तरुण भारत

आजही सरकारी बससेवा ठप्पच राहणार

संपाचा तिढा कायम – परिवहन कर्मचारी मागण्यांवर ठाम

प्रतिनिधी/ बेंगळूर

सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारसीप्रमाणे वेतनवाढीची मागणी करणारे राज्य परिवहन मंडळाचे कर्मचारी आणि राज्य सरकार यांच्यातील तिढा अद्याप सुटलेला नाही. बुधवारी कर्मचाऱयांनी संप पुकारल्याने राज्यभरात बससेवा बंद केली गेल्याने प्रवाशांचे अतोनात हाल झाल्याचे पाहायला मिळाले. बसस्थानकावर दखल झालेल्या प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागला. वेतनवाढ आणि परिवहन कर्मचाऱयांना सरकारी कर्मचारी म्हणून दर्जा देण्यास सरकारने स्पष्टपणे नकार दिल्याच्या कारणास्तव  परिवहन कर्मचाऱयांनी बेमुदत संप पुकारला आहे. दरम्यान गुरूवारीही संप सुरूच राहणार असल्याचे कर्मचारी संघटनेने स्पष्ट केले आहे.

प्रवाशांना त्रास होऊ नये यासाठी राज्य सरकारने खासगी वाहनांची व्यवस्था केली असली तरी प्रवाशांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागले. परिवहन कर्मचारी कामावर हजर राहणार नसल्याचे लक्षात आल्यानंतर खासगी वाहनांनी मुक्तपणे बेंगळूरच्या केएसआरटीसी बसस्थानकात प्रवेश केला. बीएमटीसी बसेसची वाहतूक  बंद असल्याने कामावर जाणाऱया कर्मचाऱयांनी रिक्षांचा आधार घेतला तर काही चालतच कामावर गेले. सरकारी बस वाहतूक बंद करण्याबाबत कर्मचारी संघटनांमध्ये गोंधळ निर्माण झाला होता. बेमुदत बंदकडे लक्ष न देता बससेवा सुरू ठेवलेल्या बस चालकांचा सार्वजनिकांनी शाल, हार घालून सत्कार केला.

संपामुळे रस्त्यावर बसेस न धावल्याने दररोज कामावर जाणाऱयांना पर्यायी व्यवस्था शोधण्यासाठी अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या. मॅजेस्टिक सॅटेलाईट बसस्थानकासह शहरातील प्रमुख बसस्थानकात प्रवाशी नसल्याने शुकशुकाट पसरला होता. बेंगळुरात 30 लाख कर्मचारी बीएमटीसी बसेसवर तर 70 ते 80 लाख प्रवाशी इतर विभागाच्या बसेसवर अवलंबून आहेत. मात्र, बुधवारपासून परिवहन कर्मचाऱयांनी संप पुकारल्याने त्यांना खासगी वाहनांचा आधार घेतला. दरम्यान, विविध भागात खासगी वाहनांना मोठी गर्दी झाल्याचे दिसून आले. परिस्थिती लक्षात घेऊन अतिरिक्त रेल्वे सेवा आणि बेंगळुरात मेट्रो सेवा वाढविण्याचा निर्णयही सरकारने घेतला.

परगावी जाण्यासाठी बसस्थानकात आलेल्या प्रवाशांना खासगी वाहनांचाच अवलंब करावा लागला. बेंगळूर, कोलार, मंडय़ा, हुबळी, बागलकोटसह अनेक जिल्हय़ातील प्रवाशांनी खासगी बस, रिक्षा, कॅबचा आधार घेतला. दररोजच्या सरासरीच्या तुलनेत बुधवारी प्रवाशांची संख्या कमीच होती. कोप्पळ, तुमकूर, हावेरी, मंडय़ा, बागलकोट, चित्रदुर्ग रामनगर, नेलमंगल, यादगिरी, कोलारसह राज्यातील सर्व जिल्हय़ात परिवहन कर्मचारी कामावर हजर न राहिल्याने सरकारी बस वाहतूक बंद होती.

सरकारकडून पर्यायी व्यवस्था ः उपमुख्यमंत्री

परिवहन कर्मचाऱयांनी 9 मागण्यांपैकी 8 मागण्या पूर्ण करूनही बुधवारपासून राज्यभरात बससेवा बंद ठेऊन संप पुकारला आहे. गुरुवारीही संप सुरूच ठेवण्याचा निर्णय परिवहन कर्मचारी संघाने घेतला आहे. पण संपामुळे प्रवाशांचे हाल होऊ नयेत यासाठी सरकारने पर्यायी व्यवस्था केली. त्यामुळे सार्वजनिकांनी कोणतीही भीती बाळगू नये, असे आवाहन उपमुख्यमंत्री तथा परिवहन मंत्री लक्ष्मण सवदी यांनी केले आहे.

परिवहन कर्मचाऱयांचे वेतन वाढविण्यास सरकार कटिबद्ध असून 8 टक्के वेतनवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत निवडणूक आयोगाला पत्र लिहण्यात आले असून वेतनवाढीबाबत घोषणा करण्यास परवानगी देण्याची मागणी केली आहे. संप मागे घेऊन गुरुवारपासून कामावर हजर राहण्याची विनंती परिवहन कर्मचाऱयांना सवदी यांनी केली आहे.

कर्मचाऱयांनी अशापद्धतीने संप पुकारल्यास संस्थेला नुकसानीला सामोरे जावे लागते. त्यामुळे कर्मचाऱयांचे वेतन देण्यास समस्या निर्माण होतात. याचा कर्मचाऱयांनी विचार करावा, असेही ते म्हणाले.

मार्चमधील वेतन रोखणार

सरकारी बस वाहतूक बंद केलेल्या कर्मचाऱयांना धडा शिकविण्याचा विचार सुरू असून संप पुकारलेल्या परिवहन कर्मचाऱयांचे मार्च महिन्यातील वेतन रोखून ठेवण्याचा विचार राज्य सरकार करते आहे. चारही परिवहन निगमांना याबाबत सूचना देण्यात आली आहे. सरकारच्या मागणीकडे दुर्लक्ष करून संप सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतलेल्या प्रत्येक कर्मचाऱयाचे वेतन रोखून ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Related Stories

कर्नाटकात गेल्या एका वर्षात आठशेहून अधिक कंपन्या बंद

Shankar_P

कर्नाटक पोटनिवडणूक: भाजपचे उमेदवार राजेश गौडा विजयी

Shankar_P

रखवालदार महिलेचा निर्घृण खून

Omkar B

नगरपालिका अधिकाऱयांवर कारवाई करा

Patil_p

नंदगडमधील निषेध मोर्चाला प्रचंड प्रतिसाद

Patil_p

मनपा कार्यालयाला पोलीस छावणीचे स्वरुप

Amit Kulkarni
error: Content is protected !!