तरुण भारत

नागरिकत्व सुधारणा कायद्याचे भाजपचे आश्वासन

पश्चिम बंगालसाठी ‘संकल्पपत्र’ घोषित, शेतकरी, रोजगार आणि महिलांवर भर

कोलकाता / वृत्तसंस्था

Advertisements

रंगात आलेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुसाठी भारतीय जनता पक्षाने जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. त्याला ‘शोनार बांगला संकल्पपत्र’ असे नाव देण्यात आले आहे. राज्यात नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) लागू करण्यात येईल. प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीस नोकरी देण्यात येईल. राज्यात उद्योग वाढावेत आणि कृषी क्षेत्राचाही विकास व्हावा अशा प्रकारे धोरणे आखण्यात येतील, अशी अनेक महत्वाची आश्वासने त्यात देण्यात आली आहेत. बांगलादेशातून आलेल्या घुसखोरांची हकालपट्टी करण्याचे वचनही भाजपने दिले आहे.

राज्यात भाजपला बहुमत मिळाल्यास आपल्या सरकारच्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेतले जातील. त्यात नागरिकत्व सुधारणा कायदा राज्याला लागू करण्याचा निर्णय घेतला जाईल. नागरिकत्व कायद्याच्या आधारावर घुसखोरांची हकालपट्टी केली जाईल. तसेच राज्याच्या आर्थिक विकासाबरोबरच संस्कृतीचे संवर्धनही करण्याचे आश्वासन संकल्पपत्रात देण्यात आले आहे.

शहांच्या हस्ते प्रकाशन

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कोलकाता येथे अन्य भाजप नेत्यांसमवेत या संकल्पपत्राचे प्रकाशन केले. राज्यासाठी भाजपकडे अनेक अभिनव योजना आहेत. येथील लोकांच्या समस्या लक्षात घेऊन जाहीरनामा तयार करण्यात आला आहे. तो तयार करण्याआधी असंख्य सर्वसामान्य लोकांशी संपर्क साधण्यात आला असून त्यांच्याकडून सूचना घेण्यात आल्या आहेत, अशी माहिती शहा यांनी दिली.

घुसखोरीवर नियंत्रण

राज्याला बांगलादेशातून आलेल्या धर्मांध घुसखोरांची समस्या भेडसावत आहे. या घुसखोरांना रोखण्याचे कार्य केवळ भाजप करू शकतो. राज्यातील सध्याचे सरकार याच घुसखोरांचे तुष्टीकरण करण्यात मग्न आहे. भाजप सत्तेत आल्यास घुसखोरांना शोधून काढून देशाबाहेर घालविण्याचे कार्याचा आरंभ केला जाईल. हे करण्याची नितांत आवश्यकता आहे, असे प्रतिपादन शहा यांनी केले.

11 हजार कोटींचा निधी

बंगालच्या वैशिष्टय़पूर्ण कलांचे आणि संस्कृतीचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी 11 हजार कोटी रूपयांचा निधी देण्यात येईल. बंगाली साहित्य, संगीत आणि नृत्य यांना प्रोत्साहन या निधीतून देण्यात येईल. साहित्यासाठी नोबेल पुरस्काराच्या धर्तीवर रविंद्रनाथ टागोर यांच्या नावाने पुरस्कार सुरू करण्यात येईल. तसेच ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या नावाने पायाभूत सुविधा प्रकल्प आणि विकासकार्य सुरू करण्यात येईल, अशीही आश्वासने देण्यात आली आहेत.

बॉक्स

सुवेंदू अधिकारींचे पिता भाजपमध्ये

ममता बॅनर्जी यांचे एकेकाळी उजवे हात मानले गेलेले सुवेंदू अधिकारी आता नंदीग्राम मतदारसंघातून त्यांच्याशीच भाजपचे उमेदवार म्हणून लढत आहेत. त्यांचे पिता शिशिर अधिकारी हे तृणमूलचे लोकसभा खासदार असून त्यांनी रविवारी अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपमध्ये येणारे ते तृणमूलचे तिसरे खासदार आहेत. सुवेंदू यांचे बंधू शिवेंदू हे आमदार असून तेही भाजपच्या वाटेवर असल्याचे सांगितले जात आहे. नंदीग्राम मतदारसंघ साऱया भारताचे आकर्षण केंद्र असून तेथे आपले पुत्र सुवेंदूच विजयी होतील. ममता बॅनर्जी पराभूत होतील, असा विश्वास शिशिर अधिकारींनी केला आहे.

बॉक्स

भाजपची ‘स्कीम’…ममतांचा ‘स्कॅम’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालमधील बांकुरा येथील जाहीर सभेत ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँगेसवर भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप केला आहे. भाजप गरीबांसाठी आणि गरजवंतांसाठी ज्या कल्याणकारी योजना लागू करत आहे, त्यांना बॅनर्जी हरताळ फासत आहेत. भाजपच्या ‘स्कीम्स’ आहेत, तर तृणमूलचे ‘स्कॅम’ आहेत, अशा खोचक शब्दांमध्ये त्यांनी राज्य सरकारवर टीका केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही एग्रा व इतर स्थानी जाहीर सभा घेतल्या.

Related Stories

देशात 13,203 नवे बाधित

datta jadhav

मुकेश अंबानी जगातील श्रीमंतांच्या टॉप 10 यादीतून बाहेर

datta jadhav

देशात 24 तासात 9983 नवे कोरोना रुग्ण

datta jadhav

कर्जदारांना सोनेरी लाभ

Patil_p

इराणमध्ये खामनेईंच्या विरोधात निदर्शने

Patil_p

मंगळाच्या दिशेने चीनचे पडले पाऊल

Patil_p
error: Content is protected !!