तरुण भारत

हस्तीदंती मनोऱयातील वादळ

राजेशाही आणि राजघराणी हा आजच्या काळात इतिहासाचा विषय आहे. तरीही काही देशात परंपरा म्हणून म्हणा किंवा ऐतिहासिक वारसा म्हणून राजघराण्यांना जपले जाते. त्यांना विशिष्ट पद्धतीचा मानसन्मानही मिळत जातो. अशा मोजक्मया देशात ब्रिटनचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागते. कारण ब्रिटनचे राजघराणे हे आजही तेथे सन्माननीय व प्रतिष्ठत मानले जाते. या राजघराण्यातील व्यक्तींचे विवाह प्रचंड मोठय़ा जनसमुदायापुढे संपन्न होतात. वाढदिवस आणि जयंत्यांची छायाचित्रे जगभर प्रसारित होतात. समारंभांचे त्या खास आकर्षण असतात आणि त्यांच्या अंत्ययात्राही शाही इतमामात निघतात. सामान्य जनता आणि राजघराण्यातील व्यक्तीत जगण्याच्या बहुतांशी बाबीत मोठाच विरोधाभास असतो.

पारंपरिकरीत्या, राजघराण्याचे निवासस्थान म्हणजे ‘राजवाडा’. कुटुंबातील सदस्यांचे वैयक्तिक जीवन आणि आम सर्वसामान्य जनजीवन यामध्ये एक अदृश्य पडदा (काहीजण याला आयर्न कर्टन असेही म्हणतात) टाकून आपल्या सदस्यांचे रक्षण करतो. अशावेळी आपल्या वैयक्तिक सुखदुःखांविषयी सार्वजनिक भाष्य न करणे, स्पष्टीकरणे व तक्रारींपासून अलिप्त राहणे या मर्यादा कटाक्षाने पाळण्याचा रिवाज राजघराण्यातील सदस्यांना पाळावा लागतो. एका दृष्टीने हे जीवन हा सोन्याचा पिंजरा आणि हस्तीदंती मनोरा यात व्यतित होणारे जीवन असते. या साऱया डामडौलाचा व त्यासह आलेल्या शिष्टाचारांचा प्रतिपाळ होत असताना कधीतरी हे संगमरवरी चित्र दुभंगून त्यामागचे विदारक वास्तव आकस्मिकपणे जगासमोर प्रकट होते. यापूर्वी प्रिन्स चार्ल्स यांच्या पत्नी डायना यांच्या शोकांतिकेने राजघराण्यातील बंदिस्त जीवनातील विदारकता स्पष्ट केली होती तर आता चार्ल्स यांचेच चिरंजीव प्रिन्स हॅरी आणि त्यांच्या पत्नी मेघन मार्कल यांच्या राजवाडा सोडण्याच्या निर्णयाने आणि चारच दिवसांपूर्वी उभयतांनी दिलेल्या जाहीर मुलाखतीच्या निमित्ताने ब्रिटिश राजघराण्यातील कच्चे दुवे आणि उर्वरित सामान्य जग यातील परस्पर संबंध पुन्हा चव्हाटय़ावर आला आहे.

Advertisements

सदर मुलाखतीतून हे स्पष्ट होते, की ‘वर्णद्वेष’ हे मेघन व हॅरी यांनी राजघराण्याशी नाते लौकीकदृष्टय़ा संपवण्याचे व राजवाडा सोडण्याचे प्रमुख कारण आहे. या दोघांचा विवाह 2018 साली झाला होता. मेघन या ऍफ्रो-अमेरिकन वंशाच्या आहेत. स्वाभाविकपणे त्यांच्या वर्णावरून आरंभी त्यांना टोमणे सहन करावे लागले. त्यानंतर बाळंतपणाआधी अपत्य किती काळे असेल याबद्दलची चिंताही त्यांच्या कानावर पडली. सदर मुलाखतीत हे स्पष्ट करताना अशी चिंता व्यक्त करणारी व्यक्ती ही राजघराण्यातील सदस्यच होती, असे मेघन यांनी सांगितले आहे. याच मुलाखतीत मेघन व हॅरी यांनी प्रसारमाध्यमांवर विशेषतः भडक मथळे छापणाऱया ब्रिटिश नियतकालिकांवर टीकेची झोड उठवली. ‘ही माध्यमे वर्णद्वेषी आहेत. त्यांनी आमच्याविरुद्ध विषारी वातावरण तयार केले. अशा मुद्रित माध्यमांबरोबर सोशल मीडियाने हातमिळवणी केली. त्यामुळे आम्हाला जगणेच मुश्कील झाले. अशावेळी राजघराण्यातून आमच्या बाजूने प्रतिक्रिया देण्यास कोणीही तयार झाले नाही’, अशी खंत या उभयतांनी व्यक्त केली.

एकंदरीत या समग्र मुलाखतीतील राजघराणे, तेथील दरबारी व कर्मचारी शिवाय पत्रकारिता यावरील आरोप पाहता लेडी डायनाच्या शोकांतिकेवरून कोणीच धडा घेतलेला नाही, असे दिसून येते. यावरून हे देखील समजून येते, की राजघराणे आणि त्यातील व्यक्तींची, अंतर्गत जग व बाहेरील जग यातील ताण पेलताना कशी ससेहोलपट होते. हॅरीचे म्हणणे तर असे आहे, की आपले वडील प्रिन्स चार्ल्स व भाऊ विल्यम हे सोनेरी पिंजऱयात जखडलेले आहेत. त्यांच्यावरील बंधने त्यांना कोणतीही अपारंपरिक हालचाल करण्यापासून परावृत्त करतात.

या पार्श्वभूमीवर या राजघराण्याच्या बाबतीत हेही दिसून येते, की त्यांचे शाही राहणीमान हे लोकांच्या पैशातून शक्मय झालेले आहे. या घराण्यास सुरक्षादेखील लोकांच्या पैशातूनच मिळते. परंपरेनुसार राजघराण्यातील व्यक्तींना विविध किताब समारंभपूर्वक दिले जातात. विविध उपक्रमात असणाऱया राजघराण्यातील विविध व्यक्तींसाठी मानव संसाधन विकास विभाग कार्यरत नसतो. कारण ही राजघराण्याची कौटुंबिक बाब असते. मात्र, तुम्ही कॅमेऱयासमोर काय करता हे महत्त्वाचे असते. कारण त्यामुळे राजघराण्यातील व्यक्ती, आपल्या संस्थेचे प्रतिनिधित्व करीत सार्वजनिक होत असते.

आज हे सारे पाहताना अनेक ब्रिटिश लोकांना हा प्रश्न पडतो आहे, की आधुनिक काळातील ब्रिटनसाठी राजघराण्याच्या अस्तित्वाचे प्रयोजन काय? एका दृष्टीने विचार केल्यास या प्रश्नात बरेच तथ्य आहे. प्रेंच राज्यक्रांतीनंतर अनेक देशातील राजेशाही सत्तांचा अस्त होऊन लोकशाही सत्ता प्रस्थापित झाल्या. एका दृष्टीने हा बदल चांगलाच होता. देशोदेशातील अनेक लोकशाही सरकारांनी राजे-राजवाडय़ांच्या मालमत्ता सरकारजमा केल्या. अनेक ठिकाणी त्यांचे तनखेही बंद करण्यात आले. जगभरात सर्वत्र असे बदल घडत असताना ब्रिटन मात्र या प्रक्रियेस मोठा अपवाद राहिला.

राजघराण्याच्या हातात काडीचीही सत्ता नसताना केवळ ब्रिटिश साम्राज्याची परंपरा जतन करण्यासाठी या देशाने राजघराण्याचे अस्तित्व काहीएक मान-मर्यादेसह अबाधित राखले. पण आधुनिक जग हे खूप जवळ आलेले जग आहे. ते पूर्णपणाने बदललेही आहे. अशा स्थितीत ब्रिटिश राजघराण्याच्या पारंपरिक वारशातून जर सकारात्मक काही पुढे न येता कालबाहय़ता व नकारात्मकता पुढे येत असेल तर या राजघराण्याचे बेगडी अस्तित्व काय कामाचे, असा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविकच आहे. ब्रिटनमधील अनेक सजग नागरिकांचा सध्या लोकशाही सत्ताधाऱयांसमोर हाच प्रश्न आहे. ब्रिटनमधील वर्णद्वेषाचा विचारही याच बरोबरीने व्हायला हवा.

अनिल आजगावकर

Related Stories

मत्स्य व्यवसायसाठी नव्या सरकारकडून अपेक्षा

Patil_p

म्हादईचे पाणी वळविल्याने गोव्याची बाजू लंगडी

Omkar B

देशभरात व्याघ्रमृत्यूची कारणे अस्पष्ट

Patil_p

मोदीजी: हीच ती वेळ, चीनला धडा शिकवा

Patil_p

रिफायनरीचा निर्णय लवकरच होणार?

Patil_p

हवामान बदलाचे वादळ

Patil_p
error: Content is protected !!