तरुण भारत

फोंडाघाटात कार दरीत कोसळली

कोल्हापूरचे दाम्पत्य जखमी : कार झाडाला अडकल्याने मोठा अनर्थ टळला : मोबाईलवरून मदत मागितल्यावर अपघात उघड

कणकवली:

Advertisements

कोल्हापूरहून गोव्याला जात असताना कारचालकाचा ताबा सुटल्याने कार थेट घाटातून खाली कोसळल्याची घटना फोंडाघाटात घडली. जवळपास 15 फूट खाली कोसळलेली कार सुदैवाने एका झाडावर विसावली. पोलीस नाईक योगेश राऊळ यांनी वेळीच घटनास्थळी दाखल होत, जखमींना कारबाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला. अपघातात प्रदीप धनपाल करढोणे (62) व त्यांच्या पत्नी स्वाती (55, रा. मंगळवारपेठ-कोल्हापूर) हे जखमी झाले. अपघात शुक्रवारी सकाळच्या सुमारास घडला.

प्रदीप व स्वाती हे कोल्हापूरहून होंडा अमेझ कारने गोवा येथे आपल्या मुलाला भेटण्यासाठी जात होते. घाटाच्या मध्यावर आल्यानंतर प्रदीप यांचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार उजव्या बाजूला येत खाली कोसळली. सुदैवाने कार कोसळताना एका झाडावर अडकून राहिली. जखमी दाम्पत्य कारमध्ये विव्हळत पडले होते.

प्रदीप यांनी मदतीसाठी जोरजोरात हाका मारल्या. मात्र, घाटापासून जवळपास 15 फूट खाली असलेली कार कुणाच्याच दृष्टीस पडली नव्हती. तशाही स्थितीत प्रदीप यांनी मोबाईलवरून आपल्या काही नातेवाईकांशी संपर्क साधून अपघाताची माहिती दिली. त्यानुसार एका नातेवाईकाने फोंडाघाट दूरक्षेत्राशी संपर्क साधला.

त्यानुसार कॉन्स्टेबल योगेश राऊळ यांनी तातडीने घटनास्थळ गाठले. तेथे शोध घेताना एका ठिकाणी दरीतून ‘हेल्प-हेल्प’ असा आवाज आला. राऊळ यांनी मार्गावरून जात असलेल्या एका दुचाकीस्वाराची मदत घेतली. त्यांनी खाली उतरून कारच्या काचा फोडून जखमींना बाहेर काढले. तोपर्यंत घटनास्थळी रुग्णवाहिकाही दाखल झाली होती. जखमींना फोंडाघाट प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तेथून अधिक उपचारासाठी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.

अपघाताची माहिती समजताच पोलीस निरीक्षक जसमुद्दीन मुल्ला, उपनिरीक्षक अनमोल रावराणे, सहाय्यक उपनिरीक्षक व्ही. एम. चव्हाण, राजेश उबाळे, हवालदार उत्तम वंजारे, कॉन्स्टेबल राजू तळसकर आदी घटनास्थळी व रुग्णालयात दाखल झाले होते. अपघाताची सायंकाळी उशिरापर्यंत कणकवली पोलिसांत नोंद नव्हती.

Related Stories

राऊत यांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेऊन होम क्वारंटाईन करा!

NIKHIL_N

राज्य उत्पादन शुल्कच्या सिंधुदुर्ग भरारी पथकाची बांद्यात कारवाई माणगाव येथील युवकाला घेतले ताब्यात

NIKHIL_N

चिपळूण चोऱया प्रकरणी आणखी दोघांना ताब्यात

Patil_p

जिल्हा बँकेची निवडणूक तीन महिने पुढे ढकलली

NIKHIL_N

हत्तींचा दिवसाढवळय़ा मुक्त संचार

NIKHIL_N

अग्निशामक केंद्रासह पालिकेची इमारत

NIKHIL_N
error: Content is protected !!