तरुण भारत

भारत की इंग्लंड? फैसला आज

उभय संघातील पाचवी व शेवटची टी-20 आज, पुन्हा एकदा विराटसेनेकडून धडाकेबाज खेळीची प्रतीक्षा

अहमदाबाद / वृत्तसंस्था

Advertisements

चौथ्या सामन्यात आव्हानात्मक परिस्थितीत विजय खेचून आणत मालिकेत बरोबरी साधल्यानंतर आज (शनिवार दि. 20) भारतीय संघासमोर इंग्लंडविरुद्ध मालिकाविजयावर शिक्कामोर्तब करण्याचे लक्ष्य असेल. सध्या ही मालिका 2-2 अशी बरोबरीत असून यामुळे आजच्या पाचव्या व शेवटच्या टी-20 लढतीला अनन्यसाधारण महत्त्व असणार आहे. सायंकाळी 7 वाजता या लढतीला सुरुवात होईल.

या मालिकेत इशान किशननंतर सूर्यकुमार यादवने देखील शुक्रवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रथमच फलंदाजीला उतरण्याची संधी मिळाल्यानंतर याचा पुरेपूर लाभ घेतला आणि दणकेबाज अर्धशतक झळकावत आपल्या आगमनाची वर्दी दिली. तिसऱया क्रमांकावरील त्याची आक्रमक फलंदाजी अगदी दस्तुरखुद्द कर्णधार विराट कोहलीला देखील स्तिमित करुन गेली. या पार्श्वभूमीवर, सूर्यकुमारला आगामी वनडे मालिकेसाठी संधी दिली जाणे अपेक्षितच ठरले.

‘पहिल्याच सामन्यात असा आक्रमक खेळ साकारणे अजिबात सोपे नव्हते. आम्हा सर्वांसाठीच हा आश्चर्याचा धक्का होता. श्रेयस, हार्दिक व पंत ज्या आक्रमक पद्धतीने खेळतात, ते पाहता मी या सर्व युवा खेळाडूंचा फॅन झालो आहे’, असे स्वतः विराटने सांगणे यातूनच सर्व काही आले.

राहुल तेवातियाला पदार्पणाची प्रतीक्षा

इशान किशन व सूर्यकुमार या दोघांनीही ही आपली पदार्पणाची मालिका गाजवल्यानंतर आता हरियाणाचा अष्टपैलू राहुल तेवातियालाच फक्त पदार्पणाची संधी मिळणे बाकी राहिले असून शनिवारी ती संधी प्रत्यक्षात साकारली जाणार का, हे पहावे लागेल. हार्दिक पंडय़ा सलगपणे गोलंदाजी करु शकला आहे, ही देखील या मालिकेतून भारताला गवसलेली आणखी एक दिलासादायक बाब आहे. गुरुवारी त्याने 4 षटकांचा कोटा पूर्ण करताना 16 धावांमध्येच 2 बळी घेत आपली उपयुक्तता आणखी एकदा अधोरेखित केली.

केएल राहुल बहरण्याची गरज

यजुवेंद्र चहलच्या जागी संघात आलेल्या लेगस्पिनर राहुल चहरने देखील आपली जबाबदारी चोख पार पाडली. वॉशिंग्टन सुंदरसाठी मात्र हा जणू ‘बॅड डे इन द ऑफिस’ होता. केएल राहुलला अपेक्षित सूर सापडणे भारतासाठी आता अतिशय महत्त्वाचे ठरणारे आहे. भारताने नाणेफेक जिंकलेली नसतानाही विजय खेचून आणला, हे कर्णधार या नात्याने विराटला दिलासा देणारे ठरले आहे.

इंग्लंडला मलान-बटलरकडून अपेक्षा

दुसरीकडे, पाहुण्या इंग्लिश संघाला जोस बटलर व जागतिक क्रमवारीतील प्रथम मानांकित फलंदाज डेव्हिड मलान यांच्याकडून फलंदाजीत अधिक सातत्याची अपेक्षा आहे. जलद गोलंदाज जोफ्रा आर्चर व मार्क वूड प्रभावी ठरले आहेत. मात्र, त्यांना ख्रिस जॉर्डनकडून अपेक्षित साथ मिळालेली नाही. चौथ्या सामन्यात जॉर्डनची गोलंदाजी त्यांच्यासाठी भलतीच महागडी ठरली होती. त्या लढतीत त्याने 4 षटकात एकही बळी न घेता 41 धावा दिल्या.

प्रतिस्पर्धी संघ

भारत- विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पंडय़ा, यजुवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकुर, नवदीप सैनी, दीपक चहर, राहुल तेवातिया, इशान किशन.

इंग्लंड- इऑन मॉर्गन (उपकर्णधार), जोस बटलर, जेसॉन रॉय, लियाम लिव्हिंगस्टोन, डेव्हिड मलान, बेन स्टोक्स, मोईन अली, आदिल रशिद, रीस टॉपली, ख्रिस जॉर्डन, मार्क वूड, सॅम करण, टॉम करण, सॅम बिलिंग्ज, जॉनी बेअरस्टो, जोफ्रा आर्चर.

सामन्याची वेळ- सायं. 7 वा.

स्लो ओव्हर-रेटमुळे इंग्लिश संघाला दंड

भारताविरुद्ध चौथ्या टी-20 सामन्यात स्लो ओव्हर-रेटमुळे इंग्लिश खेळाडूंना 20 टक्के मानधन कपातीचा दंड ठोठावला गेला आहे. आयसीसी इलाईट पॅनेल मॅच रेफ्री जावगल श्रीनाथ यांनी या दंडात्मक कारवाईची घोषणा केली. मॉर्गनने स्लो ओव्हर-रेटची कबुली दिली आणि औपचारिक सुनावणीची आवश्यकता नसल्याचे कबूल करत दंडात्मक कारवाई मान्य केली.

विराट कोहलीचा सवाल, सॉफ्ट सिग्नल इतका महत्त्वाचा का?

मैदानी पंचांनी सॉफ्ट सिग्नलचा निर्देश जरी दिला असेल तरी तो परतावून लावण्यासाठी सुस्पष्ट पुराव्याची आवश्यकता का आहे, असा मुद्दा उपस्थित करत भारतीय कर्णधार विराट कोहलीने या तंत्राच्या परिपूर्णतेबद्दल साशंकता मांडली आहे. महत्त्वाच्या लढतीत कोणत्याही संघाला फटका बसू नये, असे साधेसोपे नियम असावेत, अशी अपेक्षा त्याने याप्रसंगी व्यक्त केली.

जसे सॉफ्ट सिग्नलचे आहे, त्याचप्रमाणे अम्पायर्स कॉलचे आहे. मैदानी पंच जो कल दर्शवतात, त्यापेक्षा वेगळे चित्र रिप्लेत दिसून येत असेल तर मैदानी पंचांचा निर्णय धुडकावून जे चित्र समोर दिसते आहे, त्याप्रमाणे निकाल द्यायला हवेत, असे विराटने पुढे नमूद केले.

भारतीय संघ फलंदाजी करत असताना 14 व्या षटकात सूर्यकुमार यादवला झेलबाद दिले गेले, त्यावेळी चेंडू मैदानाला स्पर्शला असल्याचे टीव्ही रिप्लेत स्पष्ट दिसून आले. मात्र टीव्ही पंचांनी मैदानी पंचांचा निर्णय (सॉफ्ट सिग्नल) बदलण्याचा निर्णय घेतला नव्हता. चित्र पुरेसे सुस्पष्ट होत नसल्याचे कारण त्यांनी दिले होते आणि यामुळे चेंडू जमिनीला स्पर्शला असल्याचे दिसून येत असतानाही सूर्यकुमारला बाद दिले गेले होते.

शेवटच्या षटकात वॉशिंग्टन सुंदरला झेलबाद दिले गेले, त्यावेळी आदिल रशीदचा झेल घेताना सीमारेषेला उजवा पाय लागला असल्याचे रिप्लेत दिसून येत होते. पण, यावेळी देखील चुकीचा निकाल दिला गेला. याचीही नाराजी विराटने या प्रतिक्रियेतून व्यक्त केली.

कोटस

मागील दोन-तीन हंगामात आर्चरच्या गोलंदाजीचा मी जवळून अभ्यास केला होता. नवा फलंदाज क्रीझवर येतो, त्यावेळी त्याची रणनीती काय असते, हे मी त्यावेळी अभ्यासले. याचमुळे मी त्याच्यावर पहिल्या चेंडूपासूनच आक्रमण करु शकलो. ज्या पद्धतीने बाद व्हावे लागले, त्याची मात्र मला खंत वाटत नाही. कारण, ज्या गोष्टी माझ्या हातात नाहीत, त्याचा विचार करण्यात काहीच हशील नाही.

मध्यफळीतील फलंदाज सूर्यकुमार यादव

चौथ्या सामन्यात आम्हाला पराभव पत्करावा लागला असला तरी दडपणाची स्थिती हाताळताना काय काय करावे लागते, याची तेथे उत्तम उजळणी झाली. आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या उंबरठय़ावर अशा सामन्यातील अनुभव आमच्यासाठी विशेष महत्त्वाचे ठरणार आहेत. आम्हाला या मालिकेतून स्वतःला विजयाची सवय लावून घ्यायची आहे.

-इंग्लंडचा स्टार अष्टपैलू बेन स्टोक्स

Related Stories

देशात कोरोनाने वेग वाढवला; 24 तासात 4213 नवे रुग्ण

datta jadhav

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंजाब सरकारकडून नवीन नियमावली जारी

pradnya p

महाराष्ट्राच्या 21 व्या कबड्डी दिनाचा कौतुक सोहळा रद्द!

Patil_p

इटलीचे शहर ‘वो’ जगासाठी आशेचा किरण

tarunbharat

प्रजासत्ताकदिनी दिल्लीत तिरंग्याचा अपमान पाहून देश दुःखी झाला

datta jadhav

कोल्हापूर जिल्ह्यात रात्री आठ पर्यंत 208 रुग्णांची भर, ८ मृत्यू

triratna
error: Content is protected !!