तरुण भारत

पंजाब किंग्सने बांधले विजयाचे तोरण!

438 धावांच्या आतषबाजीत पंजाब 4 धावांनी विजयी

मुंबई / वृत्तसंस्था

Advertisements

संजू सॅमसनच्या नेतृत्वाच्या पदार्पणातील सनसनाटी शतकानंतर देखील राजस्थान रॉयल्सविरुद्ध पंजाब किंग्स संघाने गुढी पाडव्याच्या पूर्वसंध्येला विजयश्रीचे तोरण बांधले आणि यंदाच्या आयपीएल मोसमातील आणखी एका रोमांचक लढतीची नोंद झाली. तब्बल 438 धावांची आतषबाजी झालेल्या या लढतीत पंजाबचा संघ अवघ्या 4 धावांनी विजयी ठरला.

प्रारंभी, केएल राहुल (50 चेंडूत 91) व दीपक हुडा (28 चेंडूत 64) यांच्या फटकेबाजीमुळे पंजाबने 20 षटकात 6 बाद 221 धावांचा डोंगर रचला तर प्रत्युत्तरात राजस्थान रॉयल्सला सॅमसनच्या झुंजार शतकी खेळीनंतरही 20 षटकात 7 बाद 217 धावांवर समाधान मानावे लागले. नवोदित डावखुरा गोलंदाज अर्शदीप सिंग शेवटच्या चेंडूवर सॅमसनला बाद करण्यात यशस्वी ठरला आणि इथेच विजयश्रीने पंजाबला 2 गुण बहाल केले.

7 उत्तुंग षटकार व 12 खणखणीत चौकार वसूल करणारा सॅमसन इतका आत्मविश्वासात होता की, शेवटच्या 2 चेंडूवर 5 धावांची गरज असताना शक्य असलेली एक धावही त्याने नाकारली. पण, शेवटच्या चेंडूवर आणखी एक उत्तुंग षटकार खेचण्याचा सॅमसनचा प्रयत्न फसला आणि राजस्थानला विजयाच्या दरवाजावरुन माघारी फिरावे लागले.

विजयासाठी 222 धावांचे आव्हान असताना बेन स्टोक्स शून्यावरच परतला तर अर्शदीपने मनन वोहराला परतीचा झेल टिपत 12 धावांवर बाद केले. सॅमसन व बटलर 45 धावांची भागीदारी करुन तंबूत परतले. दुसरीकडे, दोन जीवदाने लाभलेल्या सॅमसनने चौकाराने अर्धशतक साजरे केले आणि त्यानंतर टोलेजंग फटकेबाजीचा जणू सिलसिलाच सुरु केला. त्याच्या फटकेबाजीमुळेच राजस्थानने 14 व 15 व्या षटकात 26 धावा वसूल केल्या आणि मुरुगन अश्विनच्या 16 व्या षटकात 3 षटकारांसह 20 धावा वसूल केल्या. यामुळे, शेवटच्या 4 षटकात 48 धावा, असे समीकरण होते.

सॅमसनने रिचर्डसनच्या षटकात 19 धावा फटकावत विजय आणखी आवाक्यात आणला. पण, निर्णायक टप्प्यात स्वतः सॅमसनच क्रीझवर असताना शेवटच्या चेंडूवर 5 धावांचे आव्हान त्याला पेलवले नाही आणि राजस्थानला विजयाच्या उंबरठय़ावरुन परत फिरण्याची नामुष्की सोसावी लागली.

धावफलक

राजस्थान रॉयल्स ः बेन स्टोक्स झे. व गो. शमी 0 (3 चेंडू), मनन वोहरा झे. व गो. अर्शदीप 12 (8 चेंडूत 1 चौकार, 1 षटकार), संजू सॅमसन झे. हुडा, गो. अर्शदीप 119 (63 चेंडूत 12 चौकार, 7 षटकार), जोस बटलर त्रि. गो. रिचर्डसन 25 (13 चेंडूत 5 चौकार), शिवम दुबे झे. हुडा, गो. अर्शदीप 23 (15 चेंडूत 3 चौकार), रियान पराग झे. राहुल, गो. शमी 25 (11 चेंडूत 1 चौकार, 3 षटकार), राहुल तेवातिया झे. केएल राहुल, गो. मेरेडिथ 2 (4 चेंडू), ख्रिस मॉरिस नाबाद 2 (4 चेंडू). अवांतर 9. एकूण 20 षटकात 7 बाद 217.

गडी बाद होण्याचा क्रम

1-0 (बेन स्टोक्स, 0.3), 2-25 (वोहरा, 3.2), 3-70 (जोस बटलर, 7.3), 4-123 (दुबे, 12.4), 5-175 (रियान, 16.2), 6-201 (तेवातिया, 18.1), 7-217 (सॅमसन, 19.6).

गोलंदाजी

मोहम्मद शमी 4-0-33-2, झाय रिचर्डसन 4-0-55-1, अर्शदीप सिंग 4-0-35-3, रिले मेरेडिथ 4-0-49-1, मुरुगन अश्विन 4-0-43-0

बॉक्स

ती चूक राजस्थान रॉयल्सला भोवली?

विजयासाठी शेवटच्या 2 चेंडूत 5 धावांची आवश्यकता असताना संजू सॅमसन क्रीझवर होता आणि त्याने जोरदार फटका लगावल्यानंतर मॉरिस क्षणार्धात त्याच्यानजीक पोहोचल्याने एकेरी धाव घेणे सहज शक्य होते. यामुळे, सामन्यातील चित्र शेवटच्या चेंडूवर 4 धावा असे झाले असते. पण, इथे जोरदार फटकेबाजी करणाऱया सॅमसनला इतका विश्वास होता की, त्याने मॉरिसला परत पाठवत एकेरी धाव नाकारली आणि शेवटच्या चेंडूवर नशीब आजमावणे पसंत केले. अर्थात, हा डाव नंतर राजस्थानवरच उलटल्याचे सिद्ध झाले. कारण, सॅमसनचा अर्शदीपच्या शेवटच्या कटर चेंडूवर षटकार खेचण्याचा प्रयत्न सपशेल फसला आणि आऊटफिल्डमध्ये हुडाने सोपा झेल टिपत सॅमसनच्या पर्यायाने राजस्थान रॉयल्सच्या विजयाच्या आशाअपेक्षा पूर्ण संपुष्टात आणल्या.

बॉक्स

विजयाचा घास हातातोंडाशी आला…अन् हिरावला!

राजस्थान रॉयल्ससाठी 222 धावांचे खडतर आव्हान असताना अशक्य भासणारा विजय संजू सॅमसनच्या धडाकेबाज शतकी खेळीमुळे अगदी दृष्टिक्षेपात आला होता. पण, पहिल्या षटकातच फलंदाजीला उतरलेल्या संजू सॅमसनचे विजयाचे प्रयत्न शेवटच्या षटकातील शेवटच्या चेंडूवर निष्फळ ठरले आणि राजस्थानसाठी हातातोंडाशी आलेला घास तिथूनच जणू हिरावला गेला!

Related Stories

सिडनी सिक्सर्सचा होल्डरशी तीन सामन्यांसाठी करार

Patil_p

इंग्लंड दौऱयासाठी ऑस्ट्रेलिया संघ जाहीर

Patil_p

अचंता शरथ कमलची आगेकूच

Patil_p

भारतीय फुटबॉल संघ दुबईला रवाना

Patil_p

दिल्ली कॅपिटल्समुळे खेळ बहरला – सॅम बिलिंग्ज

Patil_p

‘खेलरत्न’ पुरस्कारांसाठी निरज चोप्राची शिफारस

Patil_p
error: Content is protected !!