आटपाट नगर होते. त्यात अकबर आणि बिरबल यांनी जन्म घेतला होता. सगळय़ा जगात आली तशी आटपाट नगरातदेखील कोरोनाची साथ आली होती. रोज राजाचे सैनिक चौकाचौकात दवंडी पिटत आणि सांगत की घराबाहेर पडताना नाकावर मास्क लावा, गर्दीची ठिकाणे टाळा आणि स्वच्छता पाळा. पण ऐकतील तर ते लोक कसले. मास्क लावू नका, काही हितशत्रू सगळय़ा यात्रा उरूस जोमाने साजरे करा अशी लोकांना चिथावणी देत होते. काही हितशत्रू लोकांचे कोरोनाकडून भलत्याच गोष्टीकडे लक्ष वेधत होते. अशात काय झालं, एका उमरावाने अकबराचे कान भरले की महिला फाटकी जीन्स वापरतात, त्यामुळे आटपाट नगराच्या संस्कृतीला प्रचंड मोठा धोका निर्माण झाला आहे.
संस्कृतीला धोका म्हटल्यावर सगळे सत्ताधारी घाबरतात तसा बादशहा घाबरला. त्याने ताबडतोब फाटक्या जीन्सवर बंदी घालणारे फर्मान जारी केले. फर्मान जारी केल्याच्या दुसऱया दिवशी पहाटे बेगमसाहिबा बिरबलाच्या भेटीला आल्या. बिरबलाने त्यांचे यथोचित स्वागत केले आणि पहाटे येण्याचे कारण पुशिले.
“काय सांगू बिरबल, आम्ही दोनच दिवसांपूर्वी सहस्र सुवर्ण मोहरा खर्चून आमच्या लाडक्या दासींसाठी फाटक्या जीन्स आयात केल्या, आणि अचानक कोणा मुडद्याने जहापन्हांचे कान भरले… त्यांनी जीन्सविरुद्ध फर्मान काढले. आता तूच यातून काही मार्ग काढ.’’
बिरबलाने काही क्षण विचार केला आणि म्हणाला, “बेगमसाहिबा, अगदी सोपा उपाय आहे. राजदर्जीकडून पुढील आशयाचा अर्ज लिहून घ्या-राज्यात कोरोनाची साथ आली आहे. राज्याचे रक्षण करणे हे सर्व नागरिकांचे कर्तव्य आहे. त्यासाठी जीन्सचे हे नवे प्रारूप राज्यात आणले आहे. जीन्स पायांवर फाटलेली असल्यामुळे कोरोनाचा विषाणू फसेल आणि त्या ठिकाणी हल्ला करील. त्याला कात्रजचा घाट दाखवला जाईल. जीन्स फाटकी असली तरी तिच्या फाटलेल्या तुकडय़ाचा वापर करून शिवलेला जाडजूड मास्क नाकावर बांधल्यामुळे कोरोनापासून रक्षण होईल. तस्मात सर्व नागरिकांनी फाटकी जीन्स आणि त्याच कापडाचा मास्क वापरून स्वतःचे आणि राज्याचे रक्षण करावे. जहापन्हांनी त्यानुसार नवे फर्मान काढावे ही विनंती.’’
बेगमसाहिबांनी त्याबरहुकूम केले आणि बादशहाने नवे फर्मान काढले. जीन्सवरचे अरिष्ट टळले.
ही साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.