तरुण भारत

कोरोनाची त्सुनामी

कोरोनावरची लस आली की प्रश्न संपेल, कोरोना आटोक्यात येईल. हळूहळू कोरोनावर विजय मिळवला जाईल अशी समजूत असलेल्या सर्वांना मोठा धक्का बसला आहे. गेले चार दिवस देशात विशेषकरुन महाराष्ट्रात कोरोनाचे जे तांडव सुरु झाले आहे ते पाहता ही कोरोनाची दुसरी लाट नव्हे त्सुनामी आली आहे व त्यातून भयावह अवस्था निर्माण झाली आहे ती थरकाप उडवणारी आहे. कोरोनावरची लस आल्याने व कोरोनाची आकडेवारी घटल्याने, देश अनलॉक झाल्याने सैलावलेली गाफिल जनता या कोरोनाच्या नव्या त्सुनामीत भरडली जाते आहे. हसते-खेळते कुटुंब क्षणात होत्याचे नव्हते होते आहे. आयुष्यभराची पुंजी दवाखान्यावर खर्ची होते आहे. फटक्यावर-फटके बसत आहेत आणि कोरोना महामारीची महाभयंकर त्सुनामी लाट वेगाने झेपावते आहे. सन 2020 कोरोनाने गिळले. 2021 ही कोरोनाच्या तावडीत सापडले आहे. पुढे काय-काय वाढून ठेवले आहे माहीत नाही,  पण आलेल्या संकटाला छातीचा कोट करून सामोरे जाणे आणि नियमांचे पालक करुन कोरोनाला हरवणे आपल्या हाती आहे. पण दुर्दैवाने याबाबतीत फारसे गांभीर्य नाही. राजकारण सुरू आहे. निवडणुका, पोटनिवडणुका होत आहेत. मंत्रीपद धेक्यात आलेले मंत्री शक्तीप्रदर्शन करत आहेत. रस्त्यावरची गर्दी हटत नाही. लोक हनुवटीवर मास्क अडकवून मोकाट सुटले आहेत. दुकाने, हॉटेल्स, टपऱया, मंडई, सार्वजनिक वाहतूक कुठेही गंभीरतेने नियमांचे पालन होताना दिसत नाही. ओघानेच धोका वाढला आहे. कोरोना साखळी बळावली आहे आणि महाराष्ट्र कोरोना साथीच्या प्रसारात अग्रस्थानी आहे. कोरोनाचे समूळ उच्चाटन कोणत्याच देशात झालेले नाही. अनेक औषध कंपन्यांनी लसीचे संशोधन केले असून लसीकरणास प्रारंभ केला आहे. भारतात लसीचे दोन्ही डोस घेतले अशी कोरोना योद्धय़ांची फळी दिसते आहे. प्रारंभी कोरोना योद्धे मग 60 वर्षावरचे नागरिक व आता एक एप्रिलपासून 45 वर्षावरचे नागरिक यांना लस दिली जाते आहे. पण लसीकरणाला अजूनही मोठय़ा प्रमाणात गती दिली पाहिजे. लसीबाबत कोणत्याही शंका-कुशंका न काढता लस घेतली पाहिजे. पंतप्रधान, मुख्यमंत्री, प्रमुख डॉक्टर, आमदार, खासदार, नेते यांनी लस घेतली आणि लस सुरक्षित व उपयुक्त आहे असे असताना शंका-कुशंका घेऊन लसीकरण करुन घेण्यास विलंब करणे धोकादायक ठरु शकते. ओघानेच लसीकरणाला आता गती देण्यात आली आहे. लसीचा पहिला डोस घेतला म्हणजे आता भीती नाही अशी काहींची समजूत असली तरी ती चुकीची आहे. लस ही हेल्मेटसारखी आहे. हेल्मेट घातले म्हणजे अपघात होतच नाही असे नसते पण हेल्मेटमुळे धोका कमी होतो. दोन्ही डोस पूर्ण झाल्यावर शरीरात कोरोना प्रतिबंधक शक्ती तयार होते. पण मास्क, हात धुणे, सॅनिटायझर, अंतर या गोष्टींचे पालन करावेच लागणार आहे आणि खरे तर स्वच्छता आणि आरोग्य यासाठी आता ही नवी जीवनशैली सर्वांनाच कायमस्वरुपी स्वीकारावी लागणार आहे आणि ती स्वीकारणे यात वैयक्तिक व सामुदायिक हित आहे. कोरोना साथ आटोक्यात आली अशा देशात काही काळानंतर दुसरी, तिसरी लाट आली. कोरोनाचे थोडे रुप बदलले असे आपण बघतो आहोत आणि आपल्या देशात विशेष करुन महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट त्सुनामी स्वरुपात आल्याचे स्पष्ट दिसते आहे. 3 एप्रिलला एका दिवसात 89,128 नवे रुग्ण बाधित झाले व 714 रुग्ण मृत्यूमुखी पडले. 25 मार्चपासून चढत्या क्रमाने रोज किमान पन्नास हजार नागरिक कोरोनाबाधित होत आहेत. हे आकडे थरकाप उडवणारे आहेत. आजअखेर सुमारे 1 कोटी 24 लाख जणांना कोरोना बाधा झाली व सुमारे 1 लाख 64 हजार जणांचा मृत्यू झाला. कोरोनाबाधित होणारे रुग्ण वाढत आहेत. रोजचे त्यांचे प्रमाण जवळपास लाखाच्या वेगाने झेपावते आहे आणि त्यामध्ये महाराष्ट्र, मुंबई, पुणे, नागपूर ही शहरे आहेत. त्यामुळे कठीण अवस्था आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा संवाद व आवाहन लक्षात घेता पुन्हा आपली वाटचाल लॉकडाऊनच्या दिशेने सुरु आहे. जगभर जेथे दुसरी, तिसरी लाट आली तेथे हेच दृश्य व अनुभव आले आहेत. पण हेच अनुभव आपणास टाळायचे असतील तर घरात राहणे, गर्दी टाळणे, लसीकरण करुन घेणे व मास्क, सॅनिटायझर, अंतर या नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे. लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होते. रोजगार बंद पडतो. स्थलांतर होते. मंदी दाटते, भाकरीची भ्रांत होते याचा अनुभव आपण घेतला आहे. त्यामुळे लॉकडाऊन नको. कठोर निर्बध हवेत अशी मागणी आहे. पण कठोर निर्बध कागदावरच राहतात व मास्क गळय़ात लोंबकळत ठेवून माणसे गर्दी करतात हे आपण सर्वत्र पाहतो आहोत. देशाच्या तुलनेने महाराष्ट्रात कोरोना कहर का होतो आहे हे पाहिले, अनुभवले पाहिजे. मुख्यमंत्री ठाकरे म्हणतात आम्ही भरपूर चाचण्या करतो व एकही पेशंट दडवत नाही. त्यांच्या या म्हणण्याचा अर्थ अन्य राज्ये दडवादडवी करतात असाही निघू शकतो. तसे असेल तर ते भयानक आहे. एकूणच घोंगावत येणारी कोरोनाची ही त्सुनामी आक्राळ-विक्राळ आहे. तिला मोठय़ा संयमाने, धीराने व शिस्तीने  सामोरे जावे लागेल. त्यासाठीचा संकल्प करायला हवा. महाराष्ट्रात तिघाडीचे सरकार व कुरबुरी, भानगडी आहेत. त्या होत राहतील पण कोरोनाशी लढताना मुख्यमंत्र्यांनी सर्वांना बरोबर घेतले पाहिजे. थोडे कठोर झाले पाहिजे आणि वज्रमूठ करुन कोरोनाचा पाडाव केला पाहिजे. गेल्या वर्षी केरळमधून काही वैद्यकीय कर्मचारी व डॉक्टर यांना पाचारण करण्यात आले होते. सध्याही डॉक्टर व वैद्यकीय कर्मचारी यांचा तुटवडा आहे. तुर्त धोका वाढला आहे. कोरोनाची त्सुनामी घोंगावते आहे.

Related Stories

पुन्हा आपटले तोंडावर

Amit Kulkarni

करिअर की आत्महत्या?

Patil_p

माऊलींचे गणेशस्तवन

Patil_p

आता मोदींच्या भूमिकेकडे लक्ष

Patil_p

पवारांचा पॉवर डे

Patil_p

अमेरिकेत कोरोनाचे महाभयंकर संकट

Patil_p
error: Content is protected !!