तरुण भारत

परिवहन कर्मचाऱ्यांच्या संपामुळे, प्रवाशांचे हाल

प्रतिनिधी / बेळगाव

परिवहनच्या कर्मचाऱ्यांनी सहावा वेतन आयोग लागू करण्याबरोबर इतर मागण्यांसाठी बुधवारी काम बंद आंदोलन छेडले आहे. कर्मचारी सेवेतच हजर न झाल्याने बससेवा ठप्प झाली होती. परिणामी नेहमी प्रवाशांनी गजबजणाऱ्या बस स्थानकात वर्दळ थंडावलेली पहायला मिळाली. शिवाय बस बंद राहिल्याने प्रवाशांनी खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागला. सकाळच्या सत्रात बेळगाव बसस्थानकातून बेळगाव-कोल्हापूर, बेळगाव-हुबळी या दोन बस पोलिसांच्या संरक्षणात धावल्या.

परिवहनच्या कर्मचाऱ्यांनी डिसेंबरदरम्यान विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन छेडले होते. दरम्यान कर्मचाऱ्यांच्या अकरा मागण्यांपैकी सात मागण्या शासनाने मान्य केल्या होत्या. मात्र उर्वरित मागण्या मान्य न झाल्याने कर्मचाऱ्यांनी 7 एप्रिलपासून काम बंद आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी 1 एप्रिलपासून सेवेत हजर होवून विविध प्रकारे आंदोलन छेडत होते. दरम्यान दंडाला काळय़ा फिती बांधणे, आगारात गाडा उभारून वडापावची विक्री करण्यासारख्या माध्यमातून लक्ष वेधले. 7 एप्रिलपर्यंत कर्मचाऱयांच्या मागण्या मान्य न झाल्याने कर्मचारी आक्रमक झाले असून पुन्हा एकदा संपावर गेले आहेत.

कोणत्याही कारणास्तव राज्य परिवहन कर्मचाऱ्यांसोबत चर्चा करण्याचा प्रश्नच येत नाही, असे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे. बेमुदत संपावर जाणाऱ्यांवर ‘एस्मा’ (जीवनावश्यक वस्तू-सेवा) कायद्यासह कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला होता. मात्र कर्मचाऱ्यांनी याला न जुमानता आक्रमक भूमिका घेत बुधवारी संप पुकारला आहे. शिवाय कर्मचाऱयांना आंदोलन काळातील वेतन देखील दिले जाणार नाही, असे शासनाने स्पष्ट केले आहे. 

राज्यातील सर्व निगम- महामंडळामध्ये एक लाख वीस हजार कर्मचारी काम करतात. कर्मचारी चौवीस तास सेवेत असले तरी त्यांना अत्यंत कमी वेतनावर काम करावे लागते. त्यामुळे दैनंदिन जीवन जगताना अनेक अडचणींना सामना करावा लागत आहे. त्यामुळे सहावा वेतन लागू करण्याबरोबर उर्वरित मागण्या मान्य कराव्यात, या मागणीवर कर्मचारी ठाम आहेत. केएसआरटीसीच्या कर्मचाऱयांनी संप पुकारल्याने सर्व बस आगारात जाग्यांवर थांबून होत्या. तसेच प्रवाशांचीही चांगली गैरसोय झाली. प्रवाशांना इच्छितस्थळी पोहोचण्यासाठी खासगी वाहनांवरच विसंबून रहावे लागले. तसेच कर्नाटक परिवहनच्या कर्मचाऱयांनी आंदोलनाच्या इशारा दिल्याने महाराष्ट्रातून एकही बस बेळगाव बसस्थानकात दाखल झाली नाही. त्यामुळे आंतरराज्यात प्रवास करणाऱया प्रवाशांचे हाल झाले. बेळगाव बसस्थानकातून दररोज विविध मार्गांवर 620 हून अधिक बस धावतात. मात्र कर्मचाऱयांच्या संपावर सर्वच बस ठप्प झाल्यावर स्थानिक प्रवाशांचा लांबपल्ल्याच्या प्रवाशांना पर्यायी वाहनांचा आधार घ्यावा लागला. 

खासगी वडाप वाहनांची चंगळ

केएसआरटीसीच्या कर्मचाऱयांनी पुकारलेल्या संपामुळे बससेवा ठप्प झाली होती. त्यामुळे प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागला. त्यामुळे बुधवारी खासगी वाहनधारकांची चंगळ झाली. शिवाय रिक्षा, टॅक्सी, मॅक्सीकॅब यांना प्रवासी वाढले होते. शिवाय प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी खासगी वाहनांना परवानगी जिल्हाधिकारी डॉ. के. हरिशकुमार यांनी दिली होती.

Related Stories

अकरावी पुनर्परीक्षेचा निर्णय 17 मे नंतर

Patil_p

खानापूर शहराला दररोज पाणीपुरवठा करावा

Patil_p

राणी पार्वतीदेवी महाविद्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती

Patil_p

राणी चन्नम्मा फलक हटविल्याच्या निषेधार्थ रास्ता रोको

Patil_p

बेळगावात घरफोडय़ा करणाऱया जोडगोळीला अटक

Amit Kulkarni

17 जानेवारीला हुतात्मा दिन गांभिर्याने पाळा

Patil_p
error: Content is protected !!