तरुण भारत

पराभवाची परतफेड करण्याचे आव्हान

इंग्लंडविरुद्ध दुसरी टी-20 लढत आज

अहमदाबाद / वृत्तसंस्था

Advertisements

पहिल्या सामन्यात पराभवाचा जबरदस्त शॉक बसल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ आज (रविवार दि. 14) इंग्लंडविरुद्ध होणाऱया दुसऱया टी-20 सामन्यात पलटवार करण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल, अशी अपेक्षा आहे. विराट, केएल राहुल, पंडय़ा व चहलसारखे मर्यादित षटकांचे स्पेशालिस्ट असतानाही पहिल्या सामन्यात पत्करावा लागलेला पराभव भारताच्या जिव्हारी लागणे साहजिक आहे. आजच्या लढतीला सायंकाळी 7 वाजता सुरुवात होईल.

)

एक्स फॅक्टर असणाऱया खेळाडूंकडून अधिक दमदार खेळाची अपेक्षा आहे, असे वक्तव्य विराटने यापूर्वी केले होते आणि त्याचा थेट रोख रिषभ पंत, हार्दिक पंडय़ा यांच्याकडे असू शकतो, असे एकंदरीत चित्र आहे. पंतने जोफ्रा आर्चरला रिव्हर्स स्कूप लगावला तर पंडय़ाने बेन स्टोक्सला मैदानावर लोळण घेत रॅम्प शॉट लगावत याची काही प्रमाणात प्रचिती दिली. या उभयतांकडून विराटला अशाच एकापेक्षा एक सरस फटक्यांची अपेक्षा आहे.

स्क्वेअर ऑफ द विकेट खेळताना भारतीय फलंदाजांचा खेळ अधिक बहरतो, असे सातत्याने दिसून आले आहे आणि 48 चेंडूत 67 धावांची आतषबाजी करणाऱया श्रेयस अय्यरचे उदाहरण यासाठी समर्पक स्वरुपाचे आहे. पंडय़ा (21 चेंडूत 19) व रिषभ पंत (23 चेंडूत 21) यांना उत्तम सुरुवात केल्यानंतर त्याचे मोठय़ा खेळीत रुपांतर करता आले नव्हते. ती कसर त्यांनी भरुन काढली तर ही बाब संघाच्या पथ्यावर पडू शकते. आर्चर व मार्क वूड यांनी वेगवान व थेट मारा करताना फटकेबाजीची फारशी मोकळीक दिली नव्हती. त्यावर भारतीय फलंदाजांना मार्ग शोधावा लागेल.

विराटने श्रेयस अय्यरच्या खेळीची मुक्त कंठाने प्रशंसा केली असून पहिल्या सामन्यातील त्याच्या अर्धशतकी खेळीनंतर सुर्यकुमार यादवला अंतिम संघात स्थान लाभण्यासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागू शकते, असे संकेत आहेत. अर्थात, पहिल्या लढतीत जे अनपेक्षित बदल झाले, ते पाहता येथेही त्याची पुनरावृत्ती झाली तर त्यात आश्चर्याचे कारण असणार नाही.

शिखरला आणखी संधी शक्य

डावखुरा सलामीवीर फलंदाज शिखर धवन यापूर्वी पहिल्या लढतीत सपशेल अपयशी ठरला. त्याला 12 चेंडूत 4 धावाच करता आल्या. आता केवळ एकाच लढतीतील कामगिरीवरुन त्याला संघातून वगळले जाणार नाही. पण, संघातील सर्वात वयस्कर खेळाडू असलेल्या धवनला किती संधी मिळणार, हे देखील पहावे लागेल.

पहिल्या सामन्यात आव्हानात्मक धावसंख्या हाताशी नसल्याने भारतीय गोलंदाजांसमोर अनेक मर्यादा होत्या. पण, यानंतरही त्यांनी जी निष्प्रभ गोलंदाजी केली, त्यामुळे, पहिल्या टी-20 सामन्याला एकतर्फी स्वरुप मिळाले, ही वस्तुस्थिती आहे.

प्रतिस्पर्धी संघ

भारत- विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, सुर्यकुमार यादव, रिषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पंडय़ा, यजुवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकुर, नवदीप सैनी, दीपक चहर, राहुल तेवातिया, इशान किशन (राखीव यष्टीरक्षक).

इंग्लंड- इयॉन मॉर्गन (कर्णधार), जोस बटलर, जेसॉन रॉय, लियाम लिव्हिंगस्टोन, डेव्हिड मलान, बेन स्टोक्स, मोईन अली, अदिल रशिद, रीस टॉपली, ख्रिस जॉर्डन, मार्क वूड, सॅम करण, टॉम करण, सॅम बिलिंग्ज, जॉनी बेअरस्टो, जोफ्रा आर्चर.

सामन्याची वेळ- सायं. 7 वा.

रोहित शर्माला आज खेळवणार का?

कर्णधार विराटने दिलेल्या माहितीनुसार, रोहित शर्माला काही सामन्यांमधून विश्रांती दिली जाणार आहे. रोहितने सलग 6 कसोटी सामने खेळले आहेत. शिवाय, ऑस्ट्रेलिया दौऱयापूर्वी त्याला 14 दिवस सक्तीचे क्वारन्टाईन पूर्ण करावे लागले होते. पण, रोहितचे आघाडी फळीतून खेळणे प्रचंड आवश्यक आहे, हे पहिल्या सामन्यात प्रकर्षाने दिसून आले आहे.  

पुन्हा तीन फिरकीपटू खेळवणार की सैनी, तेवातियाला संधी देणार?

भारताने यापूर्वी पहिल्या टी-20 सामन्यात यजुवेंद्र चहल, अक्षर पटेल व वॉशिंग्टन सुंदर असे 3 फिरकीपटू खेळवले. मात्र, याचा भारताला फटका सोसावा लागला. त्या पार्श्वभूमीवर, या लढतीत नवदीप सैनीला संधी दिली जाणार का, हे पहावे लागेल. अगदी चहलऐवजी राहुल तेवातियाला अंतिम संघातून खेळवणार का, याचीही उत्सुकता असेल.  

इंग्लंडची टी-20 वर्ल्डकपच्या पार्श्वभूमीवर जोरदार तयारी

इयॉन मॉर्गनसारखा आक्रमक कर्णधार लाभलेल्या इंग्लिश क्रिकेट संघाने ऑक्टोबरमध्ये भारतीय भूमीतच होणाऱया आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर जोरदार तयारी सुरु केली आहे, याचे प्रथमदर्शनी संकेत पहिल्या टी-20 सामन्यातून दिसून आले. दस्तुरखुद्द मॉर्गनने या यशाचे श्रेय आयपीएलमधील अनुभवाला दिले. इंग्लंडचे 12 खेळाडू सध्या विविध प्रँचायझींमधून आयपीएलमध्ये खेळत आहेत. आगामी टी-20 विश्वचषकासाठी इंग्लंड प्रबळ दावेदारांपैकी एक असून त्यांना या मालिकेत लगाम घालायचा असेल तर कर्णधार विराट, मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या कौशल्याची अर्थातच कसोटी लागणार आहे.

कोटस

पहिल्या सामन्यात पराभव पत्करावा लागला असला तरी आमच्यावर दडपण आहे, असे मला वाटत नाही. फक्त जी रणनीती निश्चित केली आहे, त्याची काटेकोर अंमलबजावणी केली जाणे आवश्यक आहे.

-मध्यफळीतील फलंदाज श्रेयस अय्यर

तूर्तास मला माझ्या खांद्याची अधिक काळजी घ्यावी लागेल. आगामी कालावधीत आयसीसी टी-20 विश्वचषक व ऍशेससारख्या महत्त्वाच्या स्पर्धां आहेत. त्यामुळे, येथे धोका स्वीकारुन चालणार नाही.

-इंग्लंडचा जलद गोलंदाज जोफ्रा आर्चर

सातत्याने शून्यावर बाद होणारा विराट आणि उत्तराखंड पोलिसांचे ट्वीट

भारतीय कर्णधार विराट कोहली सध्या खराब फॉर्ममध्ये असून मागील 2 डावात तो सलग शून्यावर बाद होत आला आहे. इंग्लंडविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात 5 चेंडूत शून्यावर बाद होण्यापूर्वी चेन्नईतील चौथ्या व शेवटच्या कसोटीतील दुसऱया डावात देखील भोपळा फोडण्यापूर्वीच बाद झाला. हा धागा पकडत उत्तराखंड पोलिसांनी विराटचे उदाहरण देत ट्वीट केले. या ट्वीटमध्ये ते म्हणतात, हेल्मेट लगाना ही काफी नही है! पुरे होशोहवास मी गाडी चलाना जरुरी है! वरना कोहली की तरह आप भी झिरो पर आऊट हो सकते हो!

Related Stories

‘डबल डिजिट’ पदके जिंकण्याचे भारताचे लक्ष्य

Amit Kulkarni

फुटबॉल सामन्यांचे यजमानपद रियल माद्रीद स्वीकारणार नाही

Patil_p

होबार्ट हरिकेन्सच्या विजयात मॅथ्यू वेडची चमक

Patil_p

भारत-श्रीलंका यांच्यात आज पहिली वनडे

Patil_p

मेस्सीच्या गोलसह पीएसजीची सिटीवर मात

Patil_p

भाविनाबेन पटेलचे टेटेमधील पदक निश्चित

Patil_p
error: Content is protected !!