तरुण भारत

पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार, 5 ठार

कूचबिहार जिल्हय़ात मतदानावेळी तणाव, जवानांच्या गोळीबारात चौघांचा मृत्यू

कोलकाता, कूचबिहार / वृत्तसंस्था

Advertisements

पश्चिम बंगालमध्ये चौथ्या टप्प्यासाठी मतदान सुरू असतानाच अनेक ठिकाणी हिंसक घटना घडल्या अहेत. बूथवर काही समाजकंटकांनी गोंधळ घातल्यानंतर सीआरपीएफच्या जवानांनी केलेल्या गोळीबारात चार जणांचा मृत्यू झाला. तत्पूर्वी कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाणामारीत एक तरुण दगावल्यामुळे एकंदर पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. निवडणूक आयोगाने याबाबत सविस्तर अहवाल मागितला आहे. दरम्यान, याप्रकरणी भाजप आणि तृणमूलमध्ये राजकीय आरोप-प्रत्यारोपही सुरू झाले आहेत. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी हिंसाचार घडविणे हा पूर्वनियोजित कट असल्याचा आरोप करत सीआयडी चौकशीचा इशारा दिला आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिंसाचाराच्या घटनेचा निषेध नोंदवला असून याला तृणमूल काँग्रेसच जबाबदार असल्याचा दावा केला आहे.

चौथ्या टप्प्यातील मतदानादरम्यान शनिवारी कूचबिहार जिह्यात भाजप आणि तृणमूलच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली असून पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. तसेच बूथ क्रमांक 285 वर बॉम्ब फेकण्यात आल्याचा प्रकारही निदर्शनास आला आहे. पोलिंग बूथबाहेर मतदानासाठी आलेल्या एका तरुणाचा गोळीबारात मृत्यू झाला आहे. बूथवर काही समाजकंटकांनी सरकारी वाहनाला लक्ष्य केल्यानंतर जवानांना गोळीबार करावा लागला. बूथ क्रमांक 5/126 वर चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. तसेच सुरक्षा दलावर हल्ला झाल्यानंतर जवानांनी गोळीबार केल्याचे स्पष्टीकरण अधिकाऱयांनी दिले आहे.

पश्चिम बंगालच्या कूचबिहार जिल्हय़ातील सितालकुची भागामध्ये हा प्रकार घडला. मतदान केंद्राबाहेर रांगेत उभ्या असलेल्या आनंद बर्मन नावाच्या एका तरुण मतदारावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळी झाडली. या घटनेमध्ये आनंद बर्मन याचा जागेवरच मृत्यू झाला. या प्रकारानंतर सितालकुचीमध्येच 126 क्रमांकाच्या मतदान केंद्रावर झालेल्या गोळीबारामध्ये 4 जणांचा दुपारच्या सुमारास मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर संबंधित मतदान केंद्रावरील मतदान थांबवण्यात आले होते.

निवडणूक अधिकाऱयांचे स्पष्टीकरण

सुरक्षा कर्मचाऱयांनी वारंवार सांगून देखील जमाव ऐकत नव्हता. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करणाऱया केंद्रीय सुरक्षा पथकाच्या जवानांची शस्त्रे हिसकावून त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न जमावातील काहींनी करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे नाईलाजाने स्वसुरक्षेसाठी आक्रमक झालेल्या व्यक्तींवर जवानांना गोळीबार करावा लागला. यामध्ये 4 जणांचा मृत्यू झाला आहे.

पंतप्रधानांनी व्यक्त केला निषेध

हिंसाचाराच्या प्रकारानंतर पश्चिम बंगालच्या राजकीय वर्तुळामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या घटनेचा निषेध केला आहे. पश्चिम बंगालमध्ये शनिवारी 44 जागांसाठी चौथ्या टप्प्यातील मतदान सुरू असतानाच हिंसाचाराच्या दोन घटनांमुळे मतदान प्रक्रियेला गालबोट लागले.

ममता बॅनर्जीही आक्रमक

तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या घटनेचा निषेध करत भाजपवर टीका केली आहे. सीआरपीएफच्या गोळीबारात मृत्यू झालेले 4 जण तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते होते असा दावा तृणमूलकडून केला जात आहे. सीआरपीएफ माझी शत्रू नाही. पण गृहमंत्र्यांच्या निर्देशांवरून हिंसाचाराचा कट शिजवला जात असून आज घडलेली घटना त्याचा पुरावा आहे, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या. तसेच हिंसाचाराला सीआरपीएफची फूस असल्याचा आरोप तृणमूलचे खासदार सौगता रॉय यांनी केला आहे.

हुगलीमध्ये भाजप नेत्याच्या कारवर हल्ला

हुगलीमध्ये भाजप नेते लॉकेट चटर्जी यांच्या कारवर स्थानिक लोकांनी हल्ला केला. त्यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यानंतर सुरक्षादलाने अनेक प्रयत्नांनंतर त्यांना सुरक्षित बाहेर काढले. 

Related Stories

मराठा आरक्षणाबाबत केंद्राची फेरविचार याचिका

Abhijeet Shinde

शहरी गरीबांना स्वस्तात घरे

Patil_p

देशातील दोन राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील सर्व पात्र नागरिकांना मिळाली लस

Abhijeet Shinde

बिहारमध्ये दिवसभरात 309 नवे कोरोना रुग्ण

Rohan_P

झऱयाच्या पाण्यादरम्यान पेटणारी ज्योत

Patil_p

मध्यप्रदेशचे जलसंपदा मंत्री तुळशीराम सिलावट यांचा राजीनामा

datta jadhav
error: Content is protected !!