तरुण भारत

शाहूपुत्र छत्रपती राजाराम महाराजांचे चित्रमय चरित्र!

इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांची निर्मिती : राजारामकालिन दुर्मीळ घटनांना मिळणार उजाळा

संजीव खाडे / कोल्हापूर

Advertisements

लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांचे सुपुत्र छत्रपती राजाराम महाराज करवीर संस्थानचे अधिपती असताना त्यांच्या काळातील दुर्मीळ अशा ऐतिहासिक घटना, प्रसंग आता चित्रमय चरित्र अर्थात फोटोबायोग्राफीच्या रूपाने नव्या पिढीच्या भेटीला येणार आहे. युवा इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी राजर्षी शाहू महाराजांवरील फोटोबायोग्राफी यापूर्वी प्रकाशित केली होती. त्यानंतर आता छत्रपती राजाराम महाराज यांच्या जीवनातील महत्वाचे प्रसंग शब्द आणि छायाचित्रमय चरित्र लवकरच प्रकाशित केले जाणार आहे.

राजर्षी शाहू महाराज यांनी सर्व क्षेत्रात दूरदृष्टीतून साकारलेले सर्वव्यापी कार्य सर्वश्रुत आहे. त्यांनी लढलेल्या सामाजिक क्रांतीतून बहुजन समाजाला दिशा मिळाले. त्यांचे सुपुत्र असणाऱ्या छत्रपती राजाराम महाराजांनी कोल्हापूरच्या विकासात भर घातली. त्यावेळी राजारामपुरी, लक्ष्मीपुरी, शाहूपुरी उभारून त्यांना गावठाणाशी जोडणारे सर्व पूल हे राजाराम महाराजांच्या कल्पनेतून उभारले गेले.

कोल्हापूरच्या एक्स्टेशनचा भाग विकसित झाला. शैक्षणिक विकासाचे मोलाचे कार्य केले. आजच्या कोल्हापूरवर शाहू महाराजांच्याबरोबरीने राजाराम महाराजांच्या कल्पकतेची छाप आहे. शाहू महाराजांची सर्व अधुरी स्वप्ने, योजना आणि उपक्रम राजाराम महाराजांनी पूर्ण केले. पण शाहूरूपी वटवृक्षाच्या विशाल कार्याच्या सागरात राजाराम महाराजांचे कार्य तितके मोठे असून झाकोळले गेले. आजही राजाराम काळात झालेली अनेक कार्ये, योजना शाहू काळात झाल्याचे समज आहेत. इंद्रजित सावंत यांनी राजाराम महाराजांच्या कार्याला आणि त्यांच्या जीवनातील महत्वाचे प्रसंग यांना उजाळा देण्यासाठी राजाराम छत्रपती : फोटोबायोग्राफी नावाचे २४० पानांचे पुस्तक प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला. पुस्तकाचे काम पूर्ण झाले आहे. यामध्ये माहितीसह दुर्मीळ अशी ३५० हून अधिक छायाचित्रे आहेत.

इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांची निर्मिती

शाहू महाराजांनंतर राजाराम महाराजांवर पुस्तक

श्री राजाराम छत्रपती : फोटोबायोग्राफी या पुस्तकाविषयी माहिती देताना इंद्रजित सावंत म्हणाले, शाहू महाराजांवरील फोटाबायोग्राफी प्रकाशित केल्यानंतर अनेक शाहूप्रेमींनी छत्रपती राजाराम महाराजांवरही अशाच प्रकारचे पुस्तक तयार करण्याचा आग्रह केला होता. त्यामुळे दोन तीन वर्षांपासून राजाराम महाराजांवरील माहिती व साहित्य संकलन सुरू केले. दुर्मीळ छायाचित्रे, कागदपत्रे मिळाली. युवराज मालोजीराजे यांनीही सहकार्य केले. कोल्हापुरात अनेक घराण्यातील व्यक्तींनी माहिती, कागदपत्रे, छायाचित्रे दिली. त्यातून राजाराम महाराजाच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकणे सुलभ झाले. प्रत्यक्षात पुस्तक जेंव्हा वाचकांच्या हाती येईल तेव्हा ते राजारामकाळात नेणारे असेल, असा विश्वास वाटतो.

श्री राजाराम छत्रपती : फोटोबायोग्राफीमध्ये काय काय आहे

विवाहसोहळ्यात बाशिंग बांधून असलेले राजाराम महाराज, कन्या प्रिन्सेस पद्माराजे, पत्नी ताराबाई आणि राजाराम महाराज एकत्रित असलेले दुर्मीळ छायाचित्र, शाहू महाराजांच्या दसरा चौकातील पुतळ्याचे अनावरण, कोल्हापूर नगरपालिकेच्या इमारतीचा उद्घाटन सोहळा, उजळाईवाडीतील विमानतळाचे उद्घाटन, कोल्हापूर शुगर मिलच्या (आताचा राजाराम साखर कारखाना) गव्हाणीत उसाची मोळी टाकणारे राजाराम महाराज, नवीन राजवाड्यातील शाही दरबारातील दुर्मीळ प्रसंग, पकडलेल्या चित्यांसमावेश राजाराम महाराज, राजवैभवाचे दर्शन घडविणाऱ्या परदेशी बनावटीच्या रोल्स राईल कार समवेत राजाराम महाराज, करवीर निवासिनी अंबाबाईची राजाराम महाराजांनी पूजा केली होती.

त्यावेळी प्रकाशित झालेल्या वृत्तपत्रातील बातम्या, अंबाबाईच्या मंदिरातील गरूड मंडपाचे आणि अंबाबाई मंदिराचे दुर्मीळ छायाचित्र, बडोदा नरेश सयाजीराव गायकवाड यांचे कोल्हापुरातील आजवर कधीही न पाहिलेले छायात्रित, राजाराम कालिन कुस्ती मैदान आणि मल्लाप्पा तडाखे सारख्या मल्लांची छायाचित्रे, राजाराम महाराजांच्या लग्नाची पत्रिका, विमानतळाची निमंत्रण पत्रिका, घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना कोल्हापूर संस्थानने दिलेली वकिलीची प्रॅक्टिस करण्यासाठी दिलेली सनद, पन्हाळा गडावर दिलेली जागा, कलामहर्षी बाबुराव पेंटर यांनी काढलेले राजाराम महाराजांचे चित्र आदींसह राजारामकालिन इमारती, पूल व इतर अनेक छायाचित्रे या पुस्तकात आहेत.

पुस्तक निर्मितीतील शिलेदार
राजाराम छत्रपती : फोटोबायोग्राफी पुस्तकाचे संपादक आणि लेखक इंद्रजित सावंत, डॉ. देविका पाटील आहेत. गणेशकुमार खोडके, अमित आडसुळे, ओंकार कोळेकर, राम यादव यांनी संकलन सहाय्य केले आहे. पुस्तक विद्यमान श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांना अर्पण केले आहे.

३१ मे रोजी प्रकाशन
राजाराम महाराजांचा राज्याभिषेक ३१ मे रोजी झाला होता. त्यामुळे त्यांनी आपल्या काळातील अनेक योजना, उपक्रमांचे उद्घाटन ३१ मे रोजी केले होते. तो धागा पकडून चित्रमय चरित्र पुस्तकाचे प्रकाशन ३१ मे रोजी करण्याचा मानस इंद्रजित सावंत यांनी व्यक्त केला.

Related Stories

कोल्हापूर : मुक्तसैनिक वसाहतीमध्ये घरफोडी

Abhijeet Shinde

कोल्हापूर : उदगांव ग्रामपंचायतीत मंत्री यड्रावकर यांची आढावा बैठक

Abhijeet Shinde

राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे उघडले

Abhijeet Shinde

पुलाची शिरोली प्राथमिक आरोग्य केंद्रात ड्राय रनची प्रात्यक्षिके

Abhijeet Shinde

गांधीनगर येथे एकाचा खून, एक ताब्यात तर एक फरारी

Abhijeet Shinde

वडाप चालकांचे मंत्री शंभूराज देसाई यांना निवेदन

Abhijeet Shinde
error: Content is protected !!