तरुण भारत

विजयी घोडदौड

टीम इंडियाने जगज्जेत्या इंग्लंड संघावर कसोटीत 3-1 ने मिळविलेला सफाईदार विजय आणि बजरंग पुनिया व विनेश फोगट यांनी रोममधील आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत मिळविलेले सुवर्णयश म्हणजे क्रीडा क्षेत्रातील कसदार कामगिरीच म्हणावी लागेल. पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात पराभूत झालेल्या भारतीय संघाने त्यानंतरच्या एकाही लढतीत गोऱया साहेबांना डोके वर काढून दिले नाही, यातूनच नव्या संघाच्या दृढ खेळीवर प्रकाश पडतो. संपूर्ण मालिकेचा विचार केला, तर प्रामुख्याने फिरकी गोलंदाजांचे यश उठून दिसते. कालपरवापर्यंत आपल्याला जड झालेल्या आर. अश्विनने ज्या पद्धतीने अष्टपैलूत्वाचे दर्शन घडवले, ते पाहता त्याचा खेळ अजून बराच बाकी आहे, असे म्हणता येईल. गोलंदाजीबरोबर फलंदाजीतही त्याने दाखविलेला प्रभाव बघता मालिकावीर म्हणून त्याची झालेली निवड योग्यच. 4 सामन्यांच्या मालिकेत 32 बळी व एका शतकासह 189 धावा ही तशी स्वप्नवतच कामगिरी. विशेष म्हणजे तब्बल 30 वेळा अश्विनने एकाच डावात पाच बळी घेण्याचा पराक्रम नोंदविला आहे. ऑस्ट्रेलियातील मैदाने असोत वा मायभूमीतील, अश्विनची दोन्हीकडील कमाल ध्यानात घेता भविष्यातदेखील त्याच्याकडून अपेक्षा असतील. अक्षर पटेलने अश्विनला दिलेली साथदेखील तितकीच तोलामोलाची होय. पहिल्या वहिल्या मालिकेतील त्याची कामगिरी आश्वासक म्हणावी लागेल. वॉशिंग्टन सुंदरला अद्याप गोलंदाजीत म्हणावी तशी छाप पाडता आली नसली, तरी कठीण काळी त्याने वेळोवेळी केलेल्या फलंदाजीमधून त्याच्यातील अष्टपैलू होण्याची क्षमता अधोरेखित होते. चौथ्या कसोटीत ऋषभ पंतला समर्थ साथ देत नाबाद 96 धावांची त्याने केलेली खेळी अविस्मरणीय अशीच. कितीही आणीबाणीची स्थिती असो, त्यातून अलगद बाहेर काढून सामना सहज आपल्या बाजूने कसा फिरवायचा, हे पंतकडून शिकण्यासारखे आहे. त्या अर्थी ‘गेमचेंजर’ ही त्याला लावण्यात येत असलेली नवी उपाधी सार्थच. रथी, महारथी धारातीर्थी पडत असताना एरवी आक्रमक बाज असलेल्या या क्रिकेटपटूमध्ये दिसलेला संयम व प्रतिभा तो कसोटीसाठी अधिक प्रगल्भ होत असल्याचेच निदर्शक. पाकिस्तानच्या इंझमाम उल हकने ‘डावखुरा सेहवाग’ हे त्याचे केलेले वर्णन चपखलच. रोहित शर्माचा खेळही समाधानाकारक. परंतु, मालिकेतील शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, विराट कोहली यांची कामगिरी अत्यंत निराशाजनक ठरते. ऑस्ट्रेलियातील एकुलते एक शतक वगळता रहाणेला फलंदाज म्हणून ठसा उमटविता आलेला नाही. परदेशातील खेळपट्टय़ांवर कसोटीस उतरणारा शुभमन भारतीय खेळपट्टय़ांवर का अपयशी ठरतो, याचा त्यानेही विचार करावा. पुजाराकडे द्रविडचा वारसदार म्हणून पाहिले जाते. तथापि, त्याची इंग्लंडविरुद्धची कामगिरी या चौकटीत बसत नाही. विराट कोहली कर्णधार म्हणून या मालिकेत उत्तीर्ण झाला असेलही. परंतु, त्याच्यातील गुणवान फलंदाज मोक्याची क्षणी कधी कधी कुठे हरवतो, याचे उत्तर त्यानेच शोधावे. आता विराटच्या या विजेत्या संघाला कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम लढतीत न्यूझीलंडशी दोन हात करावे लागतील. 18 ते 22 जूनदरम्यान इंग्लंडमधे जेतेपदासाठी हे दोन संघ भिडतील. न्यूझीलंडचा संघ गोलंदाजी, फलंदाजी, क्षेत्ररक्षण अशा सर्वच आघाडय़ांवर सरस आहे. त्यामुळे भारतीय संघाला गोलंदाजीबरोबरच फलंदाजीकडे लक्ष द्यावे लागेल. त्यादृष्टीने सलामीच्या जोडीबरोबरच मधल्या फळीचाही कस लागणार आहे. किंबहुना, या कसोटीला टीम इंडिया उतरेल, अशा त्यांना शुभेच्छा देऊयात. द. आाफ्रिकेविरुद्ध पहिल्या सामन्यात हार पत्करणाऱया भारतीय महिला संघाचा दुसऱया लढतीतील खेळही उत्साहवर्धक. स्मृती मानधना व पूजा राऊतची कामगिरी अजोडच. स्मृतीने धावांचा पाठलाग करताना सलग दहा सामन्यात अर्धशतक वा त्याहून अधिक धावा करण्याचा केलेला विश्वविक्रम ऐतिहासिकच ठरतो. दुसरीकडे विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील पृथ्वी शॉचा 105, 227 आणि नाबाद 185 हा ट्रिपल धमाका लक्षवेधकच म्हणावा लागेल. कुस्ती हा तर अस्सल भारतीय वा मराठी मातीतला खेळ म्हणून ओळखला जातो. खाशाबा जाधव यांनी सर्वप्रथम या क्रीडा प्रकारात भारताला ऑलिंपिकमध्ये पदक मिळवून दिले आहे. त्यानंतर अनेक वर्षे पदकांचा दुष्काळ सोसावा लागला असला, तरी आता भारतीय मल्ल आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले कौशल्य दाखवून देत आहेत. बजरंग पुनियाची कमाल अनेकार्थांनी महत्त्वपूर्ण अशीच असून, या सुवर्णयशासह त्याने 65 किलो वजन गटात जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकावर झेप घेतली आहे. वास्तविक अंतिम फेरीत 0 विरुद्ध 2 गुणांनी पिछाडीवर असतानाही मनोबल कायम राखत त्याने ही किमया केली आहे. दुसरीकडे भक्कम बचावाच्या जोरावर विनेश फोगट हिनेही सुवर्णपदकाची कमाई केली आहे. अन्य कुस्तीपटूंची कामगिरीही नजरेत भरणारी. टोकिया ऑलिंपिकच्या पूर्वतयारीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱया या स्पर्धेतून बजरंगी भरारी घेण्याची प्रेरणा भारतीय मल्लांना मिळेल, अशी आशा करुयात. जागतिक विजेत्या पी.व्ही.सिंधू हिला स्विस ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत पत्करावा लागलेला पराभव निश्चित निराशाजनक आहे. सध्या सिंधू आपल्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये नाही. पदकाचा दुष्काळ संपवता आला नसला, तरी उपविजेतेपदावर तिला समाधान मानावे लागले, हेही कमी नाही. सिंधूमध्ये अफाट गुणवत्ता असून, तिचा खेळही तितकाच दमदार आहे. एकूणच क्रीडा क्षेत्रासाठी या सर्व वैशिष्टय़पूर्ण घटना ठरतात. आता इंग्लंडविरूद्ध टी ट्वेंटी व एक दिवसीय सामनेही रंगतील. त्यानंतर 9 एप्रिलपासून आयपीएलचा रणसंग्रामही सुरू होईल. याशिवाय टोकियो ऑलिंपिकचेही वेध लागले असून, यात प्रथमच महिलांना पुरुषांइतकेच प्राधान्य असेल, असे ऑलिंपिक समितीने जाहीर केले आहे. या पार्श्वभूमीवर पुढचे काही दिवस गजबजलेलेच असतील. क्रीडाशौकिनांसाठी ही पर्वणीच राहील.

Related Stories

राजकारण जाऊ दे चुलीत, तिसऱया लाटेचे काय फलित?

Amit Kulkarni

….हा मनुष्यस्वभाव नाही

Patil_p

बिहारमधील ‘सायलेंट व्होटर्स’ची किमया

Patil_p

निवडणुका अमेरिकेत, उत्सुकता भारतात

Patil_p

राज्यपालांचे उपद्व्याप!

Omkar B

दारूमुक्त गावासाठी सालेलीतील रणरागिणी सरसावल्या!

Omkar B
error: Content is protected !!