकीत प्रत्यक्ष उडी घेतली आहे. त्यांच्या किमान वीस सभा होतील असे सांगितले जात आहे. लोकसभेच्या 18 जागा जिंकल्याने भाजपचा उत्साह यापूर्वीच दुणावला आहे. यावेळी आपण सत्तेवर येऊ असा विश्वास मोदी आणि अमित शहा या दोघांनीही आतापर्यंत व्यक्त केला आहे. तर यापूर्वीच्या एका सभेमध्ये ममता बॅनर्जी यांनी भाजपने दहाचा आकडा पार करून दाखवावा असे आव्हान दिले आहे. गेली दहा वर्षे ममता यांच्या पक्षाविरोधात लढून हतबल झालेले डावे पक्ष आणि त्यांचा पाठीराखा वर्ग यावेळी ममतांना जबरदस्त आव्हान देणाऱया भाजपच्या मागे आपली शक्ती उभी करेल असे अंदाज वर्तवले जात आहेत. म्हणजे डाव्या मतांचा बंगालचा मतदार ममता विरोधात जाण्यासाठी थेट उजव्या विचाराच्या भाजपला मतदान करेल अशी शक्मयता वर्तवली जाणेही आश्चर्य करायला लावणारेच. देशात कोणतीही परिस्थिती असली तरी बंगालमध्ये डावेच हे समीकरण गेल्या तीन निवडणुकांत बदलत आले आहे. लोकसभेच्या वेळी ममता यांना शक्ती देऊन बंगाली जनतेने हे नवे नेतृत्व उभे केले. अटलबिहारी वाजपेयी यांच्या अल्पमतातील सरकारला पाठिंबा देण्याच्या बदल्यात ममता यांनी राष्ट्रीय राजकारणात आपले स्वतःचे स्थान निर्माण केले. तत्पूर्वी काँग्रेस नेतृत्वाबरोबर झालेल्या संघर्षात त्यांनी आपली स्वतःची प्रतिमा जपली आणि त्याच प्रतिमेच्या जोरावर बंगाली नागरिकांना आपल्या बाजूने खेचून दाखवले. प्रसंगी उद्योगपती टाटांच्या विरोधात भूमिका घेऊन त्यांनी एक चमत्कार घडवून दाखवला. मात्र एकदा सत्तेची चव लागली की पक्ष आणि कार्यकर्त्यांमध्ये जी हितसंबंधांना जपण्याची प्रवृत्ती बळावू लागते, त्याचा फटका सध्या तृणमूल काँग्रेसला बसत आहे. वेगवेगळय़ा घोटाळय़ांमध्ये पक्षातील नेत्यांची आलेली नावे त्याचा प्रत्यक्षापेक्षा अधिक भाजपने पिटलेला ढोल आणि त्या निमित्ताने ममता बॅनर्जी यांच्या प्रतिमेला बसलेला धक्का यामुळे या निवडणुकीत बंगाली जनता नेमका काय निर्णय घेणार याबद्दल मोठी उत्सुकता आहे. बंगाली अस्मिता असणाऱया थोर नेत्यांशी भाजपने बांधीलकी दाखवण्याचा प्रयत्न करून ममतांना विरोधात तीव्र टीका करण्यास भाग पाडले आहे. परिणामी त्यांच्या टीकेला तेवढय़ाच टोकदार पद्धतीचे उत्तर देण्याचा भाजपला लाभ झाला आहे. आपली संस्कृती आणि अस्मिता यांना संवेदनशीलतेने जपणारा बंगाली माणूस अशा प्रसंगानंतर कोणाच्या पाठीशी उभा राहणार असा प्रश्न देशभरातील जनतेला पडल्यावाचून राहणार नाही. लढाई नरेंद्र मोदी यांनी जिंकली तर एक प्रमुख राज्य त्यांच्या वर्चस्वाखाली आले असे म्हटले जाईल. पण ममता ही लढाई जिंकल्या तर राष्ट्रीय राजकारणात त्यांच्या शब्दाला फार मोठी किंमत निर्माण होणार आहे. त्यादृष्टीने विचार केल्यास ममता बॅनर्जी भाजपला टोकाचा विरोध करणार हे स्पष्टच आहे. त्याची चुणूक यापूर्वी अनेकदा दिसून आली आहे. बंगाल निवडणुकांमध्ये हिंसाचारसुद्धा होण्याची शक्मयता त्यामुळे अधिक बळावली आहे. अशा या गंभीर वातावरणात मिथुन चक्रवर्तीसारख्या अभिनेत्याला घेऊन त्यांनी काय साधले असा प्रश्न पडल्यावाचून राहणार नाही. तो ममतांच्या पक्षाचा खासदार होता. एका चिटफंड घोटाळय़ात त्याचे नाव आले आणि त्यामुळे त्याला राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर निवांत असणाऱया अभिनेत्याला आपल्या पक्षात घेऊन फिल्मी डायलॉग मारायला लावून जनतेवर खरोखरच प्रभाव पडेल का हे निवडणूक काळात होणाऱया इतर सभांच्या वेळी लक्षात येईलच. पण आता तरी विरोधात मिळेल ते शस्त्र उगारण्याचा भाजपने चालवलेला प्रयत्न सुवेंदु आणि मिथुन यांच्याबाबतीत बंगालच्या बाहेरही चर्चेत आहे. ममतांनी आपले उमेदवार निवडताना महिला आणि मुस्लिमांना दिलेले प्राधान्य आणि भाजप प्रत्येक मतदारसंघासाठी आखत असलेली योजना याबाबत मोठी उत्सुकता आहे. देशभर भाजपने डावे किंवा काँग्रेस विरोधात उभे राहिलेले पक्ष म्हणजे आपले मित्रपक्षच अशी भूमिका घेत देशात अनेक राज्यात असणाऱया प्रादेशिक पक्षांशी जवळीक ठेवली. गेल्या काही वर्षात या प्रादेशिक पक्षांची शक्ती कमी होत आहे आणि त्यांचा मतदार काहीअंशी भाजपकडे परावर्तित होतो आहे. बंगालमध्येही ममतांना आपल्या हक्काच्या एका वर्गाला गमवावे लागले तर तेवढय़ा भाजपच्या जागा वाढू शकतात. यामध्ये डाव्यांचा आवाज निर्माण झाला नाही तर त्यांचा मतदार भाजपकडे वळू शकतो. काही डाव्या नेत्यांनी ही स्थिती लक्षात घेऊन भाजपशी जवळीकही साधली आहे. बंगालमध्ये सुरू असणारा हा ‘खेला’ अजून काय काय रंग दाखवतो हे पाहणे औत्सुक्मयाचे ठरणार आहे.

Related Stories

‘उसंत’ अभावी हरवणारा जगण्यातील ‘वसंत’

Amit Kulkarni

अमेरिका दौऱयाचे महत्व

Amit Kulkarni

आरोप-प्रत्यारोपाने प्रश्न सुटणार का ?

Patil_p

प्रशासक नियुक्तीतून भाजपला शह

Patil_p

सरकार इथेनॉल आधारित फ्लेक्स इंजिनला मान्यता देणार

Patil_p

ठकी, भातुकली, सरकार वगैरे

Patil_p
error: Content is protected !!