तरुण भारत

विषय महात्म्य

अध्याय सातवा

भगवंत म्हणाले, उद्धवा, कितीजरी सांगितले तरी माणसाला विषयाची गोडी सोडवत नाही. त्याला त्याच्या प्रत्येक कर्माचे फळ हवे असते. नुसतेच हवे असते असे नाही तर त्याच्या मनासारखे हवे असते. याला कारण अज्ञान. अज्ञानापोटी तो ज्या ज्या नित्य क्रिया करतो त्या सगळय़ाला कर्म म्हणता येईल. जे नित्यकर्मात येत नाही ते अकर्म होय आणि विकर्म म्हणजे करू नये असे कर्म. अशा कर्म अकर्म आणि विकर्म या त्रिपुटीमुळे कर्मात भेद निर्माण झाले. त्यातून सृष्टीची वाढ झाली. माणसांच्यात गुणदोष पाहण्याच्या बुद्धीमुळे आपपर भाव निर्माण झाला. त्यामुळे काही विधिनिषेध राहिला नाही. एकटा असलेला पुरुष मनोरथपूजेला बसला की, त्याच्या डोळय़ासमोर काही उद्दिष्टे नाचू लागतात व ती कशी पूर्ण करता येतील याकडेच त्याचे सर्व लक्ष लागते. त्यासाठी नाना परीचे प्रयत्न कसे करता येतील यातच तो गुंगून जातो. उद्दिष्ट श्रे÷ समजून त्याच्या साध्यासाठी स्वतःकडे कमीपणा घेतो. त्यातून गुणदोषांची निपज होते. डावे उजवेपणा सहजी घडू लागते. ध्येय ध्याता ध्यान हे मनुष्याच्या जागृत अवस्थेत असतात. पण त्रयस्थाच्या भूमिकेतून बघितले म्हणजे साक्षी अवस्थेतून बघितले तर तिन्ही वेगवेगळी नसून एकच आहेत हे लक्षात येते. ही बाब आपण एका सोप्या उदाहरणाने समजून घेऊ. सिलींग फॅन जेव्हा बंद असतो तेव्हा त्याची तीनही पाती वेगवेगळी दिसतात. पण तो जेव्हा सुरू होतो तेव्हा ती एकच वाटतात. तसे ध्येय, ध्याता आणि ध्यान हे जागृत अवस्थेत पंख्याच्या तीन पात्याप्रमाणे वेगवेगळे दिसतात. पण त्या तिन्ही गोष्टी माझ्यातच सामावलेल्या असून त्या जाणणारा मी एकटाच आहे हे नीट लक्ष दिले की कळते. तसेच पंखा बंद असला की, उकाडा जाणवतो तसे जर आपण जागृत अवस्थेत असलो की, दुःख जाणवते. पण पंखा सुरू झाला की, थंड हवा येऊन तलखी कमी होते, तसे ‘मी’ची ओळख पटली की, तो जागृत अवस्थेतून वेगळा होऊन आनंद, समाधान अनुभवतो. भगवंत पुढे म्हणाले, या सगळय़ाकडे सोयीस्कर दुर्लक्ष करून मनुष्य उद्दिष्टांच्या आहारी जाऊन गुणदोष वाढवत बसतो. उद्धवा या गुणदोषांच्या भेदामुळेच माणसाने ध्येय, ध्याता आणि ध्यान ही कर्मत्रिपुटी वाढवून ठेवली आहे. जेव्हा जेव्हा भेदात जिव्हाळा वाटेल तेव्हा तेव्हा मनुष्य विषयांच्या सोहळय़ात गुंतून पडतो. इंद्रियांना जेव्हा जेव्हा संतोष वाटतो त्या त्यावेळी नंतर दुःख भोगायची वेळ येते. संसार करताना मनुष्य त्यात मिळणाऱया सुखाच्या क्षणांमुळे आनंदित होतो पण नंतर विपरीत काळ आला की तो दुःखी होतो. म्हणून उद्धवा पानात वाढलेल्या खिरीप्रमाणे विषय समोर आला की तो न चाखताच बाजूला सारावा. आंबराईत पिकलेल्या आंब्यांचा घमघमीत सुवास सुटलेला असावा पण साप त्याला वेटोळे घालून बसलेला दिसला तर मनुष्य आत्मघाताच्या भीतीने तिकडे फिरकणारसुद्धा नाही. अज्ञानी माणसाचे तर सोडा पण हे विषय आपल्याला अडचणीत आणतील हे माहीत असलेल्या मुमुक्षुलासुद्धा विषयसेवनरुपी आंबे खायची अनिवार ओढ वाटत असते. हे विषयसेवन कसे टाळायचे ते मी तुला पुढे सांगतो.

Advertisements

Related Stories

जागतिक स्तरावर कोरोनामुळे लॉकडाऊन

Patil_p

भारतभर पेयजलाची वाढती तृष्णा

Amit Kulkarni

नामांतराचे नाटय़

Patil_p

कोकणातील आरोग्य सेवेच्या मर्यादा उघड

Patil_p

रशियाची कोरोना प्रतिबंधक लस आणि त्यावरील विवाद

Patil_p

कोण्या कर्मे तुज हे दशा

Patil_p
error: Content is protected !!