तरुण भारत

राजकीय वाटणीवर ठरणार`देवस्थान’ चा अध्यक्ष

कोल्हापूर / संजीव खाडे

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती बरखास्त केल्यानंतर आता या नवी समिती केव्हा अस्तित्वात येणार?, समितीचा नवा अध्यक्ष कोण असणार? या बद्दल उत्सुकता आणि चर्चा सुरू झाली आहे. राज्यात सत्तेवर असणाऱया महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या सत्तासूत्राच्या वाटपानुसार चार देवस्थान समितीचे अध्यक्ष आणि संचालक मंडळ प्रत्यक्षात येणार आहे. त्यामुळे या तिन्ही पक्षांचे नेते कशा वाटण्या करतात यावर निवडी होणार असून त्याला राजकीय कंगोराही असणार आहे.

Advertisements

राज्यात मुंबईतील सिद्धीविनायक देवस्थान ट्रस्ट, शिरडी येथील साईबाबा मंदिर देवस्थान ट्रस्ट, पंढरपूर येथील विठ्ठल मंदिर देवस्थान ट्रस्ट आणि कोल्हापूरची पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती या चार देवस्थान समित्यांच्या अध्यक्षासह पदाधिकारी व सदस्य निवडी होणार आहेत. चारही देवस्थान समित्यांवरील अध्यक्षासह इतर निवडी महाविकास आघाडीतील घटक पक्ष असणाऱया शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षातील समन्वयाने होणार आहे. सत्ता वाटपातील सुत्रानुसार जी देवस्थान समिती मिळेल त्यावर संबंधित पक्षाचा अध्यक्ष असणार आहे. पदाधिकारी व सदस्यामध्ये सहकारी पक्षांना संधी मिळणार आहे.

देवस्थान समिती आणि राजकीय पक्ष

राज्यातील कोणतेही महामंडळ असो, समित्या असो वा देवस्थान समित्या असोत. ज्या वेळी राज्यात सत्तांतर होते, नवे सरकार सत्तेवर येते तेंव्हा महामंडळे, समित्यांवर नवीन नियुक्त्या होत असतात. या सर्व नियुक्त्या राजकीय हेतूने प्रेरीत असतात. राजकीय पक्षही आपल्या समथर्क, कार्यकर्त्यांची नियुक्ती करून त्यांना संधी देत असतात. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार दीड वर्षांपूर्वी अस्तित्वात आल्यानंतर देवस्थान समित्यांच्या नियुक्तीचा प्रश्न प्रलंबित होता. गुरूवारी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती बरखास्त केल्यानंतर आता या समितीबरोबर इतर देवस्थान समित्यांच्या निवडीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारला कराव्या लागणार आहेत. यामध्ये सध्या चढाओढही सुरू आहे. मुंबईची सिद्धीविनायक मंदिर देवस्थान ट्रस्ट आपल्याकडे असावा, असा शिवसेनेचा आग्रह आहे. शिरडीच्या साईबाबा मंदिर ट्रस्टसाठी काँग्रेस आग्रही आहे. पंढरपूरचा विठ्ठल मंदिर देवस्थान ट्रस्ट आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती यावर आपला अध्यक्ष असावा, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्नशील आहे. या चारही समित्या कोणत्या पक्षांच्या वाटÎाला जातात. त्यावर नवीन अध्यक्ष ठरणार आहेत.

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादीत रस्सीखेच

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीवर यापूर्वीपासून काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. यावेळी मात्र समितीच्या अध्यक्षपदासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीत रस्सीखेच सुरू आहे. काँग्रेससाठी पालकमंत्री सतेज पाटील तर राष्ट्रवादीसाठी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आग्रही आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दोन्ही काँग्रेसच्या प्रमुखांशी चर्चा करून निर्णय घेतील, तो पर्यंत मात्र सस्पेन्स कायम राहणार आहे.
दोन्ही काँग्रेसकडून इच्छुकांची संख्या मोठी

देवस्थान समिती काँग्रेसकडे आली तर अध्यक्षपदासाठी प्रमुख दावेदार म्हणून डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती संजय डी. पाटील, माजी अध्यक्ष गुलाबराव घोरपडे यांच्याकडे पाहिले जात आहे. त्याचबरोबर माजी महापौर सागर चव्हाण, कोल्हापूर चेंबरचे माजी अध्यक्ष आनंद माने यांचीही नावे चर्चेत आहेत. राष्ट्रवादीकडून ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे निकटवर्तीय मानले जाणारे जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष व्ही. बी. पाटील, मंत्री मुश्रीफ यांचे खंदे समर्थक भैय्या माने, राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष राजेश लाटकर यांची नावे आघाडीवर आहेत.

देवस्थान समिती बरखास्तीला दीड वर्षांनी यश

राज्यात नोव्हेंबर 2019 मध्ये महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर कोल्हापूरची पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती बरखास्ती करण्याचे प्रयत्न सुरू झाले होते. पण समितीची निवड थेट राज्यपालांमार्फत झाली असल्याने ती सहा वर्षांसाठी आहे. समिती बरखास्त करता येत नाही, अशी कारणे पुढे आली. त्यामुळे बरखास्तीच्या प्रयत्नांना काहीसा बेक लागला. त्यानंतर देवस्थान समितीच्या निर्मिती संदर्भात असलेल्या कायदा, नियमात झालेली दुरूस्ती आणि नव्या कलमाचा आधार घेत विधि आणि न्याय विभागाकडे प्रस्ताव देऊन पाठपुरावा करण्यात आला. कायद्याचा अक्षरशः बारीक सारीक अभ्यास करून समिती बरखास्तीचा आदेश काढण्यात आला. यामध्ये राजकीय नेत्यांसह अध्यक्षपदासाठी इच्छकांनीही ताकद लावली.

बारा आमदारांची निवड आणि राज्यपाल

देवस्थान समितीचे गठण राज्यपालांच्या आदेशाने होते, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती बरखास्तीचे प्रयत्न अंतिम टप्प्यात होते. त्याच काळात राज्य सरकारकडून विधानपरिषदेवरील बारा आमदारांच्या नियुक्तीची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाठविण्यात आली होती. पण राज्यपालांना दुखावयाचे नाही, यासाठी त्यावेळी देवस्थान समिती बरखास्ती करण्यात आली नाही. दरम्यानच्या राज्यपालांनी यादीला मंजुरी न दिल्याने राज्य सरकार आणि त्यांच्यात संघर्ष सुरू झाला. त्यामुळे गुरूवारी अखेर देवस्थान समिती बरखास्तीचा आदेश राज्य सरकारने काढला.

प. म. देवस्थान समितीचे आजवरचे अध्यक्ष

बी. जी. कात्रे, पी. बी. साळुंखे, ईश्वरचंद्र दलवाई, अशोकराव साळोखे, शिवाजीराव आजगेकर, डॉ. डी. वाय. पाटील, भास्करराव सूर्यवंशी, गुलाबराव घोरपडे, महेश जाधव.

Related Stories

जयसिंगपुरात करोना सेंटर लोकार्पण सोहळा संपन्न

Abhijeet Shinde

राज्य सरकार आंधळे आणि बहिरे

Abhijeet Shinde

मराठा आरक्षणाबाबत सरकार सकारात्मकच: ना. राजेंद्र पाटील यड्रावकर

Abhijeet Shinde

कोल्हापूर : गोकुळकडून दूध संस्था कर्मचाऱ्यांना साडेनऊ लाख कोविड अनुदान

Abhijeet Shinde

जिल्हय़ात घरगुती गणपतींना भावपूर्ण निरोप

Patil_p

विनापरवाना भाजी विक्री करणाऱ्यांवर सातारा पालिकेचा कारवाईचा बडगा

Abhijeet Shinde
error: Content is protected !!