तरुण भारत

थकीत एफआरपीप्रश्नी 5 रोजी साखर आयुक्तांना घेराव

सहकारमंत्र्यांकडून थकीत कारखान्यांचा आढावा घेण्याचे आश्वासन; पोलिसांनी घेतले शेट्टींना ताब्यात; विश्रामगृहावर सहकारमंत्री-शेट्टी चर्चा

प्रतिनिधी / कराड

Advertisements

राज्यातील अनेक साखर कारखान्यांनी एफआरपी रक्कम अद्याप दिली नसल्याने कारवाईच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी व कार्यकर्त्यांनी गुरुवारी येथे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र महामार्गावर माजी खासदार राजू शेट्टी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी स्वतः शासकीय विश्रामगृहावर येऊन शेट्टी यांच्याशी चर्चा केली. थकीत एफआरपीबाबत 1 तारखेला पुण्यात साखर आयुक्तांकडून आढावा घेतल्यानंतर आरआरसीबाबत निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले. दरम्यान, शेट्टी यांनी पत्रकारांशी बोलताना, शासनाने निर्णय न घेतल्यास 5 एप्रिलला साखर आयुक्तालयास घेराव घालणार असल्याचा इशारा दिला आहे.

राज्यातील अनेक साखर कारखान्यांनी एफआरपीची रक्कम पूर्णपणे दिली नसल्याने राजू शेट्टी यांनी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या सह्याद्री साखर कारखान्यावर आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला होता. मात्र गुरुवारी सह्याद्रीची वार्षिक सभा असल्याने शेट्टी यांच्यासह शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते अचानक येथे दाखल झाले. या आंदोलनाची कल्पना पोलिसांना लागल्याने त्यांनी शेट्टी यांना ताब्यात घेतले. त्यानंतर दुपारी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी स्वतः शासकीय विश्रामगृहावर राजू शेट्टी यांच्याबरोबर चर्चा केली. यावेळी विश्रामगृहावर उपस्थित कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.

सरकारकडून होत असल्याच्या कार्यवाहीची माहिती देत या प्रश्नावर एक तारखेला पुण्यात साखर आयुक्तालयात आपण सर्व कारखान्यांचा आढावा घेणार आहोत. त्यानंतर आरआरसी करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल, असे सहकार मंत्र्यांनी सांगितले. दरम्यान, राजू शेट्टी यांनी, शासनाने कारवाई न केल्यास पाच तारखेला पुण्यात साखर आयुक्तालयास घेराव घालून जाब विचारणार असल्याचे सांगितले. या पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

कारखाने कोणाचे हे पाहात नाही, नोटीस बजावल्या आहेत

एफआरपी 14 दिवसांत देणे बंधनकारक आहे. काही कारखान्यांनी दिलेली नाही. गेल्यावर्षी 95 टक्के साखर कारखान्यांनी एफआरपी दिली होती. यावर्षी हे प्रमाण 83 टक्के आहे. गेल्या दोन वर्षात ज्या कारखान्यांनी एफआरपी दिलेली नाही, त्यांची साखर ताब्यात घेऊन जिल्हाधिकाऱयांमार्फत विक्री करून शेतकऱयांना पैसे दिले आहेत. हे करताना कारखाना कोणाचा आहे, हे पाहिले जात नाही. यावर्षीही ज्या कारखान्यांनी एफआरपी दिलेली नाही, त्यांना नोटीस बजावल्या आहेत. 1 तारखेला पुण्यात आढावा घेऊन आरआरसी कारवाईबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. याबाबत राजू शेट्टी यांचे समाधान झाले आहे. यावर्षी साखरेचा भाव 3100 रूपये असून साखरेला उठाव नाही. त्यामुळे कारखान्यांनी एफआरपीचे हप्ते पाडले आहेत, असे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.

यापुढे गनिमी काव्याने आंदोलनाचा धमाका करू-शेट्टी

शेट्टी म्हणाले की, एफआरपी न देणाऱया कारखान्यांवर आरआरसी कारवाई करण्याचे आश्वासन सहकारमंत्र्यांनी दिले आहे. मात्र कारवाई न झाल्यास आम्ही 5 रोजी साखर आयुक्तालयाला घेराव घालून आंदोलन करणार आहोत. कोविडच्या पार्श्वभूमीवर आजच्या आंदोलनास जास्त कार्यकर्ते आलेले नाहीत. मात्र येथे आल्यानंतर मला विनाकारण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढचे आंदोलन गनिमी काव्याने करण्यात येईल. त्यावेळी धमाका होईल, असे ते म्हणाले. काही कारखान्यांच्या निवडणुका सुरू आहेत. जे कारखाने थकीत आहेत, त्यांचे रेव्हिन्यू रिकव्हरी सर्टिफिकेट जिल्हाधिकाऱयांकडे जाते. त्यामुळे जे कारखाने थकीत आहेत, त्या कारखान्यांच्या संचालकांना निवडणूक लढवण्याचा अधिकार नाही. त्यामुळे निवडणुकीत अशा संचालकांचे अर्ज बाद करावेत, असा निर्णय शासनाने घ्यावा अन्यथा याविरोधात आपण दाद मागणार आहोत. पोलिसांनी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही शेट्टी यांनी केला.

आंदोलन दडपण्याचा प्रश्नच नाही

शेतकरी संघटनेने 22 रोजी सहय़ाद्रि कारखान्यावर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. आज कारखान्याची वार्षिक सभा असून ते आंदोलनासाठी अचानक का आले, हे माहित नाही. मात्र आंदोलक कराड तालुक्यात आल्याने त्यांना भेटणे हे आपले काम आहे, या भावनेतून वार्षिक सभा असतानाही मी त्यांना भेटायला स्वतः विश्रामगृहावर आलो आहे. पोलिसांनी कोविडविषयक निर्बंधांच्या कारणावरून काही कारवाई केली असेल. त्यामुळे आंदोलन दडपण्याचा प्रश्नच नाही, असे मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.

कराड परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त

या आंदोलनामुळे शहर व परिसरात मोठय़ा प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. विश्रामगृहावरही बंदोबस्त होता. तेथे शेट्टी आणि सहकारमंत्र्यांची चर्चा सुरू असताना बाहेर घोषणाबाजी होत होती.

Related Stories

अभियंता नांगरे यांना 9 महिन्यांचे मानधन परत करण्याचे आदेश

Amit Kulkarni

सातारा : … सगळेच म्हणतात; आंदोलन झालेचं पाहिजे

datta jadhav

सातारा : कृष्णा, उरमोडीच्या वाळूला फुटतायत रात्रीचे पाय

datta jadhav

खंडाळा तालुक्यातील सात गावेे टंचाईग्रस्त

datta jadhav

कोंडव्यात आठ दिवसांपासून गढूळ पाणी पुरवठा

datta jadhav

सातारा : ‘छत्रपतींचे सेवक ग्रुप’कडून किल्ले अजिंक्यताऱ्याच्या राज महालाची स्वच्छता

triratna
error: Content is protected !!