तरुण भारत

निवडणूक काम बंधनकारक राहणार

जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न केल्यास कारवाई : साहाय्यक निवडणूक अधिकाऱयांची माहिती

प्रतिनिधी / बेळगाव

Advertisements

कोरोना विषाणूच्या प्रसारामुळे मतदान केंद्रांची संख्या वाढविण्यात आली आहे. त्यामुळे कर्मचाऱयांची संख्या वाढविण्यात आली आहे. मात्र काही अधिकारी व कर्मचारी निवडणुकीचे काम टाळण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण दि. 12 रोजी प्रशिक्षणाला उपस्थित राहणे बंधनकारक असून अनुपस्थित राहणाऱया कर्मचाऱयांवर कारवाई करण्यात येईल, अशा इशारा साहाय्यक निवडणूक अधिकारी जगदीश के. एच. यांनी दिला आहे.

लोकसभा पोटनिवडणुकीसाठी प्रचारामध्ये रंग भरू लागला आहे. त्याचप्रमाणे विविध काम पूर्ण करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेची धावपळ वाढली आहे. तसेच कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे कोरोना नियमावलींचे पालन करून निवडणूक प्रक्रिया पार पाडण्याची जबाबदारी प्रशासनावर वाढली आहे. त्यामुळे एक हजारांहून अधिक मतदार असलेल्या मतदान केंद्रात मतदारांची विभागणी करण्यात आली आहे. तसेच मतदान बुथची संख्या वाढविण्यात आली आहे. त्यामुळे कर्मचाऱयांची कमतरता भासत आहे. त्याकरिता विविध खात्यातील कर्मचाऱयांची प्रेसायडिंग अधिकारी, असिस्टंट प्रेसायडिंग ऑफिसर, सेक्टर ऑफिसर तसेच थर्मल स्क्रीनिंग करण्यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र निवडणूक प्रक्रियेचे काम करण्यास काही कर्मचारी टाळाटाळ करीत आहेत. निवडणुकीचे काम टाळण्यासाठी ऑर्डर रद्द करून घेण्याकरिता प्रयत्न करीत आहे. काही कर्मचारी वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करून निवडणुकीच्या कामातून मुक्त होण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मात्र सध्या कोरोनामुळे विविध नियमावलींचे पालन करावे लागत आहे. त्याकरिता जादा कर्मचाऱयांची आवश्यकता आहे. त्यामुळे आदेश दिलेल्या कर्मचाऱयांना निवडणूक कामासाठी कोणत्याही स्थितीत हजर रहावे लागणार असल्याची माहिती साहाय्यक निवडणूक अधिकारी महापालिका आयुक्त जगदीश के. एच. यांनी दिली.

सोमवारी दुसऱया टप्प्यातील प्रशिक्षण

सोमवार दि. 12 रोजी मतदान प्रक्रियेबाबत दुसऱया टप्प्यातील प्रशिक्षण इस्लामिया पी. यु. कॉलेज आणि बी. के. मॉडेल हायस्कूल येथे देण्यात येणार आहे. याकरिता सर्व कर्मचाऱयांना आदेश बजाविण्यात आला आहे.

तसेच काही अधिकाऱयांना व कर्मचाऱयांना फोनद्वारे सूचना करण्यात आली आहे. नियुक्त करण्यात आलेल्या अधिकाऱयांची यादी जिल्हा प्रशासनाच्या www. belagavicity.mrc.gov.in  या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर यादी डाऊनलोड करून अधिकाऱयांनी व कर्मचाऱयांनी प्रशिक्षणाला उपस्थित रहावे, जर निवडणुकीचे काम टाळण्याचा प्रयत्न केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, अशा इशारा साहाय्यक निवडणूक अधिकाऱयांनी दिला आहे.

Related Stories

बागलकोट जिल्हय़ात आणखी सात जणांना बाधा

Patil_p

बेळगाव जिल्हय़ात गुरूवारी 232 कोरोनाबाधित रूग्णांची नोंद

Patil_p

पादचाऱयांसाठीचे फुटपाथ बनले कचराकुंड

Amit Kulkarni

पिरनवाडी प्रो लीग कबड्डी स्पर्धेत सुनील एन्टरप्रायझेस विजेता

Amit Kulkarni

सामाजिक कार्यकर्त्यांकडून समाजसेवा

Amit Kulkarni

हरहुन्नरी कलाकार हरपला

Amit Kulkarni
error: Content is protected !!