तरुण भारत

पोलीस बंदोबस्तात मोजक्याच बसेस धावल्या

परिवहन कर्मचाऱयांचा संप चौथ्या दिवशीही सुरूच,

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisements

परिवहन कर्मचाऱयांनी मागील चार दिवसांपासून वेतनवाढीसह विविध मागण्यांसाठी संप पुकारला आहे. दरम्यान, कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम असल्याने राज्य सरकारने आक्रमक भूमिका घेतली असून कर्मचाऱयांच्या आंदोलनावर बंदी घातली आहे. तरीदेखील शनिवारी कर्मचारी बससेवेत हजर झाले नाहीत.  त्यामुळे प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागला. शनिवारी पोलीस बंदोबस्तात बसस्थानकातून 22 बसेस विविध मार्गांवर धावल्या. या बसेस स्थानिकसह लांब पल्ल्यासाठी धावल्या. शनिवारी मोजक्याच बस धावल्या असल्या तरी रविवारपासून बसस्थानकातून धावणाऱया बसची संख्या वाढणार आहे, अशी माहिती परिवहन बेळगाव विभागाने दिली आहे.

गेल्या तीन दिवसात बससेवा ठप्प झाल्याने परिवहनला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे शनिवारी परिवहन अधिकाऱयांच्या परवानगीने काकती, सुळेभावी, खानापूर, निपाणी, बैलहोंगल, चिकोडी आदी भागाकडे बस धावल्या.

सहावा वेतन आयोग लागू करण्यासह इतर मागण्यांसाठी कर्मचारी संपावर गेले आहेत. दरम्यान, सरकारने यापूर्वीच मागण्या मान्य करण्यास नकार दर्शविला आहे. तसेच याबाबत लवकर तोडगा काढला जाईल, त्यामुळे संप मागे घेऊन बससेवेत हजर व्हावे, असे आवाहन केले होते. मात्र, कर्मचारी मागण्यांच्या पूर्ततेसाठी आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे दिसून येत आहे.

परिवहन कर्मचाऱयांच्या संपामुळे बससेवेवर मोठा परिणाम झाला असून प्रवाशांची संख्या रोडावली आहे. दरम्यान, मागील चार दिवसांपासून बससेवाही ठप्प झाल्याने बेळगाव विभागाला दैनंदिन 60 लाखाचा तोटा सहन करावा लागत आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी शासनाने खासगी वाहतुकीला परवानगी दिली आहे. त्यामुळे सध्या खासगी वाहनांवरच प्रवासी अवलंबून आहेत. बसस्थानकात गोकाक, चिकोडी, हत्तरगी, निपाणी, कोल्हापूर, हुबळी, धारवाड, हुक्केरी आदी ठिकाणी खासगी वाहने धावत आहेत. खासगी वाहने बसस्थानकावरच लागत असल्याने प्रवाशांची सोय होत असली तरी काही खासगी वाहनधारकांची मनमानी सुरू आहे. बस बंदचा फायदा घेऊन काही वाहनचालक प्रवाशांकडून अधिक भाडे घेऊन लूट करत असल्याचे प्रकारही घडत आहेत. अशा वाहनधारकांवर कारवाई करावी,  अशी मागणी प्रवासीवर्गातून होत आहे. कर्मचाऱयांनी आंदोलन करू नये, याकरिता बसस्थानकाच्या आवारात 144 कलम लागू करण्यात आले आहे. त्यामुळे आंदोलन होत नसले तरीही कर्मचारी घरी बसून संपाला प्रतिसाद देत आहेत.

आरटीओ शिवानंद मगदूम यांची बसस्थानकाला भेट

आरटीओ शिवानंद मगदूम यांनी शनिवारी बसस्थानकाला भेट दिली. यावेळी व्हाईट नंबरप्लेट असलेले वाहन प्रवाशांची वाहतूक करत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तातडीने व्हाईट नंबरप्लेट असलेल्या वाहनांना बसस्थानकाबाहेर काढले. बससेवा बंद असल्याने यलो नंबरप्लेट असलेल्या वाहनधारकांना सध्या प्रवासी वाहतुकीसाठी परवानगी देण्यात आली आहे. मात्र, काही व्हाईट नंबरप्लेट असलेले वाहनधारक बसस्थानकात वाहने आणत आहेत. अशा वाहनधारकांनी प्रवासी वाहतूक करू नये, असे आवाहन शिवानंद मगदूम यांनी केले आहे. प्रवाशांनीही व्हाईट नंबर प्लेटच्या वाहनातून प्रवास करू नये, असे कळविले आहे. 

Related Stories

पेठ वडगाव : शिवसेनेच्यावतीने चीनचा राष्ट्रध्वज जाळून तीव्र निषेध

Shankar_P

आठ कोटी दिले…‘सारथी’च्या स्वायत्ततेचे काय?

Shankar_P

इस्रायलच्या गाझा शहरात 24 तासात दुसऱयांदा रॉकेट हल्ला

Patil_p

प्रतापगंज पेठेतील कंटेंटमेंट झोन उठवणार कधी?

Patil_p

राज्यपाल कोशारी व भाजपवर मंत्री यशोमती ठाकूर यांचा निशाणा

triratna

कडोलकर गल्लीतील पथदीपांचा विद्युत पुरवठा तोडला

Amit Kulkarni
error: Content is protected !!