तरुण भारत

वृद्धेची होऊनही परवड, प्रशासन मात्र गिरवतेय ‘अबकड’

कासार्डे येथील वृद्धेची डोळे पाणावणारी कहाणी : तिला हवा आहे फक्त चार भिंतींचा आधार

चंद्रशेखर देसाई / कणकवली:

Advertisements

संत तुकडोजी महाराजांचा अभंग सांगतो, ‘राजास जी महाली, सौख्ये कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली, या झोपडीत माझ्या’, भूमीवरी पडावे, ताऱयांकडे पहावे, प्रभूनाम नित्य गावे, या झोपडीत माझ्या..’ अक्षरश: या ओळींप्रमाणेच  कासार्डे येथील वैजयंती मिराशी या वृद्धेची ही कहाणी. तिच्या या झोपडीत ती जरी आनंदी असली तरीही ही झोपडी (घर) कोसळलेले, ना लाईट, ना कुणाचा आधार.. निराधार योजना वगळता.. सारे मोकळे आभाळ… तरीही कुसुमाग्रजांच्या कवितेप्रमाणे आजही ‘पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हणा’ एवढी ही खंबीर. ना आधार, ना छप्पर, ना पुढील दिशा.. घराने तर भुईशीच सलगी केलेली.. तरीही नववर्षाचे स्वागत ती त्याच जिद्दीने आणि आशेने करतेय… नववर्षाची गुढी उभारून. तिला गरज आहे, ती पक्क्या निवाऱयाच्या माध्यमातून छोटय़ाशा घराची.. गुढी उभारण्यासाठी शासनाच्या किंवा दानशुरांच्या मदतीची!

कासार्डे तर्फेवाडी येथील वैजयंती मिराशी या वृद्ध निराधार महिलेची ही कहाणी. तिने सांगितल्यानुसार, सुमारे 50 वर्षांपूर्वी लग्नानंतर ती काही कारणाने माहेरी आली. तिला एक भाऊ आहे. मात्र, तो कुठेतरी मुंबईत काम धंदा करून राहतो, असे ती सांगते. त्यामुळे कासार्डे येथे ती एकटीच राहते. तिला मूलबाळ नाही. संजय गांधी निराधार योजनेची मिळणारी पेन्शन व कुणाकडे तरी मोलमजुरी करून तिचा उदरनिर्वाह चालतो. मात्र, त्याबाबतही तिची कसलीही तक्रार नाही. मात्र, आज तिच्या राहत्या घराची अवस्था पाहता तिने पुढे काय करायचे हा प्रश्न आहे.

निराधार योजनेत बसते, पण यादीत नाही

शासकीय योजनेतून घर मिळावे, यासाठी तिच्या म्हणण्यानुसार, गेली सुमारे दहा वर्षे ती प्रयत्न करतेय. भावाने तिला अडिच गुंठे जमीनही दिली. त्यासाठीची कागदपत्रेही पूर्ण झाली आहेत. ग्रामपंचायतीकडे दहा वर्षे जाऊन जाऊन प्रयत्न करतेय, पण पुढे काहीच होत नाही. गेल्या पाच वर्षांपासून घराची दूरवस्था झाली असल्याचे ती सांगते. याबाबत ग्रामसेवक कुडतरकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी, तिच्या घराबाबतची अवस्था खरी आहे. मात्र, शासकीय योजनेत तिचे घर ‘ड’ यादीत आहे. अद्याप घरकुलांसाठीची ‘ब’ यादी सुरू आहे. ‘ब’ यादी जोपर्यंत पूर्ण होत नाही, तोपर्यंत ‘ड’ यादीतील घरकुले घेता येत नाहीत, अशी अडचण असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रशासकीय व्यवस्थेच्यादृष्टीने ते खरे असले, तरी श्रीमती मिराशी यांची कहाणीही खरी आहे. जे सत्य आहे, ते नाकारून चालणार नाही. पण शासकीय नियमांच्या व्यवस्थेत तिचे निराधार असणे बसत नाही, त्याला करायचे तरी काय? गेली पाच वर्षे ती पावसाळय़ात छपरावर कागद व उन्हाळय़ात आभाळच छप्पर ठेवून जगतेय. आज घरात लाईटही नाही. मीटर काढून ठेवलेला आहे. अशा स्थितीत जगणाऱया या वृद्धेची कहाणी हृदय पिळवटून टाकणारी अशीच आहे.

आशेची गुढी उभारलेली

घरासमोर गुढीची पूजा करणाऱया श्रीमती मिराशी.

श्रीमती मिराशी यांच्या घरावरील छप्पर असून नसल्यासारखी स्थिती आहे. वयोवृद्ध होऊनही त्यांची जगण्याची उमेद मात्र तरुणांनाही लाजवणारी आहे. कुणाचाही आधार नसतानाही त्यांनी नववर्षाचे स्वागत अगदी आनंदाने केले. घरासमोर …घर कसले मोकळय़ा आभाळातच तिने पावळीचा आधार घेत गुढी उभारून पाडवाही साजरा केला. तरीही डोक्यावर छप्पर नसल्याची वस्तुस्थिती या साऱयापासून दूरही जाऊ शकत नाही, हेही तेवढेच सत्य आहे.

जाई उसवून धागा, नाही राहिली जागा

त्यांच्या घराबाबत बोलायचे तर ‘जाई उसवून धागा, नाही राहिली जागा’ अशी घराची अवस्था आहे. शासकीय नियम आणि चौकडय़ांच्या यादीचा विचार करता पुढील काही वर्षे तरी त्यांना शासकीय योजनेतील घर मिळेल का? हे सांगता येणे कठीणच आहे. म्हणूनच समाजातील दानशुरांनी पुढे येत पावसाळय़ापूर्वी या वृद्धेला घरकुलाचा आधरा देण्यासाठी प्रयत्न करण्याची नितांत आवश्यकता आहे. -

Related Stories

साठ लाखाच्या लूटप्रकरणी आणखी एक गजाआड

Patil_p

अत्यावश्यक साहित्य दुकानांबाबत दोन दिवसात निर्णय!

NIKHIL_N

मतलई वाऱयांमुळे मासेमारी थंडावली

Patil_p

अपुऱया तयारीविना व्यापारी गाळे ‘सील’ची कारवाई बोंबलली

Patil_p

पाली वळके सीमेनजीक बिबट्याचा वावर

Shankar_P

रत्नागिरी : पूरमुक्त साखरप्यासाठी ‘नाम’चा पुढाकार!

triratna
error: Content is protected !!