तरुण भारत

”लसीच्या तुटवड्याबाबत केंद्राशी बोला, माध्यमांशी बोलून हात झटकणं बंद करा”

मुंबई / ऑनलाईन टीम

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज महाराष्ट्रात येत्या ३ दिवसांसाठी पुरेल इतकाच कोरोना लसींचा साठा शिल्लक असल्याचे सांगितले. यासोबतच मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी देखील मुंबईत ३ दिवसांचाच लसींचा साठा शिल्लक असल्याचे सांगत केंद्र सरकार महाराष्ट्राला सापत्न वागणूक देत असल्याचा आरोप केला होता. यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला आहे. राज्यातील मंत्री, मुख्यमंत्री यांनी माध्यमांशी बोलण्यापेक्षा केंद्र सरकारशी संवाद साधावा, असा त्यांनी सल्ला दिला आहे.

देवेंद्र फडणवीस माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, लसीकरणाबाबतचा आरोप चुकीचा आहे. मुळातच आपली लसीकरणाची क्षमता आणि टार्गेट ग्रुपला आवश्यक लसींचा पुरवठा आपल्याकडे नियमितपणे होत असतो. लसींचा देशभरात पुरवठा होत आहे. देशात सर्वात जास्त लसी महाराष्ट्राला मिळालेल्या आहेत. तीन दिवस पुरेल एवढा साठा संपायच्या आत पुढचा साठा येतो. रोज साठा येत असतो. आपल्याला काही लसींची साठेबाजी करायची नाही. भारत सरकार वेगळं नाही. या सगळ्या गोष्टी माध्यमात बोलण्याऐवजी भारत सरकारशी चर्चा करून का करता येत नाहीत. आपलं कुणी जाऊन दिल्लीत किंवा पुरवठादारांकडे जाऊन का बसत नाही. फक्त माध्यमांशी बोलायचं आणि हात झटकायचे हे बंद व्हायला हवं. गांभीर्य यायला हवं. प्रत्येक वेळी विरोधकांना म्हणायचं राजकारण करू नका आणि मंत्र्यांनी, मुख्यमंत्र्यांनी राजकारण करायचं हे बंद करा. लोकांच्या जिवाशी खेळू नका.

राज्यात विकेंडला दोन दिवस लॉकडाऊन आणि अन्य पाच दिवस कडक निर्बंध लावले जातील असं सरकारकडून सांगण्यात आलं. पण आज सातही दिवस 100 टक्के लॉकडाऊन असल्याचं चित्र राज्यात दिसत आहे. कडक निर्बंध आवश्यक आहेत. पण आता जे निर्बंध घातले गेले आहेत, ते विचार न करता घातले गेलेत. मला 17 असोसिएशनचे लोक आतापर्यंत भेटले. आम्ही कोरोना उपाययोजनांबाबत सरकारला पूर्ण पाठिंबा दिलाय. पण आता कडक निर्बंधांऐवजी सातही दिवस पूर्ण लॉकडाऊन दिसतोय. यामुळे व्यापारी आणि छोटे व्यावसायिकांसह सर्वसामान्य नागरिकाची फरफट होत असल्याचं पाहायला मिळतंय. सरकारने यावर चर्चा करुन मार्ग काढावा. अन्यथा उद्रेक होईल, असा इशाराही फडणवीसांनी राज्य सरकारला दिला आहे.

Related Stories

आरटीओची 98 खासगी बसेसवर कारवाई

Patil_p

पाच हजारपेक्षा जास्त पत्रकारांच्या आरोग्य तपासणीचा राष्ट्रीय विक्रम

triratna

जम्मू काश्मीरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 15 हजारांच्या उंबरठ्यावर

pradnya p

कोल्हापूर शहरात तीन कोरोना रुग्णांची भर

Shankar_P

‘भिलवाडा पॅटर्न’ देशभरात लागू होण्याची शक्यता

prashant_c

गणेशोत्सव सजावटीतून सेवा देणाऱ्या कलाकारांचा सन्मान

pradnya p
error: Content is protected !!