तरुण भारत

उद्धव गीतेची सुरुवात

अध्याय सातवा

अवतारकार्य संपत आल्याने आता परत वैकुंठ लोकी या अशी विनंती देवांनी श्रीकृष्णाना केली. त्यावर भगवंत म्हणाले, हे यादव फार माजले आहेत. यांच्या कुळाचा नाश करूनच मी परत येईन. ही बाब उद्धवाच्या लक्षात आली आणि तो अतिशय खिन्न झाला. तो श्रीकृष्णाना विनवू लागला की, मलाही तुमच्याबरोबर घेऊन चला. याच्यावर भगवंतांचे अत्यंतिक प्रेम असल्याने त्याचा विरह त्यानाही सहन होईना. त्याचे बोलणे ऐकून भगवंत प्रसन्न झाले. आपण गेल्यावर आपल्या ब्रह्मज्ञानाचा ठेवा कुणाला द्यावा असा त्यांनाही प्रश्नच होता म्हणून त्यांनी उद्धवाला ब्रह्मज्ञानाचा उपदेश करायचे ठरवले. त्यासाठी आवश्यक ते वैराग्य त्याच्याठायी उत्पन्न केले. उद्धवाला हा उपदेश करायचे आणखी एक कारण म्हणजे ज्याला ब्रह्मज्ञान अवगत आहे त्याला ब्राह्मणांचा शाप बाधू शकत नाही. समस्त यादवकुळाला ब्राह्मणांचा शाप असल्याने त्यांचा सर्वनाश अटळ होता. त्यात उद्धवही आलाच. पण जर ब्रह्मज्ञान झाले तर उद्धव वाचू शकतो हे लक्षात घेऊन भगवंत आता हळूहळू ज्ञान आणि वैराग्याच्या गोष्टी त्याला सांगू लागतील. वैराग्य म्हणजे आहे त्यात समाधानी राहण्याची युक्ती. श्रीकृष्णाने केलेला उपदेश ‘उद्धव गीता’ या नावाने प्रसिद्ध आहे. भगवंत म्हणाले, ‘उद्धवा, मी येथून गेलो की आत्तापर्यंत गप्प बसलेला कली अत्यंत प्रबळ होईल, सर्व लोक ढोंगी होतील, अधर्म वाढेल, लोक निंदेच्या राशी रचतील, म्हणून तू येथे क्षणभरही राहू नकोस. तुला कलीची बाधा होणार नाही अशा ठिकाणी जा. उद्धवा आपल्या कल्याणाकरता इथली सर्व संपत्ती, बायका मुले, आप्तइष्ट सर्व सोडून एकटाच निघून जा. यांच्यावरचा स्नेह तसाच ठेऊन तू निघून गेलास तर मोठाच अनर्थ होईल. तसेच अभिमान, वासना हेही येथेच सोड. स्नेह कशाने सुटेल, अभिमान कशाने जाईल असे विचारत असशील तर ऐक, माझ्या सर्वव्यापी स्वरूपात चित्त सर्वदा स्थिर करून आत्मस्वरूपात निरंतर निश्चयाने सावध रहा. म्हणजे तुझे चित्त माझ्या भक्तीने भरून जाऊन मद्रुप होईल. अभ्यासाने कोणतीही गोष्ट असाध्य नाही. गृहस्थाश्रम सोडल्याने मी कोठे राहू अशी शंका तुला येईल, पण तू बिलकुल काळजी करू नकोस. कारण तू मद्रुप झालास की माझ्याप्रमाणे सर्वव्यापी होशील आणि मग मला प्राप्त होशील. जागेवरून न हलताच निजधामाला येशील.’ ‘मला निजधामाला न्या’ अशी विनंती उद्धवाने केली होती. त्याचे उत्तर श्रीकृष्णांनी आत्मबोधाच्या रूपाने दिले. पुढे म्हणाले, हे उपाय जर केले नाहीस तर तू निजधामाला कधीच येणार नाहीस. अहंकार सोडल्याशिवाय तरणोपाय नाही हे पक्के लक्षात ठेव. जे जे दिसते ते सर्व नाशवंत आहे. ज्याप्रमाणे स्वप्नात वैभव आणि विलास बघावा आणि जागे झाल्यावर काहीच खरे नव्हते हे लक्षात यावे तसा हा संसार स्वप्नवत आहे याची जाणीव ठेव. आणखी एक सांगायचे म्हणजे गरुडाच्या पाठीवर बसवून मला घेऊन चला असे म्हणतोस ते एवढे सोपे असते तर तू सांगायच्या आधीच मी तसे करायचे ठरवले असते. पण माझे निजधाम हे गरुडाच्या आवाक्मयाच्या पलीकडचे आहे रे! भगवंत अत्यंत मोलाच्या गोष्टी उद्धवाला सांगणार आहेत.

Advertisements

Related Stories

इंडोनेशियात 62 प्रवाशांसह विमान बेपत्ता

Patil_p

टाटाच्या ‘सुपरऍप’साठी करावी लागणार प्रतीक्षा

Patil_p

साखरपा बाजारपेठ रस्ता कामाला दिरंगाई का?

Abhijeet Shinde

कुडासे येथे जमीन वादातून पाळकोयत्याने हल्ला

NIKHIL_N

ऍमेझॉनने 35 शहरात वाढवली सेवा

Patil_p

शाहूवाडी परिसरात शुकशुकाट ; पॉजिटिव्ह रुग्ण आढळल्याने भीतीचे वातावरण

Abhijeet Shinde
error: Content is protected !!