22 C
Belgaum
April 18, 2021
तरुण भारत

कर्मचाऱयांच्या संपामुळे प्रवाशांचे हाल

बेळगाव बसस्थानकातून बेळगाव-कोल्हापूर, बेळगाव-हुबळी दोन बसेस धावल्या पोलीस संरक्षणात

प्रतिनिधी / बेळगाव

परिवहनच्या कर्मचाऱयांनी सहावा वेतन आयोग लागू करण्याबरोबर इतर मागण्यांसाठी बुधवारी कामबंद आंदोलन छेडले. गुरुवारीही त्यांचा हा संप सुरूच राहणार आहे. कर्मचारी सेवेतच हजर न झाल्याने बससेवा ठप्प झाली होती. बस बंद राहिल्याने प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागला. सकाळच्या सत्रात बेळगाव बसस्थानकातून बेळगाव-कोल्हापूर, बेळगाव-हुबळी या दोन बस पोलिसांच्या संरक्षणात धावल्या.

परिवहनच्या कर्मचाऱयांनी डिसेंबरदरम्यान विविध मागण्यांसाठी कामबंद आंदोलन छेडले होते. दरम्यान, कर्मचाऱयांच्या अकरापैकी सात मागण्या शासनाने मान्य केल्या होत्या. मात्र, उर्वरित मागण्या मान्य न झाल्याने कर्मचाऱयांनी 7 एप्रिलपासून कामबंद आंदोलनाचा इशारा दिला होता. सरकारचे लक्ष वेधण्यासाठी 1 एप्रिलपासून सेवेत हजर होऊन विविध प्रकारे आंदोलन छेडत होते. दरम्यान, दंडाला काळय़ा फिती बांधणे, आगारात गाडा उभारून वडापावची विक्री करण्यासारख्या माध्यमातून लक्ष वेधले. 7 एप्रिलपर्यंत कर्मचाऱयांच्या मागण्या मान्य न झाल्याने कर्मचारी आक्रमक झाले असून पुन्हा एकदा संपावर गेले आहेत.

कोणत्याही कारणास्तव राज्य परिवहन कर्मचाऱयांसोबत चर्चा करण्याचा प्रश्नच येत नाही, असे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे. बेमुदत संपावर जाणाऱयांवर ‘एस्मा’ (जीवनावश्यक वस्तू-सेवा) कायद्यासह कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला होता. मात्र, कर्मचाऱयांनी याला न जुमानता आक्रमक भूमिका घेत बुधवारपासून संप पुकारला आहे. शिवाय कर्मचाऱयांना आंदोलन काळातील वेतनदेखील दिले जाणार नाही, असे शासनाने स्पष्ट केले आहे. 

राज्यातील सर्व निगम-महामंडळांमध्ये एक लाख वीस हजार कर्मचारी काम करतात. कर्मचारी 24 तास सेवेत असले तरी त्यांना अत्यंत कमी वेतनावर काम करावे लागते. दैनंदिन जीवन जगताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे सहावा वेतन आयोग व उर्वरित मागण्या मान्य कराव्यात, या मागणीवर कर्मचारी ठाम आहेत. कर्मचाऱयांनी संप पुकारल्याने सर्व बस आगारात जागेवर थांबून होत्या. प्रवाशांची मात्र, गैरसोय झाली. प्रवाशांना इच्छितस्थळी पोहोचण्यासाठी खासगी वाहनांवरच विसंबून राहावे लागले. कर्नाटक परिवहन कर्मचाऱयांनी आंदोलनाचा इशारा दिल्याने महाराष्ट्रातून एकही बस बेळगाव बसस्थानकात दाखल झाली नाही. त्यामुळे आंतरराज्य प्रवास करणाऱया प्रवाशांचे हाल झाले. बेळगाव बसस्थानकातून दररोज 620 हून अधिक बस धावतात. मात्र, कर्मचाऱयांच्या संपामुळे सर्वच बस ठप्प झाल्याने स्थानिक प्रवाशांसह लांब पल्ल्याच्या प्रवाशांना पर्यायी वाहनांचा आधार घ्यावा लागला. 

खासगी वडाप वाहनांची चंगळ केएसआरटीसीच्या कर्मचाऱयांनी पुकारलेल्या संपामुळे बससेवा ठप्प झाली होती. त्यामुळे प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागला. त्यामुळे बुधवारी खासगी वाहनधारकांची चंगळ झाली. रिक्षा, टॅक्सी, मॅक्सी कॅब यांना प्रवासी वाढले होते. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी खासगी वाहनांना जिल्हाधिकारी डॉ. के. हरिषकुमार यांनी परवानगी दिली होती.

Related Stories

निपाणीत हुतात्मादिन गांभीर्याने

Patil_p

आरपीडी-वडगाव रोडवर बोलेरो वाहन उलटले

Amit Kulkarni

शाहूनगर येथील जोशी कॉलनीत जलवाहिनीला गळती

Omkar B

उचगाव साहित्य संमेलनातर्फे कवींना नावनोंदणीचे आवाहन

Amit Kulkarni

होनगा येथील मंदिरांच्या ट्रस्टी- पुजाऱयाची चौकशी करा

Patil_p

होनकुप्पी, हत्तरवाट येथे स्फोटके जप्त

Amit Kulkarni
error: Content is protected !!