तरुण भारत

संकल्प आमोणकर यांच्या मुरगाव वॉरीयर्सचे उमेदवार जाहीर

9 पैकी 5 प्रभागात महिलांना उमेदवारी

प्रतिनिधी / वास्को

Advertisements

मुरगाव पालिका निवडणुकीसाठी प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष संकल्प आमोणकर यांनी रविवारी आपल्या पॅनलची घोषणा केली. मुरगाव मतदारसंघातील 9 प्रभागांपैकी 5 प्रभागांमध्ये त्यांनी महिलांना संधी दिलेली असून आपले 9 पैकी 9 उमेदवार निवडून येतील असा दावा संकल्प आमोणकर यांनी केला आहे.

  यासंबंधी रविवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत आमोणकर यांनी आपल्या पॅनलचा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नसल्याचे स्पष्ट करून आपले पॅनल समविचारी कार्यकर्त्यांचे पॅनल आहे. मुरगाव वॉरीयर्स असे या पॅनलचे नाव असून गेल्या अनेक वर्षांपासून मुरगावचे आमदार व मंत्री मिलिंद नाईक यांच्या सुडाच्या राजकारणाविरूध्द लढत आलेले कार्यकर्ते मुरगावचे वारीयर्स आहेत. हे वॉरीयर्स ही पालिका निवडणुक लढत आहेत. सर्व उमेदवार सुशिक्षीत तसेच राजकारणात अनुभवीही आहेत. मुरगाव वॉरीयर्सचे सर्व उमेदवार जिंकणार असा आपल्या विश्वास असून मुरगाव पालिका क्षेत्रातील अडून राहिलेली कामे हे उमेदवार तडीस नेतील असे आमोणकर म्हणाले. आमोणकर यांनी जाहीर केलेल्या मुरगाव वॉरीयर्सच्या उमेदवारांमध्ये मुरगावचे माजी नगराध्यक्ष नितीन चोपडेकर, माजी नगराध्यक्ष शेखर खडपकर, माजी नगराध्यक्ष भावना भोसले तसेच माजी नगरसेवक असलेल्या श्रध्दा आमोणकर व निलेश नावेलकर यांचाही समावेश आहे.

  प्रभाग क्र. 1 – भावना भोसले, प्रभाग क्र. 2 – शेखर खडपकर, प्रभाग क्र. 3 –  आश्विनी होन्नावरकर, प्रभाग क्र. 4 – उदय नाईक, प्रभाग क्र. 5 – निलेश नावेलकर, प्रभाग क्र. 6- विन्नी भगत, प्रभाग क्र. 7 – नितीन चोपडेकर, प्रभाग क्र. 8 – श्रध्दा आमोणकर व प्रभाग क्र. 9 – योगीता पार्सेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

संकल्प आमोणकर यांच्याकडून 9 पैकी 5 प्रभागात महिलांना उमेदवारी

   संकल्प आमोणकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना नगरविकास खात्याने पहिल्यांदा जाहीर केलेल्या राखीवतेत मुरगाव मतदारसंघात महिलांसाठी एकही प्रभाग राखीव ठेवण्यात आला नव्हता. त्यामुळे आमच्याच महिलांनी सर्वोच्च न्यायालयापर्यंत संघर्ष करीत 33 टक्के आरक्षण मिळवले आहे. ज्या नगरविकासमंत्र्यांनी महिलांना आरक्षण नाकारले त्यांना आता खरे तर महिलांना संधी देण्याचा कोणताच नैतीक अधिकार राहिलेला नाही. त्यांनी महिलांप्रती जो दृष्टीकोन दाखवला त्याचा धडा या निवडणुकीत महिलाच त्यांना शिकवतील. नियमा प्रमाणे मुरगावमध्ये महिलांसाठी 33 टक्के राखीव प्रभाग असले तरी आपल्या पॅनलने 5 प्रभागांमध्ये म्हणजेच 60 टक्के प्रभागांमध्ये महिलांना संधी दिलेली असल्याचे आमोणकर यांनी सांगितले. मंत्री मिलिंद नाईक व त्यांचे कार्यकर्ते प्रभांगांमध्ये जाऊन मतदारांना नोकरऱयांचे आमिष दाखवत फिरत असून सहकार्य मिळत नसलेल्या लोकांना अनेक प्रकारच्या धमक्या तसेच सतावणुकीचे प्रकार घडत असल्याचा आरोप आमोणकर यांनी केला. यावेळी आमोणकर यांनी भाजपा स्थापना दिनानिमित्र सडय़ावरील घराघरांवर काहींनी लावलेले भाजपाचे झेंडे हे निवडणुक आचारसंहितेचा भंग करणारे असून निवडणुक आयोगाच्या भरारी पथकाने या विरूध्द त्वरीत कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली.

सडय़ावरील घरांच्या कायदेशीरकरणासाठी ठराव संमत करणार – नितीन चोपडेकर

   माजी नगराध्यक्ष नितीन चोपडेकर यांनी यावेळी बोलताना आपले पॅनल सत्तेवर येवो न येवो मात्र, सडय़ावरील घरांच्या कायदेशीरकरणाचा प्रश्न हाती घेण्यात येईल. पालिकेत तसा ठराव संमत करण्यात येईल. याच भागातील नागरिक असलेले नगरविकासमंत्री मिलिंद नाईक यांच्या कुटुंबाचे घर जर अतिरीक्त सरकारी जमीन संपादीत करून कायदेशीर होऊ शकते तर सडय़ावरील इतर कुटुंबांची घरे कायदेशीर का होऊ शकत नाहीत असा प्रश्न चोपडेकर यांनी उपस्थित केला. जनतेने आपल्या घरांच्या कायदेशीरकरणाचा प्रश्न मंत्र्यासमोर उपस्थित करायला हवा असे सांगून पालिका क्षेत्रातील घरांना घरपट्टी लागू करण्याचा व घरपट्टीसाठी फेरसर्वेक्षणाचा प्रश्न तसेच पालिका कामगारांच्या वेतनाचाही प्रश्नही सोडवू असे आश्वासन चोपडेकर यांनी दिले.

वादविवादाचे आव्हान स्विकारावे, क्षमता व गुणवत्ता सिध्द होईल- शेखर खडपकर   माजी नगराध्यक्ष शेखर खडपकर व माजी नगरसेवक निलेश नावेलकर यांनी मुरगाव वारीयर्सच्या उमेदवारांकडे कार्यक्षमता असून ते मंत्र्यांच्या नावाने लोकांकडे मते मागणार नाहीत. त्यांच्या कार्यक्षमतेला व गुणवत्तेला मते पडतील असे स्पष्ट करून मंत्री नाईक यांच्यावर त्यांनी टीका केली. मुरगाव वारीयर्सच्या उमेदवारांशी वादविवाद करण्याचे आव्हान मंत्री मिलिंद नाईक यांच्या पॅनलने स्विकारावे. गुणवत्ता आणि कार्यक्षमता सिध्द होईल असे खडपकर म्हणाले. मंत्री मिलिंद नाईक अकार्यक्षम उमेदवार उभे करून आपल्यासाठी मते मागीत आहेत उमेदवारांसाठी नव्हे अशी टीका त्यांनी केली.

Related Stories

कर्नाटकातील ट्रॉलर्सची गोव्याच्या समुद्रात बेकायदा मासेमारी

Patil_p

काणकोणात नद्यांची पात्रे बुजल्यामुळे वारंवार पूर

Patil_p

कोरोना बाधितांच्या सेवेसाठी वास्कोत नियंत्रण कक्षाची स्थापना

Patil_p

अखेर श्री शांतादुर्गा देवीच्या जागेत होणारा मलनिःस्सारण प्रकल्प रद्द करण्याची मंत्री मायकल लोबो यांची घोषणा

Amit Kulkarni

न्यू मार्केटमधील सर्व दुकाने खुली करण्यास मज्जाव

Omkar B

कोलवाळ तुरुंगात निकृष्ट जेवण आदी समस्या सोडवाव्यात

Patil_p
error: Content is protected !!