तरुण भारत

मोकाट कुत्र्यांचा धसका

कृष्णात पुरेकर / कोल्हापूर

जिल्ह्यात मोकाट कुत्र्यांकडून हल्ल्यांत जखमी होणाऱयांची संख्या प्रतिवर्षी 50 हजारांवर पोहोचली आहे. रेबिजने जिल्ह्यात 10 जणांचा बळी घेतला आहे. तसेच 1 लाख 35 हजार जण जखमी झाले आहेत. ही आकडेवारी हाफकीन संस्थेची आहे. देशभरातील रेबीज बळीची केंद्रीय आयुष मंत्रालयाने गंभीर दखल घेतली आहे. त्यातूनच 2030 पर्यत `भारत रेबीजमुक्त’साठी सूचना दिल्या. आता 7 वर्षात `कोल्हापूर रेबीजमुक्त’साठी ऍक्शन प्लॅनवर हालचाली सुरु झाल्या आहेत.

Advertisements

  जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत मोकाट कुत्र्यांकडून हल्ल्याच्या घटना वाढत आहेत. सीपीआरसह अन्य शासकीय रूग्णालयांत श्वानदंशाच्या रूग्णांची नोंद होत आहे. एकाचदिवशी 40 ते 50 जणांना श्वानदंश झाल्याच्या घटना ताज्या आहेत. श्वानदंशांवरील अँटीरेबीज लस शासकीय रूग्णालयात मिळत आहे. पहिला डोस मोफत असला तरी दुसऱया डोससाठी अत्यल्प शुल्क आकारले जात आहे. शहरात मोकाट कुत्र्यांना पकडून त्यांच्यावर नसबंदी केली जात आहे. तरीही मोकाट कुत्र्यांची संख्या वाढत आहे. ग्रामीण भागात मोकाट कुत्र्यांना पकडून त्यांच्यावर नसबंदी करण्यात निधीची कमतरता आहे.

  जिल्ह्यात गतवर्षी मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात 40 हजार 762 जण जखमी झाले. गेल्या 4 वर्षांत रेबीजने 10 जणांचा बळी घेतला आहे. नॅशनल ऍक्शन प्लॅन फॉर इलिमेंनेशन ऑफ डॉग मेडीटेड रेबीज इन इंडिया (नापरे) ही संस्था मोकाट कुत्र्यांचे हल्ले आणि रेबीज निर्मुलनासाठी कार्यरत आहे. या संस्थेने भारत रेबीजमुक्त करण्यासाठी काही मार्गदर्शक तत्वे आणि निश्चित असे धोरण आखले आहे. केंद्रीय आयुष मंत्रालयाने 2030 पर्यत भारत रेबीजमुक्त साठी पावले उचलली आहेत. प्रत्येक राज्याला त्यासाठी सूचना दिल्या आहेत. यामध्ये प्रत्येक जिल्ह्याने रेबीज निर्मुलनाचा कृती आराखडा तयार करावा,  अँटी रेंबीज क्लिनिक मॉडेल स्थापन करावे. रेबीज मृत्यूदर कमी करण्यासाठी जोखीम ग्रस्त गटात ऍटीरेबीज लसीकरण करावे, ग्रामपंचायत स्तरावर भटक्या कुत्र्यांचे लसीकरण व नसबंदी करण्याच्या सुचना दिल्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात मोकाट कुत्र्यांनी 10 जणांचा बळी घेतल्याने प्रशासनाने रेबीज निर्मुलनासाठी टास्क फोर्स स्थापन केला आहे. टास्क फोर्समध्ये राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी प्रशांत गायकवाड, नोडल अधिकारी तर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल माळी आणि उपवनसंरक्षक आर. आर. काळे यांचा समावेश आहे.

रेबीजमुक्त कोल्हापूरच्या कृती आराखड्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. येगेश साळे, डॉ. उषा कुंभार, डॉ. संतोष तावशी, डॉ. विनोद मोरे, डॉ. अनिता सैबन्नावर, डॉ. विजय कुलकर्णी, विजय पाटील, प्रतीक्षा लोळगे, के. एस. खतीब, प्रशांत संकपाळ, चंद्रकांत सुर्यवंशी, सपना घुणकीकर, रूपाली पवार, प्रवीण पवार, डॉ. विनोद पवार, डॉ. शुभांगी रेंदाळकर, डॉ. सॅम रूद्रीक अशा 23 जणांची समिती आहे.

हाफकीन संस्थेकडूनच श्वानदंश बळींची निश्चिती

श्वानदंशानंतर दिसून येणाऱया लक्षणांवरून रूग्णाची माहिती हाफकीन संस्थेला पाठवली जात आहे. त्याच्यांकडून नमुने तपासणीनंतरच रेबीज बळी निश्चित केले जात आहेत. जिल्ह्यातील श्वानदंशाचे 10 बळी असेच निश्चित झाले आहेत. गतवर्षी 40 हजार 762 जणांचा कुत्र्यांनी चावा घेतला. चार वर्षांत 1 लाख 34 हजार 381 जणांना श्वानदंश झाला आहे, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.

जिल्हा परिषद आरोग्य विभागाची आकडेवारी

वर्ष             संशयित रेबीज रूग्ण       रेबीज बळी

2017           22292                6

2018            35198                3

2019            36129                1

2020            40762               0

एकूण            1,34,381              10

Related Stories

पूरस्थिती टाळण्यासाठी धरणातून विसर्ग सुरु

Abhijeet Shinde

चौथी माळ : करवीर निवासिनीची आज ‘ओमकाररुपिणी’ स्वरूपात पूजा

Abhijeet Shinde

रांगोळीत सहकारी संस्थेचे धान्य दुकान फोडले

Abhijeet Shinde

कोल्हापूर : गगनबावडा तालुक्यात कोरोनाग्रस्तांची शंभरी पार

Abhijeet Shinde

‘कुंभी’ची २९२९ रुपये एफआरपी ऊस उत्पादकांच्या खात्यावर वर्ग : चेअरमन नरके

Abhijeet Shinde

कोल्हापूर : बंद बंगला फोडून ७५ हजाराचा ऐवज लंपास

Abhijeet Shinde
error: Content is protected !!