तरुण भारत

माजी आमदारांसह 19 जणांवर खूनाचा गुन्हा

मनोज घोरपडे, संग्राम घोरपडेंसह पाच जणांना अटक,

प्रतिनिधी/ कराड, वडूज

Advertisements

खटाव तालुक्यातील पडळ येथील के. एम. शुगर कारखान्यातील वरिष्ठ अधिकाऱयाच्या मृत्यू प्रकरणाने गंभीर वळण घेतले असून याप्रकरणी कराड पोलिसांतर्फे फिर्याद दाखल करण्यात आली आहे. मारहाणीच्या परिस्थितीजन्य माहितीसह शवविच्छेदन प्राथमिक अहवाल व तीन साक्षीदारांच्या जबाबावरून पोलीस उपनिरीक्षक भरत पाटील यांनी फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून कारखान्याचे संस्थापक चेअरमन, माजी आमदार प्रभाकर घार्गे, साहाय्यक चेअरमन मनोजदादा घोरपडे, कार्यकारी संचालक संग्राम घोरपडे यांच्यासह आठ तर अनोळखी दहा ते बारा जणांवर वडूज पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद झाला आहे. दरम्यान, मनोजदादा घोरपडे, संग्राम घोरपडे यांच्यासह इतर चौघांना अटक केली असून त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.

 पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, मयत जगदीप धोंडिराम थोरात (वय 40, रा. गोवारे, ता. कराड) हे के. एम. शुगर कारखान्यात वरिष्ठ अधिकारी पदावर कार्यरत होते. त्यांच्यासह अन्य काही अधिकारी, कर्मचाऱयांनी संगनमताने साखर पोत्यांची अफरातफर केल्याचा त्यांच्यावर संशय होता. यातूनच बुधवारी 10 फेब्रुवारीला त्यांना व्यवस्थापनाच्या दालनात सायंकाळी साडे पाच ते आठच्या दरम्यान फायबर काठी, लाकडी काठी, ऊस व लाथा बुक्क्यांनी मारहाण करून गंभीर जखमी केले, असा जबाब तीन साक्षीदारांनी दिला. त्याचदिवशी रात्री उशिरा जगदीप थोरात यांना जास्त त्रास होऊ लागल्याने कुटुंबीयांनी कराड येथील खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचार सुरू असताना थोरात यांचा गुरूवारी 11 रोजी सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला. या मृत्यूस कारणीभूत असणाऱया कारखाना पदाधिकारी व प्रशासनावर कठोर कारवाई करा अन्यथा मृतदेह ताब्यात घेतला जाणार नाही, असा पवित्रा मृताच्या नातेवाईकांनी तसेच गोवारे ग्रामस्थांनी घेतला. तसेच विक्रम आकाराम पाटील (रा. कापूसखेड, ता. वाळवा, जि. सांगली) यांनी जगदीप थोरात यांच्याबाबत घडलेला प्रकार कराड पोलिसांना सांगितला.

  पडळ कारखाना वडूज पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने सदरचा गुन्हा वडूज पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे. सखोल चौकशीअंती थोरात यांच्या मृत्यूप्रकरणी माजी आमदार घार्गे, मनोज घोरपडे, संग्राम घोरपडे, संचालक महेश घार्गे, कृष्णात शेडगे (मामा), सनी क्षीरसागर, अंजनकुमार घाडगे, अशोक नलवडे आदींसह अन्य दहा ते बारा जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सर्व संशयितांच्या विरोधात भादंवि कलम 302, 143, 147, 148, 149, 323 लावण्यात आले आहे. तर मनोज घोरपडे, संग्राम घोरपडे या बंधूंसह इतर चार जणांना पोलीसांनी अटक केली आहे.

  जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि मालोजीराव देशमुख तपास करीत आहेत.

मारहाणीच्या परिस्थितीवरून फिर्याद

जगदीप यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन कराडच्या उपजिल्हा रूग्णालयात करण्यात आले. दरम्यान, मयताचा इन्कवेस्ट पंचनामा, शवविच्छेदन अर्ज, वैद्यकिय अधिकारी यांच्याकडून मृत्यूबाबतचे प्रथमदर्शनी प्रमाणपत्र, तीन साक्षीदारांचे प्राथमिक तपासा दरम्यान नोंदविलेले जबाब यावरुन जगदीप धोंडीराम थोरात यास मारहाण झाल्याचे निष्पन्न झाले. यावरूनच कराडचे पोलीस उपनिरीक्षक भरत पाटील यांनी फिर्याद दिली आहे. हा गुन्हा तपासासाठी वडूज पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे.

Related Stories

नागरिकांनी गृह विलगीकरणाचे नियम पाळावेत : गृहराज्यमंत्री देसाई

Abhijeet Shinde

दरोडय़ाच्या गुह्यातील दोन आरोपी जेरबंद

Patil_p

कर्मवीर पुण्यतिथी कार्यक्रम रद्द

Patil_p

पाणी पुरवठा सभापती सीता हादगे ऑन फिल्ड

Patil_p

योग्य बाजू न मांडल्याने पुन्हा मराठा आरक्षण रद्द

datta jadhav

५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह तर ३०५ जणांचे रिपोर्ट आले निगेटिव्ह

Abhijeet Shinde
error: Content is protected !!