तरुण भारत

दुसऱया हॉकी सामन्यातही भारताची सरशी

वृत्तसंस्था/ ब्युनॉस एअर्स

भारताच्या पुरुष हॉकी संघाने प्रो हॉकी लीगमधील सलग दुसऱया सामन्यात यजमान अर्जेन्टिनाचा 3-0 असा एकतर्फी धुव्वा उडवित प्रो लीगच्या क्रमवारीत चौथ्या स्थानावर झेप घेतली आहे.

Advertisements

हरमनप्रीत सिंग (11 वे मिनिट), ललित उपाध्याय (25 वे मिनिट), मनदीप सिंग (58 वे मिनिट) यांनी भारताचे गोल नोंदवले. या विजयाचे भारताला आणखी 3 गुण मिळाले. शनिवारी झालेल्या सामन्यात भारताने अर्जेन्टिनावर पेनल्टी शूटआऊटमध्ये मात केली होती, त्यात बोनस गुणासह दोन गुण मिळाले होते. भारताचे आता 8 सामन्यांतून 15 गुण झाले असून ते आता पाचवरून चौथ्या स्थानावर झेपावले आहेत. ऑस्ट्रेलियानेही तितकेच सामने खेळले आहेत, पण भारताने त्यांना एका गुणाने मागे टाकले आहे. येत्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारत, अर्जेन्टिना व ऑस्ट्रेलिया एकमेकांविरुद्ध खेळणार आहेत. या तिन्ही संघांचा गट अ मध्ये समावेश असून याच गटात स्पेन, न्यूझीलंड व यजमान जपान यांचाही समावेश आहे. एफआयएच प्रो हॉकी लीगच्या गुणतक्त्यात अर्जेन्टिना 12 सामन्यात 11 गुण घेत सहाव्या स्थानावर आहे.

येथील सामन्यात अर्जेन्टिनाने चमकदार सुरुवात केली होती. पण भारतीय गोलरक्षक कृशन बहादूर पाठकने दोनवेळा अप्रतिम गोलरक्षण केल्यामुळे मार्टिन फेरेरोचे प्रयत्न वाया गेले. 11 व्या मिनिटाला मात्र भारताला पहिले यश हरमनप्रीत सिंगने मिळवून दिले. पहिल्या पेनल्टी कॉर्नरवर त्याने हा गोल नोंदवला. दुसऱया सत्रात ललित उपाध्यायने वेगवान हालचाली करीत भारताचा दुसरा गोल नोंदवला. अर्जेन्टिनाचा गोलरक्षक जुआन विवाल्डीने एक फटका अडवला होता. पण त्यावर लगेच ताबा मिळवित चपळ ललितने हा गोल नोंदवला. भारताने बराच वेळ बॉल पझेशन मिळविले होते. पण गोल करता आला नव्हता. ललितने गोल नोंदवून ही कसर भरून काढली. सामना संपण्यास दोन मिनिटे असताना मनदीपने अगदी जवळून फटका मारत तिसरा गोल नोंदवून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. चेंडूवर ताबा मिळविताना त्याचा तोल गेला होता. पण व्यवधान राखत त्याने बॅकहँड फटक्यावर चेंडू अचूक गोलपोस्टमध्ये मारला.

आम्ही उत्तम बचाव केला, असे गोलरक्षक पाठक म्हणाला. त्यालाच सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा बहुमान देण्यात आला. ‘यजमान संघ बचावात भक्कम आहे. तरीही आम्ही अनेक संधी निर्माण केल्या. आम्हाला गोल करण्यात यश आले, हे चांगलेच आहे. पण आम्हाला काही विभागात सुधारणा करावी लागेल, विशेषतः बचाव व मिडफिल्डमध्ये,’ असे तो म्हणाला. भारतीय संघ आता ग्रेट ब्रिटनला जाणार असून त्यांच्याविरुद्ध 8 व 9 मे रोजी दोन सामने खेळणार आहे.

Related Stories

कोणी टाकला आयपीएलमधील सर्वात वेगवान चेंडू?

Patil_p

पाकिस्तानच्या महिला विश्वचषक संघातून सना मीरला वगळले

Patil_p

ओसाका, जोकोविच दुसऱया फेरीत

Patil_p

ब्रुनो फर्नांडिस चौथ्यांदा महिन्यातील सर्वोत्तम फुटबॉलपटू

Patil_p

पांघल, बिस्त, संजीत अंतिम फेरीत

Patil_p

भारतीय तिरंदाजांची उपांत्यपूर्व फेरीत धडक

Patil_p
error: Content is protected !!