तरुण भारत

पुन्हा लॉकडाऊनची वेळ येऊ देऊ नका

कोरोना मार्गदर्शक तत्वांचे काटेकोर पालन करा : उपजिल्हाधिकारी गुरुदास देसाई यांचे आवाहन

प्रतिनिधी /पणजी

Advertisements

गतवर्षी कोरोनामुळे राज्यात करण्यात आलेल्या लॉकडाऊननंतर लोकांचे कसे हाल झाले व अनेकांवर कसे आर्थिक संकट कोसळले याचा अनुभव प्रत्येक गोमंतकीयांने घेतला आहे. आता पुन्हा एकदा कोरोनाची लाट आली असून दिवसेदिवस रुग्णसंख्या वाढतच आहे. अशा परिस्थितीत पुन्हा लॉकडाऊन करण्याची वेळ येऊ शकते. सरकारची तशी इच्छा नाही. परंतु लोकांचे सहकार्य न मिळाल्यास सरकारला तसे करणे भाग पडू शकते, त्यामुळे लोकांनी सर्व मार्गदर्शक तत्वांचे काटेकोर पालन करून  सहकार्य करावे, असे आवाहन तिसवाडीचे उपजिल्हाधिकारी गुरुदास देसाई यांनी केले आहे.

पणजीत जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी सायंकाळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यावेळी मामलेदार राहूल देसाई, चिंबलचे आरोग्याधिकारी डॉ. ज्युड, पोलीस उपअधिक्षक उत्तम राऊत देसाई, पणजीचे पोलीस निरीक्षक सुदेश नाईक, आणि अन्य अधिकाऱयांची उपस्थिती होती.

देशभरातील राज्यांच्या मुख्यसचिवांची शुक्रवारी सकाळी बैठक झाली. त्यानंतर सर्व जिल्हाधिकाऱयांच्याही बैठका झाल्या. त्यात धार्मिक स्थळे, व्यापारी आस्थापने, औद्योगिक केंद्रे, डॉक्टर्स, पोलीस अधिकारी आदींना सहभागी करून घेताना अनेक निर्णय घेण्यात आले. राज्यात सध्या कोविडची परिस्थिती गंभीर बनत आहे, रुग्णसंख्या वाढत आहे, याची त्यांना कल्पना देण्यात आली व सर्व सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले, असे देसाई यांनी सांगितले.

गर्दी टाळा, सामाजिक अंतर पाळा

सध्यातरी लॉकडाऊन हा पर्याय सरकारसमोर नाही. तरीही रोज वाढणारी रुग्णसंख्या पाहता गंभीरतेने विचार करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे विविध माध्यमांतून जनजागृती करण्याचे प्रयत्न होत आहेत. प्रत्येक व्यक्तीच्या प्रत्यक्ष योगदानाशिवाय कोरोना नियंत्रणात येऊ शकणार नाही. त्यासाठी प्रत्येकाने नव्या मार्गदर्शक तत्वांचे काटेकोर पालन करावे, गर्दी टाळावी, सामाजिक अंतर पाळावे, असे ते म्हणाले.

सर्वांनी लस घेण्यासाठी पुढे येण्याची गरज

दि. 1 एप्रिलपासून 45 वर्षे वयावरील नागरिकांना लस देणे प्रारंभ करण्यात आले आहे. ती लस घेण्यासाठी सर्वांनी पुढे यावे. लस घेणाऱयांची टक्केवारी 60 चा टप्पा पार करेल तेव्हाच हे संकट नियंत्रणात येऊ शकेल, असे देसाई यांनी सांगितले.

विनामास्क फिरणाऱयांवर दंडात्मक कारवाई

मास्क आणि सेनिटायझरचा वापर करणे प्रत्येकासाठी अनिवार्य असून कुणीही त्यात हयगय करू नये, असे ते म्हणाले. राज्यात येणारे पर्यटक बेपर्वाईने वागत असल्याचे पत्रकारांनी निदर्शनास आणून दिले असता, राजधानीत सर्व ठिकाणी तैनात पोलीस मास्क न वापरणाऱयांना दंड देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

रुग्ण सापडल्यास आस्थापन तीन दिवस बंद

एखाद्या आस्थापनात रुग्ण सापडल्यास तीन ते चार दिवसांसाठी ते आस्थापन बंद करण्यात येईल. तरीही त्यात हयगय दिसून आल्यास किंवा तेथील परिस्थिती नियंत्रणात येत नसल्यास त्याचा परवानाही निलंबित करण्याची कारवाई होऊ शकते, असा इशारा त्यांनी दिला.

Related Stories

सांखळी परिसरात गेले तीन दिवस जोरदार पाऊस

Amit Kulkarni

कृषी विकासासाठी पंचवार्षिक योजना तयार करा

Patil_p

गोव्याला देणार भ्रष्टाचारमुक्त सरकार

Amit Kulkarni

रवी नाईक यांची मडकईत पुन्हा ‘चाय पे चर्चा’

Patil_p

मडगावातील भाजपचे कार्यकर्ते एकसंघ

Amit Kulkarni

लोकमान्य मल्टिपर्पज को ऑपरेटिव्ह सोसायटी हरमल शाखेतर्फे शिक्षकांचा सत्कार

Amit Kulkarni
error: Content is protected !!