तरुण भारत

डॉक्टरांच्या दुर्लक्षपणामुळे सिव्हिलमध्ये महिलेचा मृत्यू

बिम्स प्रशासनावर कुटुंबीयांचा गंभीर आरोप : आरोग्य मंत्र्यांकडे तक्रार करणार

प्रतिनिधी / बेळगाव

Advertisements

डॉक्टरांच्या दुर्लक्षपणामुळे मजती (ता. हुक्केरी) येथील महिलेचा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. यामुळे त्या महिलेचे कुटुंबीय संतप्त झाले असून बिम्स प्रशासनाविरुद्ध त्यांनी गंभीर आरोप केला आहे. याप्रकरणी आरोग्य मंत्री डॉ. सुधाकर यांच्याकडे तक्रार करण्यात येणार आहे.

संतप्त कुटुंबीयांनी बिम्सचे वैद्यकीय संचालक डॉ. विनय दास्तीकोप्प यांची भेट घेऊन डॉक्टरांविरुद्ध गंभीर स्वरुपाचे आरोप केले. केवळ मोठी इमारत बनवून चालत नाही, त्या इमारतीत सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज असते. ज्या डॉक्टरांवर जबाबदारी आहे, त्यांनी सतत रुग्णांच्या आरोग्यावर लक्ष ठेवायचे असते. मात्र, सिव्हिल हॉस्पिटलचा सध्या कोंडवाडा झाला आहे, असा आरोप महिलेच्या कुटुंबीयांनी केला.

मजती येथील बसव्वा निंगाप्पा मंकाळे (वय 45) हिला 25 मार्च रोजी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. वैद्यकीय विभागात गेल्या सात दिवसांपासून तिच्यावर उपचार सुरू होते. केवळ शिकाऊ विद्यार्थी वगळता जबाबदार डॉक्टर या महिलेकडे फिरकले नाहीत किंवा उपचारही केले नाहीत.

उपचाराचा उपयोग न होता बसव्वा यांचा गुरुवारी मृत्यू झाला. त्यामुळे संतप्त कुटुंबीयांनी बिम्स प्रशासनाविरुद्ध गंभीर आरोप करीत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा घेतला. वेळेत उपचार न मिळाल्यामुळे सिव्हिलमध्ये अनेकांचा मृत्यू होत आहे. या इस्पितळात आर्थिक मागास व गोरगरीब उपचारासाठी येतात. राज्य सरकार कोटय़वधी रुपये खर्च करते, तरीही ते सर्वसामान्य रुग्णांपर्यंत उपचार पोहोचत नाहीत, असा आरोप गंगाधर दोडमनी यांनी केला आहे.

बसव्वा यांच्या मृत्यूला सिव्हिल हॉस्पिटलमधील डॉक्टर जबाबदार आहेत. त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी कुटुंबीयांनी केली. बिम्स प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. परिस्थिती तणावपूर्ण बनताच एपीएमसी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. बसव्वा यांची प्रकृती चिंताजनक होती तर त्यांना आयसीयुमध्ये का हलविले नाही? असा प्रश्न कुटुंबीयांनी उपस्थित केला.

संबंधित डॉक्टरांवर कारवाई केल्याशिवाय महिलेचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा कुटुंबीयांनी घेताच बिम्सचे वैद्यकीय संचालक डॉ. विनय दास्तीकोप्प यांनी त्यांची मनधरणी केली. कोरोना रुग्णांवर उपचारासाठी बेड राखीव ठेवण्यात आले आहेत. याबरोबरच तज्ञ डॉक्टरांना कॉलेजमध्येही शिकविण्यासाठी जावे लागते. ही व्यवस्था सुरळीत करण्यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत, असे सांगून त्यांनी वेळ मारून नेली.

Related Stories

केदनूरमधील शेतकऱयाची आत्महत्या

Patil_p

बारावीच्या निकालात चिकोडी 20 व्या स्थानी

Patil_p

देव आले…देव आले..अन् सारे पीक खाऊन गेले!

Omkar B

मनपा निवडणुकीबाबत न्यायालयामध्ये याचिका दाखल

Patil_p

राशीभविष्य

Patil_p

दीड दिवसांच्या गणरायाला निरोप

Patil_p
error: Content is protected !!