तरुण भारत

काळी नदीवर दहा कोटींच्या पुलाची पायाभरणी

बैलवाडा ग्रामपंचायतीच्या व्याप्तीतील न्हईवाडा-सिद्दर उंबळेजुग गावांना जोडले जाणार : ग्रामस्थांतून आनंदाचे वातावरण

प्रतिनिधी / कारवार

Advertisements

स्वातंत्र्य प्राप्तीच्या 74 वर्षानंतर का होईना उंबळेजुग (काळी नदीतील बेट) ला जाण्यासाठी कारवार-अंकोलाच्या आमदार रुपाली नाईक यांच्या हस्ते काळी नदीवर दहा कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येणाऱया पुलाची पायाभरणी करण्यात आली. या नियोजित पुलामुळे कारवार तालुक्यातील बैलवाडा ग्रामपंचायतीच्या व्याप्तीतील न्हईवाडा-सिद्दर उंबळेजुगशी रस्त्याने जोडले जाणार आहे. अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर पुलाची समस्या मार्गी लागल्याने उंबळेजुगवासियांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

 कारवार तालुक्यातील कद्रा ते काळी नदी अराबी समुद्रापर्यंतच्या काळी नदीच्या प्रवाहामुळे काही बेटे निर्माण झाली आहेत. काही मोठी तर काही छोटी आहेत. यापैकी काही बेटांवर मानव वस्ती आहे तर काही बेटे निर्मनुष्य आहेत. मनुष्य वस्ती असलेल्या बेटांमध्ये उंबळेजुगचा समावेश केला जातो. उंबळेजुगचे क्षेत्रफळ सुमारे 45 एकर इतके आहे. बेटावरील लोकसंख्या सुमारे 100 इतकी आहे. बहुतेक शेतकरी कुटुंबे बेट सर्व बाजुनी काळी नदीच्या पाण्याने वेढले गेल्याने अन्य जगाशी संपर्क साधण्यासाठी केवळ छोटय़ा होडय़ांचा एकमेव आधार घ्यावा लागतो. परिणामी आजारी व्यक्तींची, शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची जीवनावश्यक वस्तू खरेदी करणाऱयांची फार मोठी पंचाईत व्हायची. काळी नदीला पूर आल्यास त्यांचे फार हाल होत होते. 2019 मध्ये काळीनदीला आलेल्या पुरामुळे संपूर्ण बेट जलमय होते. उंबळेजुगला जायला रस्ता नाही. म्हणून युवकांचे विवाह जुळून येत नव्हते. त्यावेळी येथील पत्रकारांनी उंबळेजुगला भेट दिली. आणि तेथील नागरिकांच्या समस्या जगासमोर मांडल्या.

 स्वातंत्र्यापासून पुलाची मागणी

दरम्यान उंबळेजुगवासियांनी पुलाच्या मागणीसाठी लोकप्रतिनिधी सरकारी अधिकाऱयांच्याकडे स्वातंत्र्यापासून साकडे घातले. शेवटी विद्यमान आमदार रुपाली नाईक यांनी दखल घेत काळीनदीवरील पूल बांधणीसाठी दहा कोटी रुपये मंजूर करून घेण्यात यश मिळविले व पायाभरणीही केली.

याप्रसंगी बोलताना आमदार नाईक म्हणाल्या, उंबळेजुगवासियांच्या समस्या प्रसिद्धी माध्यमांनी जगासमोर मांडल्या आणि त्याच समस्यांच्याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न मी आमदार या नात्याने विधानसभेत केला. मुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाममंत्र्यांनी समस्यांची दखल घेतली आणि काळीनदीवर पूल बांधण्यासाठी दहा कोटी रुपये मंजूर केले. यापूर्वीच्या लोकप्रतिनिधींनी पूल बांधणीच्या  मागणीकडे अक्षम्य दुर्लक्ष केले, असे स्पष्ट करून आमदार नाईक पुढे म्हणाल्या, पूल बांधणीच्या कामाला लवकरच सुरुवात करण्यात येईल. पुलबांधणीचे काम उच्च प्रतीचे झाले पाहिजे, असे त्या पुढे म्हणाल्या.

यावेळी कारवारचे नगराध्यक्ष डॉ. नितीन पोकळे, उपनगराध्यक्ष प्रकाश नाईक, माजी नगराध्यक्ष गणपती उळवेकर, राजेश नाईक, दिलीपकुमार नाईक, सुभाष गुणगी आदी उपस्थित होते.

Related Stories

गुरुनानक जयंतीनिमित्त अनाथाश्रमात भोजन वाटप

Amit Kulkarni

यात्रा मंगाई देवीची, जपणूक परंपरेची

Amit Kulkarni

लष्करी जवानाच्या खून प्रकरणी पत्नीसह दोघांना अटक

tarunbharat

तरुण भारत दिवाळी अंकाचे प्रकाशन

Omkar B

आता कोरोनावर नियंत्रणासाठी प्रयत्न करा!

Amit Kulkarni

शिक्षक बदली प्रक्रियेचे कौन्सिलिंग 16 डिसेंबरपासून

Patil_p
error: Content is protected !!