तरुण भारत

विविध ठिकाणी महिला दिन साजरा

बीपीसीएलतर्फे कर्मचारी महिलांचा सत्कार

बेळगाव : भारत पेट्रोलियमच्या खानापूर रोडवरील गोगटे पेट्रोल पंपावर आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी कंपनीच्यावतीने पंपावर काम करणाऱया महिलांचा सत्कार करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून प्रांतीय समन्वयक जयदीप पोतदार, व्यवस्थापक कुलदीप गुलाटी व डेपो इनचार्ज परमेश्वरन आर. उपस्थित होते.

Advertisements

प्रारंभी रोहिणी गोगटे यांनी स्वागत केले. त्यानंतर जयदीप पोतदार यांनी, समस्त पुरुषवर्ग महिलांचा आदर करतो. तुम्ही केवळ कुटुंबासाठीच नव्हे, तर देशासाठी सुद्धा महत्त्वाच्या आहात, असे सांगितले. कुलदीप गुलाटी यांनी आम्ही नेहमी तुमच्या सोबत आहोत. आणि पंपावर काम करणाऱया महिलांचा सन्मान करण्याची प्रथा कायम ठेवावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.

याप्रसंगी राजश्री, सुलोचना, लक्ष्मी, मुक्ता, सावित्री, रुपा या पंपावर काम करणाऱया महिलांचा शाल अर्पण करून स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कंपनीतर्फे पेट्रोलपंप सांभाळणाऱया रोहिणी गोगटे व सुरेखा शृंगेरी यांचाही सत्कार करण्यात आला. याचवेळी सेल्फी पॉईंट व आय लव्ह बीपीसीएल फलकाचे उद्घाटन करण्यात आले.

बेळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे महिला दिन

बेळगाव : बेळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने जागतिक महिला दिन कार्यक्रम मोठय़ा उत्साहात पार पडला. या दिनाचे औचित्य साधून क्रांती हुद्दार, बबिता पवार व समाजसेविका रुक्मिणी बळ्ळारी यांचा सत्कार करण्यात आला.

अध्यक्षस्थानी राजू महादेव पाटील होते. मुनीर लतीफ यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाला सुरुवात केली. यानंतर सत्कारमूर्तींनी यावेळी आपले विचार व्यक्त केले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे एस. बी. ओऊळकर व राज्य खजिनदार के. जी. पाटील, दुर्गेश मेत्री यांनी महिला दिनाचे महत्त्व विषद केले. राजू पाटील यांच्या अध्यक्षीय भाषणानंतर कार्यक्रमांची सांगता झाली. यावेळी जोतिबा पाटील, विनायक पाटील व इतर कार्यकर्ते आवर्जून उपस्थित होते.

महात्मा फुले ट्रस्टच्यावतीने महिलांचा सन्मान

बेळगाव : महात्मा फुले ट्रस्टच्यावतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कोरोना योद्धय़ा महिलांचा सत्कार करण्यात आला. महात्मा फुले ट्रस्टचे अध्यक्ष मिलिंद भातकांडे यांच्या हस्ते कोरोना योद्धय़ा रूपाली शिंदे, डॉ. भारती चंदरगी, सीमा माळी यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी बोलताना मिलिंद भातकांडे यांनी, महिलांनी कोरोना काळातही खंबीरपणे उभे राहून समाजाची सेवा केली. सावित्रीबाई फुले यांनी महिलांच्या शिक्षणासाठी त्या काळी केलेल्या कामामुळेच आज महिला प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर असल्याचे सांगितले. यावेळी स्वप्नील वाके, रूपेश पावले, अश्विनी खराडे, श्रीकांत भातकांडे, भातकांडे शाळेच्या मुख्याध्यापिका सुवर्णा खन्नूरकर उपस्थित होते. सुधीर मोहिते यांनी आभार मानले.

वेद फौंडेशनतर्फे महिलांची आरोग्य तपासणी

बेळगाव : वेद फौंडेशनच्यावतीने आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून महिलांच्या मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. श्रीनगर येथील झोपडपट्टीत जाऊन महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. रक्तदाब, मधुमेह, सांधेदुखी यासह इतर तपासण्या करण्यात आल्या. माजी नगरसेवक डॉ. दिनेश नाशीपुडी यांच्या हस्ते आरोग्य शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. वेद फौंडेशनचे चेअरमन सौमेश्री हिरेमठ, उपाध्यक्षा सुजाता मठपती, डॉ. विद्या जोळद यावेळी उपस्थित होत्या.

जायंट्स सखीतर्फे कर्तृत्ववान महिलांचा गौरव

बेळगाव : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त जायंट्स सखी या सेवाभावी संघटनेने पाच कर्तृत्ववान महिलांचा गौरव केला. याप्रसंगी व्यासपीठावर अध्यक्षा नीता पाटील, प्रमुख पाहुण्या शिक्षिका सरस्वती देसाई, फेडरेशन संचालिका ज्योती अनगोळकर, उपाध्यक्षा चंद्रा चोपडे, विद्या सरनोबत, सचिव शितल पाटील उपस्थित होत्या.

जगभरात आज महिलांनी सर्वच क्षेत्रात भरारी घेतली असून सीमेवर देशाचे रक्षण करण्यासाठी सुद्धा महिला आघाडीवर असल्याचे सरस्वती देसाई यांनी सांगितले. सावित्रीबाई फुलेंनी स्त्राr शिक्षणासाठी पुढाकार घेतल्यानेच महिला शिक्षित झाली आणि घराबाहेर पडून आपले कर्तृत्व सिद्ध करू शकली, असेही त्या म्हणाल्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि उपस्थितांचे स्वागत ज्योती अनगोळकर यांनी केले. जायंट्सचा दिवाकर प्रज्वलित करून जायंट्सच्या प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यानंतर प्रमुख पाहुण्यांचा शाल, गुलाबपुष्प आणि स्मृतिचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले.

महिला दिनानिमित्त वृद्धाश्रम चालविणाऱया संजीवनी फौंडेशनच्या सविता देगीनाळ यांचा ज्योती अनगोळकर यांनी शाल, सन्मानचिन्ह आणि गुलाबपुष्प देऊन गौरव केला. एचआयव्ही बाधित मुलींचा आश्रम चालविणाऱया आश्रम फौंडेशनच्या सफला नागरत्ना यांचा गौरव विद्या सरनोबत यांनी, अंकुर मतिमंद मुलांची शाळा चालविणाऱया गायत्री गावडे यांचा गौरव चंद्रा चोपडे यांनी तसेच अंधशाळेच्या मुख्याध्यापिका अनिता गावडे यांचा नीता पाटील यांनी तसेच ग्रामीण भागातील अनाथ मुलांचा आश्रम चालविणाऱया अनमोल तंगुधामच्या सिस्टर स्मिथा मोनिस यांचा शितल पाटील यांनी गौरव केला. या महिलांचा परिचय ज्योती सांगूकर, शितल नेसरीकर, अर्चना पाटील, ज्योती पवार, लता कंग्राळकर आणि अपर्णा पाटील यांनी करून दिला. गौरवमूर्ती महिलांनी जायंट्स सखीप्रति कृतज्ञता व्यक्त केली.

अध्यक्षीय समारोप नीता पाटील यांनी केला. कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन सुलक्षणा शिनोळकर यांनी केले. तर आभार शितल यांनी मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

या कार्यक्रमास जायंट्स सखीच्या अनुपमा कोकणे, मनीषा कारेकर, सुजाता देसूरकर, दीपा पाटील, शितल कोकितकर, सुवर्णा कोळे, भाग्यश्री पवार, विद्या बांदिवडेकर, नेहा पाटील आणि उषाताई गोगटे हायस्कूलच्या विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

डिजिटल फिटनेस हब, वेणुग्राम सायकलिंग क्लबतर्फे सायकलिंग मोहीम

बेळगाव : डिजिटल फिटनेस हब व वेणुग्राम सायकलिंग क्लबतर्फे महिला दिनानिमित्त रविवारी सायकलिंग मोहीम हाती घेण्यात आली. महिलांनी या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन 15 कि.मी. सायकलिंग यशस्वीरीत्या पूर्ण केली. याप्रसंगी पंखच्या संचालिका गौरी मांजरेकर व आसावरी संत प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. हर्षद कलघटगी यांनी हा उपक्रम आयोजित क्sढढला होता. यावेळी महिलांना सायकल हाताळण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. सायकल दुरुस्ती व हेल्मेटचा वापर याबाबतही माहिती देण्यात आली.

सृष्टी निर्मात्यालाही निर्माण करणारी म्हणजे जगन्माता : डॉ.रवी पाटील

बेळगाव : परमेश्वराचं प्रतीक म्हणण्यापेक्षा सृष्टी निर्मात्याला जन्म देणारी स्त्री म्हणजे जगन्माता. प्रत्येकाच्या आयुष्याची सुरुवात तिच्यापासून होते. तिच्या संस्कारांची, मायेची ऊब घेत आपलं जीवन घडतं. वेगवेगळय़ा रूपात तिची साथ मिळते, म्हणून पुरुष सक्षम बनू शकतो. त्याला प्रत्येक क्षेत्रात हिमतीनं साथ देणाऱया स्त्रीने आज जगात आपलं उत्तुंग असं स्थान पटकावलं आहे. अशा नारीशक्तीला माझा मनापासून नमस्कार, असे प्रतिपादन हाडांचे शल्यचिकित्सक डॉ. रवी पाटील यांनी काढले.

बालिका आदर्श विद्यालयात जागतिक महिला दिन आणि वार्षिक बक्षीस वितरण समारंभात प्रमुख पाहुणे या नात्याने ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शाळेचे चेअरमन गोविंदराव फडके होते. बालिका आदर्श विद्यालयात आल्यानंतर मला खूप समाधान वाटलं. महिला दिनी मुलींच्या शाळेत शब्दांची देवाण-घेवाण करण्याची संधी म्हणजे दुग्धशर्करा योग आहे. आज दहा दिशांमध्ये जो आवाज घुमतो आहे, जिच्या कर्तृत्वाने सर्व जग कवेत घेतलं आहे, अशा जग उद्धारिणी स्त्री शक्तीचा, कर्तृत्वाचा, महानतेचा, तिच्या कुशलतेचा, पराक्रमाचा गोडवा गाण्यासाठी आपण जमलो आहोत.

उद्याचं जग एक स्त्री म्हणून तुमच्या हातात असणार आहे. बालिका आदर्शची वैभवशाली परंपरा तुम्ही जपायची आहे. तुमच्या कार्याने आपल्या बरोबर समाजालाही सक्षम बनवलात तर महिला दिन साजरा करण्याचं सार्थक आम्हाला नक्की मिळेल, अशी आशा बाळगते, असे उद्गार प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉ. वैशाली अभिजित देशपांडे यांनी काढले. प्रमुख वक्त्या या नात्याने त्या बोलत होत्या.

यावेळी व्यासपीठावर प्रसिद्ध शल्यचिकित्सक डॉ. रवी पाटील, शाळेच्या संचालिका डॉ. अंजली जोशी, मुख्याध्यापक एन. ओ. डोणकरी, मंजुनाथ गोलीहळ्ळी, हनुमान स्पोर्ट्सचे आनंद सोमणाचे, सौ. व श्री. ओमकार गोगटे, आनंद गाडगीळ आणि बालविद्यार्थिनी श्रीशा सावंत उपस्थित होते. प्रारंभी विद्यार्थिनींच्या स्वागतगीत व ईशस्तवनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. पाहुण्यांच्या हस्ते सरस्वती मूर्ती पूजन आणि दीपप्रज्वलन करण्यात आले.

प्रास्ताविक मुख्याध्यापक एन. ओ. डोणकरी यांनी केले. डॉ. वैशाली देशपांडे यांचा परिचय डॉ. अंजली जोशी यांनी केला. नेहा पाटील यांनी डॉ. रवी पाटील यांचा परिचय करून दिला. चेअरमन गोविंद फडके यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सर्वांचे स्वागत करण्यात आले. हनुमान स्पोर्ट्सचे मालक आनंद सोमणाचे यांचा शाळेच्या योगदानाबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. बी. के. मॉडेलच्या माजी मुख्याध्यापकांना पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नेत्रा कुलकर्णी, कीर्ती चिंचणीकर, ईश्वरी पावसकर, विनया पेडणेकर, वंदना कुलकर्णी, कविता चौगुले यांनी मोलाचे योगदान दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुजाता देसाई यांनी केले. आभार मृदुला पाटील यांनी मानले.

लोकमान्य सोसायटी हिंडलगा शाखेमध्ये महिलांचा सन्मान

उचगाव : वार नाही तलवार आहे, ती समशेरेची धार आहे. स्त्री म्हणजे काही राख नाही तर धगधगता अंगार आहे. अशी स्त्राrची महिमा आहे. आज जागतिक महिला दिन म्हणून जगभर उत्साहवर्धक वातावरणात साजरा केला जात आहे. प्राचीन काळापासून स्त्राrयांना भारतीय संस्कृतीमध्ये उत्तम स्थान प्राप्त झाले आहे. सर्वांनी महिलांना सन्मानाने मान द्यावा, आदर करावा, यासाठी महिलांनी देखील आपली वागणूक चांगली ठेवावी, असे मनोगत माया पाटील यांनी व्यक्त केले.

लोकमान्य सोसायटी हिंडलगा शाखेमध्ये जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कोरोना योद्धा महिला, शिक्षिका, आशा कार्यकर्त्या व ग्रामपंचायत सदस्या यांचा सन्मान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

प्रारंभी हिंडलगा शाखेच्या मॅनेजर मंदा खवनेवाडकर यांनी सर्व महिलांचे स्वागत केले व जागतिक महिला दिनाचे महत्त्व सांगितले. यावेळी माया पाटील यांच्या हस्ते महिला दिनाचे औचित्य साधून केक कापून महिला वाढदिवस साजरा केला. कोरोना योद्धा सीमा किरण पावशे, आशा कार्यकर्त्या वनिता बेळगुंदकर, लक्ष्मी उचगावकर, ग्रा. पं. सदस्या सुमन राजगोळकर, चेतना अगसगेकर, आरती कडोलकर, स्नेहल कोळेकर, संगीता पलंगे, सीमा देवकर, मृणाल सोहणी, सुमन अनगोळकर व कर्मचारी मंदा खवनेवाडकर, स्वेता मडकईकर, राही जाधव या सर्वांचा सोसायटीमार्फत गौरव झाला. परशराम चक्हाण यांनी आभार मानले.

ठाणे जिल्हा सहकारी बँक

बेळगाव : कुटुंब आणि आपले काम याचा समतोल महिला पूर्वीपासूनच सांभाळत आहेत. नोकऱया अस्तित्वात नव्हत्या तेव्हा महिला शेतात काम करून घर सांभाळत असत. स्त्राrमध्ये सप्तशक्ती वास करतात. मात्र, मिळविणे हे केवळ आर्थिकदृष्टय़ाच नसते तर ते कला आधारित उद्योगांमध्येसुद्धा असते. हे लक्षात घ्यावे आणि महिलेने आपला किमान काही वेळ समाजासाठी द्यावा, असे मत राष्ट्रसेविका समितीच्या ज्ये÷ कार्यकर्त्या अलका इनामदार यांनी व्यक्त केले.

ठाणे जिल्हा सहकारी बँकेच्या बेळगाव शाखेतर्फे आयोजित महिला दिन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, प्रत्येक दिवस हा महिलांचाच आहे. महिलांना त्यांचा सन्मान मिळणे आवश्यक आहे. महिला या समाजाच्या मानबिंदू आहेत. आज पाश्चात्यांचे अंधानुकरण करून आपण काही चुकीच्या गोष्टी समाजावर थोपवत आहोत. परंतु संस्कृतीने महिलांचे महत्त्व नेहमीच मान्य केले आहे, याचा विसर पडता कामा नये.

या कार्यक्रमात माधुरी जाधव, अश्विनी बिडीकर, पत्रकार मनीषा सुभेदार, नंदिनी मुतालिक, सारिका देसाई व अलका इनामदार यांचा बँकेतर्फे सत्कार करण्यात आला. मनीषा सुभेदार यांनी सर्वांच्यावतीने सत्काराला उत्तर देताना जे चुकते आहे ते बोलण्याचे धाडस महिलांनी दाखविले पाहिजे आणि परस्परांना सहकार्य करत पुढे आले पाहिजे, असे सांगितले. प्रारंभी बँकेच्या अश्विनी वरदराज बापट यांनी ऑडीओद्वारे सर्वांना शुभेच्छा दिल्या. बँकेच्या प्रगतीचा आढावा घेऊन बँकेत 39 टक्के महिला काम करतात, अशी माहिती दिली. सूत्रसंचालन स्वाती आपटे यांनी केले. सुजाता माने यांनी आभार मानले. 

महिला निरोगी तर देश तंदुरुस्त

बेळगाव : महिलांना आपल्या देशात देवीचे रूप मानले जाते. त्याग, बलिदान, करुणा यांचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे स्त्राr. एक स्त्री शिकते तेव्हा ती इतर घरांचाही उद्धार करते. ही स्त्री शारीरिकदृष्टय़ा तंदुरुस्त राहिली तरच देश तंदुरुस्त राहणार आहे. कोरोना काळात आशा कार्यकर्त्यांनी केलेले काम कौतुकास पात्र आहे. प्रत्येक घरापर्यंत पोहोचून आरोग्याविषयी माहिती त्यांनी दिली आहे. त्यामुळे नारीच्या या रूपानेही कोरोना काळात दर्शन घडविले, असे गौरवोद्गार केएलईचे संचालक डॉ. एच. बी. राजशेखर यांनी काढले.

येळ्ळूर रोड येथील केएलई शताब्दी चॅरिटेबल हॉस्पिटल यांच्यावतीने सोमवारी जागतिक महिला दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर केएलईचे संचालक डॉ. एस. सी. धारवाड, डॉ. आय. पी. गडाद, तालुका आरोग्याधिकारी डॉ. मास्तीहोळी, डॉ. राजेश्वरी कडकोळ, डॉ. सतीश धामणकर उपस्थित होते.

स्वावलंबी बनल्या तरच खरा महिला दिन

डॉ. गडाद म्हणाले, केवळ भाषणे देऊन महिला दिन साजरा करण्यापेक्षा त्यांच्या जीवनमानात बदल घडेल यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. महिलांचे सामाजिक, आर्थिक प्रश्न जोवर सुटणार नाहीत तोवर त्यांना समान न्याय मिळणार नाही. तळागाळातील स्त्रिया आजही पुरुषांवर अवलंबून आहेत. त्यांना स्वावलंबी बनविल्यानंतरच देशात खरा महिला दिन साजरा होईल, असे त्यांनी सांगितले.

आशा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन या कार्यक्रमात डॉ. सौभाग्या भट यांनी स्तनाचा कर्करोग या विषयी मार्गदर्शन केले. जी. आर. कुलकर्णी यांनी स्वागतगीत सादर केले. डॉ. श्वेता पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष ईतापे यांनी केले. यावेळी बेळगाव तालुक्मयातील आशा कार्यकर्त्या मोठय़ा संख्येने उपस्थित होत्या.

मराठा मंडळ कॉलेजमध्ये महिला दिन साजरा

बेळगाव : मराठा मंडळ कॉलेजमध्ये महिला दिन साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. शीतल पाटील उपस्थित होत्या. अध्यक्षस्थानी प्राचार्य ए. एम. पोतदार होते. याप्रसंगी मंडळाच्या अध्यक्षा राजश्री नागराजू यांनी विद्यार्थिनींसाठी सुरू केलेल्या सॅनिटरी नॅपकिन्स प्रकल्पांतर्गत विद्यार्थिनींना विनामूल्य नॅपकिन वितरित करण्यात आले. यानंतर विद्यार्थिनींनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. गौरी उप्पीन यांनी सूत्रसंचालन केले. तसेच ‘च्यूज टू चॅलेंज’ या घोषवाक्मयावर आधारित सादरीकरण करण्यात आले. नेत्रा शिवयोगीमठ यांनी स्वागतगीत सादर केले.

लोकमान्य सोसायटीच्या कॅम्प शाखेतर्फे महिलांचा सन्मान

बेळगाव : लोकमान्य सोसायटीच्या कॅम्प येथील शाखेमध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात आला. सोसायटीच्या महिला सभासदांसोबत विविध क्षेत्रातील महिलांचा यावेळी सन्मान करण्यात आला. कॅन्टोन्मेंट मराठी शाळेच्या मुख्याध्यापिका निशा गावडे, कॅन्टोन्मेंट बोर्डच्या अधिकारी प्रियांका पेटकर, मेरी मार्क यांच्यासह कॅन्टोन्मेंट कार्यालयातील महिला व मंगेश होंडा येथील महिला कर्मचाऱयांचा सन्मान करण्यात आला. प्रारंभी दीपाली भातकांडे यांनी महिलांचे स्वागत केले. अंकिता चौगुले व वैशाली कावळे यांनी सर्व उपस्थितांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. साहाय्यक व्यवस्थापक रोहन मेहंदळे यांनी सोसायटीच्या विविध ठेवींबद्दल माहिती दिली. शाखा व्यवस्थापक रोझारिओ गामा यांनी आभार मानले.

वॉर्ड 21 मधील महिला स्वच्छता कर्मचाऱयांचा गौरव

बेळगाव : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून प्रभाग क्रमांक 21 मधील महिला स्वच्छता कामगारांचा सन्मान सामाजिक कार्यकर्ते आणि स्वच्छता निरीक्षक संजय पाटील यांनी केला. तसेच या भागात रस्त्याशेजारी राहणाऱया, मनोरुग्ण पीडित महिलेला साडीचोळी देऊन तिचा सन्मान करण्यात आला. स्वच्छता कर्मचारी महिला स्वतःचे आरोग्य धोक्मयात घालून इतरांच्या आरोग्यासाठी कार्यरत असतात. अशा महिलांचा सन्मान गरजेचा आहे, या उद्देशाने हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी रवींद्र जाधव, सुपरवायझर नितीन देमट्टी, सुपरवायझर किरण देमट्टी, सुभाष घराणे यांच्या हस्ते गुलाबपुष्प आणि मिठाई वाटप करून माला मुचंडी, लक्ष्मी चलवादी, तुळसा कोलकार, बेबी कोलकार, सलोनी, एंडोरी, लीलावती कांबळे, मीनाक्षी अनिकारी, प्रभावती शिंगे या महिला स्वच्छता कर्मचाऱयांसह  सूरज चलगर, प्रकाश बोबनावर यांचा सन्मान करण्यात आला.

मनपा स्वच्छता महिला कर्मचाऱयांचा सत्कार

बेळगाव : शहराच्या सौंदर्यात भर देण्याचे महत्त्वपूर्ण काम महापालिकेचे स्वच्छता कर्मचारी करीत असून त्यांच्या कार्याचा गौरव करणे आवश्यक आहे. दिवसभर कष्ट करणाऱया स्वच्छता कर्मचाऱयांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करणे गरजेचे असून सरकारने त्यांच्यासाठी विविध योजना लागू कराव्यात, असे मत कर्नाटक बिझनेस टेनिंग सेंटरच्या संचालिका ज्योती निलजकर यांनी व्यक्त केले.

कर्नाटक बिझनेस टेनिंग सेंटर व साई ज्योती इन्स्टिटय़ूटतर्फे मंगळवारी महिला दिनाचे औचित्य साधून महापालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱयांचा भारतनगर शहापूर येथील नेताजी सुभाषचंद्र सांस्कृतिक भवन येथे सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बसवेश्वर सर्कल, खासबाग येथील गणेशोत्सव मंडळाचे उपाध्यक्ष कृष्णा हलगेकर, स्वच्छता निरीक्षिका शिल्पा कुंभार, संजय पाटील आदी उपस्थित होते. प्रारंभी संचालिका ज्योती निलजकर यांनी प्रास्तविक केले. हलगेकर यांनी स्वच्छता कर्मचारी सकाळी 6 वाजल्यापासून शहरातील स्वच्छेतेचे काम हाती घेतात. त्यासाठी त्यांना सातत्याने मदत करणे आवश्यक आहे, असे मत व्यक्त केले. सुमन कलघटगी यांनी स्वागत केले. महिला स्वच्छता कर्मचाऱयांना भेटवस्तू व पुष्प देऊन गौरविण्यात आले.

वैश्यवाणी महिला मंडळातर्फे महिला दिन

बेळगाव : वैश्यवाणी महिला मंडळातर्फे महिला दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात अश्विनी कलघटगी व वंदना मालशेट यांच्या प्रार्थनेने झाली. यावेळी व्यासपीठावर अध्यक्षा शीला बिडीकर, उपाध्यक्षा उज्ज्वला बैलूर, सचिव वर्षा सटवाणी आणि खजिनदार निर्मला कणबर्गी होत्या. अध्यक्षीय भाषणानंतर कोरोना काळात सेवा बजावणाऱया दिव्या उचगावकर, प्रियांका मुरकुंबी, शिवानी अनगोळकर, पल्लवी चांदिलकर, नेहा भुतकी, पूजा कपिलेश्वरी, दीपाली पिळणकर, मेघा कणबर्गी, हेमलता कुंद्री, विशालाक्षी शहापूरकर, दीप्ती हणमशेट, अक्षरा कपिलेश्वरी या डॉक्टर व नर्स महिलांचा सत्कार करण्यात आला.  या कार्यक्रमाला सुनीता हणमशेट, सुमती कुदळे, भारती केसरकर, कांचन हणमशेट यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमास समाजातील बहुसंख्य महिला उपस्थित होत्या. सूत्रसंचालन मंजुषा देवलापूरकर यांनी व आभार वर्षा सटवाणी यांनी मानले.  

जिजामाता महिला बँकेतर्फे कार्यक्रम

बेळगाव : येथील जिजामाता महिला सहकारी बँक लि. यांच्यावतीने मुजावर गल्ली येथील शाखेच्या सभागृहात आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी चेअरमन ऍड. अश्विनी बिडीकर होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून लोकमान्य सोसायटीच्या संचालिका गायत्री काकतकर, मराठा बँकेचे संचालक बाळासाहेब काकतकर उपस्थित होते.

जिजामाता प्रतिमेचे पूजन चेअरमन अश्विनी बिडीकर यांच्या हस्ते करण्यात आले. दीपप्रज्वलन गायत्री काकतकर व बाळासाहेब काकतकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्हा. चेअरमन जयश्री भोसले, संचालक भाविकाराणी होनगेकर, साक्षी चोळेकर, लीला पाटील, लता खांडेकर, रेशमा जाधव, नंदिता माने, सुचेता भोसले, भारती किल्लेकर, शशिकला काकतकर यांचे स्वागत व्यवस्थापक नितीन आनंदाचे यांनी केले.

यावेळी चेअरमन अश्विनी बिडीकर, बाळासाहेब काकतकर, साक्षी चोळेकर यांनी आपले विचार व्यक्त केले. आभार शाखा व्यवस्थापक स्नेहल वसुलकर यांनी मानले. यावेळी किशोरी शहापूरकर, शीतल नाकाडी, नविता मोहिते, वैष्णवी डेंगरे, अशोक पाटील, मिलिंद कडोलकर, प्रवीण पवार, प्रसाद बेडके, रोहित किल्लेकर, संदीप पाटील, विलास चौगुले, संदीप पाटील (कालकुंद्री), सागर पाटील, भावकाण्णा मनगुत्तरकर यांच्यासह कर्मचारी व सभासद मंडळ उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

बेळगाव जायंट्सतर्फे महिलांचा गौरव

बेळगाव : जायंट्स ग्रुप ऑफ परिवार बेळगावतर्फे महिला दिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या महिलांचा सन्मान करण्यात आला. शहापूर भारतनगर लक्ष्मी रोड येथील महागणपती मंदिरात आयोजिलेल्या कार्यक्रमाला बेळगाव जिल्हा कुस्तीगीर संघटनेचे उपाध्यक्ष हिरालाल चक्हाण प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. माधुरी जाधव, गौरी गजबर, वैशाली सुतार, सुनीता वेसणे व सुप्रिया महालंक यांचा सत्कार करण्यात आला. हिरालाल चव्हाण यांनी जायंट्सच्या कार्याचे कौतुक केले.

 स्वागत व प्रास्ताविक जायंट्स फेडरेशनचे माजी अध्यक्ष राजू माळवदे यांनी केले. पत्रकार श्रीकांत काकतीकर यांनी सत्कारमूर्तींचा परिचय करून दिला. जायंट्सचे अध्यक्ष श्रीधन मुळीक यांनी आभार मानले. उपाध्यक्ष सचिन केळवेकर, फेडरेशनचे माजी सदस्य प्रवीण त्रिवेदी, एम. गंगाधर, संचालक विजय खोत व सदस्य उपस्थित होते.

यशस्विनी मंडळातर्फे कोरोना योद्धय़ांचा गौरव

बेळगाव : यशस्विनी महिला मंडळाच्यावतीने जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली. महानगरपालिकेच्या महिला सफाई कर्मचाऱयांनी कोरोना काळात स्मशानभूमीच्या स्वच्छतेची जबाबदारी आपल्या जीवावर उदार होऊन केली. महत्त्वाचे म्हणजे त्यांना जाण्या-येण्यासाठीसुद्धा व्यवस्था नव्हती. अशा कोरोना योद्धय़ा भारती चौगुले, जयश्री कोलकार, सुमित्रा कांबळे, महादेवी मादार, लीला कांबळे, माया कोलकार, महादेवी कोलकार व यल्लव्वा कांबळे यांचा यशस्विनी महिला मंडळाच्यावतीने साडी-चोळी देऊन सन्मान करण्यात आला.

सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक मंडळाच्या अध्यक्षा प्रमिला पाटील यांनी केले. याप्रसंगी मंडळाच्या उपाध्यक्षा ज्योती हंगिरगेकर, विद्या पिसाळे, राधा काळे, अरुणा कडूकर, गिरीजा काळे, जयश्री रेडेकर, सुरेखा पुरी, अंजली लाड, सुनीता भातकांडे, गीता जांभळे, सुलोचना राजगोळकर, सुरेखा तुडवेकर, अनिता भातकांडे, सीमा हंगिरगेकर यांसह मंडळाच्या सर्व सदस्या उपस्थित होत्या. मनीषा हंगिरगेकर यांनी आभार मानले.

Related Stories

चौगुलेवाडीतील 65 नागरिक निवारा केंद्रात

Omkar B

महिलेच्या गळय़ातील सोन्याचे गंठण भामटय़ांनी लांबविले

Patil_p

बँक ग्राहकांच्या खात्यातील रक्कम होतेय गायब

Patil_p

तालुक्यातील उत्तर भागात पावसामुळे मोठे नुकसान

Patil_p

खानापूर केएसआरपी रस्त्यावरील पुलाला भगदाड

Amit Kulkarni

अलायन्स एअरची पुणे-बेंगळूर सेवा 27 पासून होणार पूर्ववत

Patil_p
error: Content is protected !!