तरुण भारत

मनोहर बिर्जे; रंगभूषेचा किमयागार हरपला

मनीषा सुभेदार / बेळगाव

बिर्जेमामा, एका वेडय़ाचे पात्र रंगवायचे आहे. तो वेडसर दिसेल, अशी रंगभूषा कशी करणार? नाटकातील एका पात्राने बेळगावचे रंगभूषाकार मनोहर बिर्जे यांना मुंबईमध्ये हा प्रश्न विचारला आणि बिर्जेमामा त्याचे उत्तर शोधण्यात मग्न झाले. प्रत्यक्षात रंगमंचावर वेडसर पात्र प्रकटले आणि टाळय़ांचा कडकडाट झाला. ही किमया होती बिर्जेमामा यांच्या रंगभूषेची!

Advertisements

दोन दिवसांपूर्वीच मनोहर बिर्जे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आणि बेळगावमधील तमाम कलाकारांच्या मनात त्यांच्याबद्दलच्या आठवणी दाटून आल्या. बिर्जेमामा म्हणजे रंगभूषेचा खरोखरंच किमयागार होते. जवळजवळ 83 वर्षांपर्यंत त्यांनी रंगभूषेचे काम नि÷sने पूर्ण केले. यंदा शारदोत्सव होऊ शकला नाही. अन्यथा, तरुणाईला लाजवेल अशा उत्साहाने ते रंगमंदिरमध्ये उपस्थित राहत.

वास्तविक बिर्जेमामांनी रंगभूषेचे कोणतेही प्रशिक्षण घेतले नाही. कुटुंबाचा चरितार्थ चालविण्यासाठी लग्नकार्यामध्ये स्वयंपाकाचे कंत्राट ते घेत. ज्या सफाईने त्यांचे हात स्वयंपाकाची पातेली उतरवत, त्याच सफाईने कलाकारांच्या चेहऱयावर ते रंगभूषा करत. त्यांचे काका लक्ष्मण बिर्जे नाटय़सृष्टीशी निगडीत होते. ते नाटकात काम करायचे. काकांची डेपरी (कपडेपट) सांभाळताना त्यांना नाटकाची आवड निर्माण झाली. रंगभूषेचे तंत्र समजले आणि मित्रमंडळींची रंगभूषा करून ते गणेशोत्सवात नाटक करू लागले. 1948 साली त्यांनी ‘अपराधी’ हे नाटक केले.

येथून त्यांचा नाटय़प्रवास सुरू झाला. अनेक नाटके त्यांनी बसविली. आरपीडी चौकामध्ये ‘नवा संसार’ नाटकाला झालेल्या गर्दीचे ते रसभरीत वर्णन करत. आज जेथे पंडित नेहरू शाळा आहे, तेथे पूर्वी अंबिका थिएटर होते. त्यावेळी पुरुषच स्त्री भूमिका करत. बिर्जेमामांनी ‘बायकोपेक्षा मेहुणी बरी’ या नाटकात मेहुणीची भूमिका करणाऱया पात्रावर सात डेस चढवले होते. आणि ही करामत पाहायला प्रेक्षकांची गर्दी उसळली होती.

भूमिका कोणती आहे, हे ते जाणून घेत आणि त्यानुसार रंगभूषा करत. त्यामुळे बिर्जेमामांनीच रंगभूषा करावी, यासाठी कलाकार तासन्तास प्रतीक्षा करण्यासाठीसुद्धा तयार असत. शारदोत्सव असो, भुवनेश्वरी उत्सव असो, अगदी अलीकडच्या काळात लोकमान्य सांस्कृतिक केंद्रातर्फे झालेली नाटके असोत, सर्व पात्रांची रंगभूषा बिर्जेमामांनीच केली आहे.

आर्थिक सुबत्ता नसली तरी लोकांना खिलवण्याची हौस त्यांना होती. बेळगावचे कलाकार दिल्ली किंवा मुंबई येथे निघाले की बिर्जेमामा सोबत असत. त्यांच्याकडे दोन डबे भरून पोहे असत. टेनमध्ये काकडी, नारळ असे जे काही मिळत असे ते घेऊन पोहे तयार करत आणि ट्रेनमध्येच सर्वांसाठी सकाळचा नाष्टा करत. विशेषतः लहान मुले भुकेली राहू नयेत, यावर त्यांचा कटाक्ष असे. पूर्वी वाहनांची सोय नव्हती, तेव्हा खानापूर-हल्ल्याळच्या जंगलात जाऊन पात्रांची रंगभूषा केली आहे. जीवनात त्यांनी अनेक कष्ट उपसले. पण कधीही त्याचा खेद किंवा विशाद त्यांच्या बोलण्यात आढळला नाही.

अत्यंत साधे आणि प्रसिद्धी परांङ्मुख असल्याने सरस्वतीचा वरदहस्त लाभुनही लक्ष्मी त्यांच्यापासून दूर राहिली. त्याची खंतही त्यांना नव्हती. आजवर शेकडो कलाकारांची रंगभूषा त्यांनी केली. रंगांशी एकरुप झालेले रंगभूषेचे किमयागार बिर्जेमामा यांच्या स्मृर्तीला बेळगावकर व कलाकारांतर्फे विन्रम अभिवादन.

वेडसर पात्र रंगविताना कमाल

प्रारंभी उल्लेख केलेले वेडसर पात्र रंगविताना बिर्जेमामांनी अक्षरशः कमाल केली. त्यांनी बराच विचार केला व पेटती मेणबत्ती उलटी करून पाण्यात धरली व त्या मेणाच्या टिकल्या एकत्र करून वेडय़ाचे पात्र रंगविले होते. ही किमया फक्त बिर्जेमामाच करू शकले.

Related Stories

इंडियन कराटे क्लबच्या कराटेपटूंचे यश

Amit Kulkarni

विमानतळावर होणार एव्हीएशन फ्यूअल स्टेशन

Patil_p

उपनोंदणी कार्यालयातील एका एजंटला कोरोनाची लागण

Patil_p

लोककल्पतर्फे गावातच उद्योग मिळेल

Amit Kulkarni

आता तरी बदनाम बिम्स जागे होणार का?

Amit Kulkarni

कुवेंपुनगर चोरीप्रकरणी दोन महिलांना अटक

Patil_p
error: Content is protected !!