तरुण भारत

‘डब्ल्यूएचओ’ची पटकथा!

जगाच्या कारभारावर नियंत्रण करणाऱया महासत्ता आणि त्या महासत्तांना उपयुक्त ठरतील अशी धोरणे राबवणाऱया किंवा दुसऱया महासत्तांबरोबर काम करणाऱया जागतिक पातळीवर संघटनांमध्ये कार्यरत असणारी मंडळी काही वैज्ञानिक आधारावर आपले धोरण आणि मत ठरवत असतात की कथा कादंबऱया वाचून आणि चित्रपट पाहून ठरवतात अशी शंका यावी असा कारभार कोरोनाच्या बाबतीत सुरू आहे. जागतिक पातळीवर कार्यरत असणाऱया एखाद्या संस्थेने एखादा धक्कादायक निष्कर्ष काढण्याचे ठरवले तर त्याला कोण रोखणार? त्यातही कोरोना सारख्या महाभयंकर परिस्थितीत ज्यांच्या निर्णयाकडे जगाचे लक्ष लागून राहिलेले असते अशा जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) एखादे मत बनवले तर ते पूर्णतः अभ्यासाअंती असणार असे मानावे लागते. पण, जर त्याच आरोग्य संघटनेने चीनला क्लीन चिट देत कोरोना विषाणूची निर्मिती चीनच्या वुहान येथील प्रयोगशाळेत नव्हे तर वटवाघळांपासून झाली आणि तेथून या विषाणूचा संसर्ग झाला असे एखाद्या चित्रपटाच्या शेवटातील कथानकाप्रमाणे जाहीर केले तर? लोक एक तर ’डब्ल्यूएचओ’ला नावे ठेवतील किंवा कोरोनाला ’चिनी व्हायरस’ म्हणणाऱया अमेरिका आणि इतर देशांना दोष देतील. अपेक्षेप्रमाणे या अहवालावर अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी बिल्कीन यांनी टीका केली आहे. डब्ल्यूएचओने आपल्या अहवालात काढलेला निष्कर्ष पाहता हा अहवाल लिहिण्यास चीनने मदत केली असावी असे बिल्कीन यांचे म्हणणे आहे. एक सध्याच्या आणि एक होऊ घातलेल्या महासत्तेमधील हा वाद आहे असे म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. जैविक अस्त्रांचा वापर भविष्यात सातत्याने केला जाऊ शकतो अशी शक्मयता जगभरातून व्यक्त केली जात असताना सगळय़ा जगाचा सखा असणाऱया चीनला इतक्मया सहजासहजी सुटका मिळाली तर त्यातून भविष्यातील धोके आणखी वाढण्याचीच शक्मयता आहे. याबाबत सुरुवातीपासूनच जागतिक आरोग्य संघटनेच्या भूमिकेबाबत संशय व्यक्त केला जात होता. यापूर्वीच ’डब्ल्यूएचओ’कडून चीनची पाठराखण होत असल्याचे आरोप झाले होते. 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी या काळात त्यांचे पथक चीनमध्ये होते. या पथकाने वुहानला पहिली भेट दिली. वुहान येथेच नोव्हेंबर-डिसेंबर 2019 मध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. त्यामुळे अमेरिकेने चीनवर माहिती दडपल्याचा आणि जैविक शस्त्र निर्मितीत सरसावल्याचा आरोप केला होता. डब्ल्यूएचओकडून अद्याप अधिकृत अहवाल जाहीर केला नसला तरी असोसिएटेड प्रेसने तो जगापुढे आणला असून त्यामुळे एकच खळबळ माजली आहे. कोरोनाचा विषाणू आणि चित्रपट, कथा-कादंबऱया यांच्यातील तंतोतंत वर्णने आणि दृश्ये आधीच चर्चेत आहेत. त्यात  2011 साली प्रदर्शित झालेल्या अमेरिकी थ्रीलर चित्रपट ‘कंटेजन’च्या पटकथेशी मिळताजुळता अहवाल डब्ल्यूएचओकडून सादर झाल्याने डब्ल्यूएचओ म्हणजे चीनची पाठराखी संघटना तर नाही ना अशी शंका घेण्यास वाव निर्माण झाला आहे. लेखक रॉबिन कुक यांच्या कंटेजन नावाच्या कादंबरीवर दिग्दर्शक स्टीवन सोडरबर्ग यांच्या त्याच नावाच्या चित्रपटात श्वसन आणि हाताच्या संपर्कातून जीवघेण्या विषाणूचा प्रसार होतो. बघता बघता तो जगभर पसरतो आणि मग जो हाहाकार उडतो त्याचे चित्रण केले होते. 2020 मध्ये कोरोनामुळे जी परिस्थिती निर्माण झाली ती जशीच्या तशी 2011 च्या या चित्रपटात दाखविण्यात आली होती आणि त्यामुळेच वैज्ञानिक अचूकतेबद्दल या लेखक आणि दिग्दर्शकाचे जगभर कौतुक झाले होते. पण, चित्रपटात शेवटी हा विषाणू आला कुठून, याचे उत्तर देण्यात आले होते. तेच उत्तर डब्ल्यूएचओने उचलले आणि आपल्या अहवालात तर ढकलले नाही ना अशी शंका वाटावी असा हा अहवाल आहे. अर्थातच अमेरिकेने जेव्हा वुहानच्या उल्लेखाने चीनवर आरोप केला होता तेव्हाही 40 वर्षांपूर्वी लिहिलेली, डियान कुंटज या अमेरिकन लेखकाची 1981 मध्ये प्रकाशित झालेली ‘द आईज ऑफ डार्कनेस’ ही थरारक कादंबरी चर्चेत होती. त्यात 2020 मध्ये घसा आणि फुफ्फुसाचे संक्रमण होईल असा साथीचा रोग पसरेल, एकाच वेळी अनेकांना त्याची लागण होईल आणि संपूर्ण जग त्यात होरपळून जाईल असा उल्लेख होता. त्यात ‘वुहान वेपन 400’ असा शब्दही आला होता. वुहान शहराबाहेरील एका प्रयोगशाळेत तो बनवला जाईल असेही या कादंबरीत म्हटले होते. विशेष म्हणजे 2020 सालीच या कादंबरीतील उल्लेख खरे ठरले. यावेळी चीन सत्य लपवत आहे. तो जैविक अस्त्र बनवण्याच्या प्रयत्नात आहे, असा संशय जगातील अनेक देशांनी व्यक्त केला होता. चीनने मात्र ही नैसर्गिक आपत्ती असल्याचा दावा केला होता. डब्ल्यूएचओच्या अहवालाने चीनच्या दाव्याला बळकटी मिळाली आहे. जैविक अस्त्र भविष्यकाळात जगातील सर्वात मोठी डोकेदुखी ठरेल हे कोरोनाने दाखवून दिले आहेच. असे असताना त्याकडे इतके सहजावरी पाहणे जागतिक आरोग्य संघटनेच्या लौकिकाला बाधा आणणारे आहे. तसेही अनेक कार्पोरेट कंपन्यांच्या उत्पादनांच्या जाहिरातीत डब्ल्यूएचओच्या नावाचा सर्रास वापर केला जातो. अमुक-तमुक उत्पादन हे डब्ल्यूएचओ प्रमाणित आहे असे सांगितले जाते. प्रत्यक्षात तो दावा खोटा ठरत असल्याचा अनुभव लोक घेत असतात. एखाद्या छोटय़ा उत्पादनाच्या बाबतीत त्यांचा दावा खरा ठरत नसेल तर जगभरात असलेल्या महामारी बाबत ज्याच्यावर आरोप केला आहे त्या देशाला त्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न त्या संस्थेने करावा का? आजपर्यंत चीनवर डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून आरोप होत आहेत म्हणून त्याला अनेकांनी गांभीर्याने घेतले नव्हते. हा त्यांच्या विश्वासार्हतेचा प्रभाव! पण आरोग्य क्षेत्रातील जागतिक संघटना म्हणवणाऱया संस्थेने आपला असा प्रभाव पाडणे आणि एखाद्या चित्रपटाची पटकथा क्लीन चिट म्हणून जगासमोर सादर करणे हे आक्षेपार्हच.

Related Stories

रेडझोनमधून बाहेर येण्यासाठी कठोर निर्णयांची गरज

Patil_p

महादेवांना मोहित केले

Patil_p

सत्ताधाऱयांना (अंदाजित) कौल!

Patil_p

महसुलाविना राज्य कारभार हाकणे झाले मुश्कील!

Patil_p

साधुलक्षणे-पराबोधकता, जगमित्रता

Patil_p

लसीकरण 100 कोटीपार

Amit Kulkarni
error: Content is protected !!