तरुण भारत

अंशू, सोनम मलिकचे ऑलिम्पिक तिकीट निश्चित

वृत्तसंस्था/ अल्मेटी

कझाकस्तानमधील अल्मेटी येथे सुरू असलेल्या आशियाई ऑलिंपिक पात्रता फेरीच्या कुस्ती स्पर्धेत भारताच्या महिला युवा मल्ल अंशू मलिक आणि सोनम मलिक यांनी शनिवारी शानदार कामगिरी करत येत्या जुलै-ऑगस्ट दरम्यान होणाऱया टोकियो ऑलिंपिक स्पर्धेचे तिकीट आरक्षित केले. भारताची आणखी एक महिला मल्ल साक्षी मलिक मात्र ऑलिंपिकचे तिकीट मिळविण्यास अपयशी ठरली.

Advertisements

भारताच्या महिला मल्ल 19 वर्षीय अंशू मलिक आणि 18 वर्षीय सोनम मलिक यांनी कनिष्ठ गटातून वरिष्ठ गटाकडे वाटचाल करताना आपल्या कामगिरीत सातत्य राखल्याने त्यांना टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी लाभली आहे. अंशू आणि सोनम पहिल्यांदाच ऑलिंपिक स्पर्धेत भाग घेत आहेत. आता टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत विनेश फोगट (53 किलो), अनशु मलिक (57 किलो) आणि सोनम मलिक या तीन महिला मल्ल भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहेत. विनेश फोगटने 2019 साली झालेल्या विश्व कुस्ती स्पर्धेतून ऑलिंपिकसाठी आपली पात्रता सिद्ध केली आहे.

टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत आता कुस्ती या क्रीडाप्रकारात भारताचे पुरूष आणि महिला असे एकूण सात मल्ल भाग घेणार आहेत. भारताच्या या सर्व मल्लांनी ऑलिंपिक स्पर्धेसाठी आपली पात्रता सिद्ध केली आहे. पुरूष विभागात बजरंग पुनिया (65 किलो), रवी दाहिया (57 किलो), दीपक पुनिया (86 किलो) हे मल्ल टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत फ्रीस्टाईल गटात भारताचे प्रतिनिधीत्व करतील. आशियाई ऑलिंपिक पात्र फेरीच्या स्पर्धेत महिलांच्या 62 वजन गटात सोनम मलिकने साक्षी मलिकचा पराभव करत टोकियो ऑलिंपिकसाठी आपली पात्रता सिद्ध केली. अलिकडच्या कालावधीत झालेल्या विविध चाचणी स्पर्धामध्ये सोनमने चार वेळा साक्षी मलिकचा पराभव केला. सोनम मलिकच्या कामगिरीने साक्षी मलिकचे ऑलिंपिक स्पर्धेत सहभागी होण्याचे स्वप्न संपुष्टात आले आहे.

महिलांच्या 57 किलो वजन गटात अंशू मलिकने अंतिम फेरीपर्यंत मजल मारताना प्रतिस्पर्ध्यांकडून केवळ 2 गुण चढवून घेतले होते. पण अंतिम लढतीत तिने उझ्बेकच्या अखेमेडोव्हाचा पराभव केला. अंशूने आपल्या वजन गटातील पहिल्याच लढतीत कोरियाच्या युमचा त्यानंतर दुसऱया लढतीत कझाकस्तानच्या टिसिनाचा तांत्रिक गुणावर पराभव करत उपांत्य फेरी गाठली.

महिलांच्या 62 वजन गटात सोनम मलिकने पहिल्या लढतीत तैपेईच्या पेईचा तांत्रिक गुणांवर पराभव केला. त्यानंतर तिने चीनच्या लाँगचा दुसऱया लढतीत 5-2 असा  फडशा पाडला. उपांत्य लढतीत सोनमने कझाकस्तानच्या कॅसिमोव्हाचा पराभव केला. सोनम मलिकला अजमेर मलिक यांचे मार्गदर्शन लाभत आहे. महिलांच्या 50 किलो वजन गटात भारताच्या सीमा बिस्ला हिला आपल्या तिन्ही लढतीत गमवाव्या लागल्या. 68 किलो गटात भारताच्या निशाने उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली पण, किर्जीस्तानच्या झुमानझेरोव्हाने तांत्रिक गुणांवर नीशाचा पराभव केल्याने तिचे आव्हान संपुष्टात आले.

Related Stories

शाहिद आफ्रिदी कोरोना पॉझिटिव्ह

Patil_p

..तेव्हा निवृत्तीचा विचार केला होता : ब्रॉड

Patil_p

सिंधू उपजेती, कॅरोलिना विजेती

Patil_p

रोहित शर्मा म्हणतो, आता मी पूर्ण तंदुरुस्त!

Omkar B

स्पेनचा नदाल उपांत्यपूर्व फेरीत

Patil_p

‘हाय-फ्लाईंग’ आरसीबीचे आज पंजाबसमोर आव्हान

Amit Kulkarni
error: Content is protected !!