तरुण भारत

केंद्राला नाराजीची जाणीव करून देण्याची हीच संधी

माजी मंत्री आर. व्ही. देशपांडे : भाजपप्रणित राज्य सरकार सर्वच आघाडय़ांवर अपयशी : जारकीहोळीनाच विजयी करण्याचे आवाहन

प्रतिनिधी / बेळगाव

Advertisements

भाजपप्रणित राज्य सरकार सर्वच आघाडय़ांवर अपयशी ठरले आहे. जीवनावश्यक वस्तू महागल्याने गरीब आणि मध्यमवर्गीयांच्या डोळ्यात अश्रू येत आहेत. घर चालविणाऱया महिला हैराण झाल्या आहेत. उद्योगाला प्राधान्य नाही आणि बेरोजगारीचा प्रश्न आ-वासून उभा आहे. सरकारी आणि प्रशासकीय पातळीवर अनेक निर्णय चुकले असून या चुका थेट सामान्य माणसाच्या जीवनावर आघात करीत आहेत. जनतेत संताप आणि नाराजी आहे आणि या नाराजीची जाणीव करून देण्याची ही लोकसभा पोटनिवडणूक एक नामी संधी आहे. या निवडणुकीत अंध भक्ती नको तर डोळस व्हा आणि काँग्रेसला मतदान करा. कर्नाटकाचे माजी मंत्री आणि विद्यमान आमदार आर. व्ही. देशपांडे यांनी जनतेला उद्देशून हे आवाहन केले आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशपांडे यांनी ‘तरुण भारत’शी खास संवाद साधला.

आपल्या निर्णयांचा आणि निष्क्रियतेचा सामान्य जनतेवर काय परिणाम होत आहे, याकडे सरकारचे लक्ष नसेल तर अशा वेळी जनतेलाच जागरुक होऊन एक झटका द्यावा लागतो, तो दिलाच पाहिजे. अन्यथा, सरकार बेफाम होऊ शकते. जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेऊन यापूर्वी मतदान केले आहे. उमेदवाराची क्षमता आणि पात्रतेकडे दुर्लक्षच झाले. यामुळे बेळगाव लोकसभा मतदारसंघाचे तब्बल चार वेळा नुकसान झाले आहे. यासाठीच विकास व सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी काम करणारे काँग्रेसचे उमेदवार सतीश जारकीहोळी यांनाच प्रचंड बहुमताने विजयी करा, असे आवाहन आर. व्ही. देशपांडे यांनी केले.

सुरेश अंगडी यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक होण्याची वेळ आली. बेळगाव लोकसभा मतदारसंघातील जनता आधीच कोरोनाच्या महासंकटाने बिथरली असून भीती वाढत आहे. कायदा सुव्यवस्था, सुरक्षित जीवन, महागाईवर नियंत्रण, उद्योग, रोजगार हे जनतेसमोरचे प्रमुख प्रश्न आहेत. 1971 पासून आपण स्वतः अनेक निवडणुका पाहिल्या आहेत. जनतेचा कौल मिळवून आमदार ते मंत्रिपदापर्यंत कामे केली आहेत. आताचे कर्नाटकातील सरकार अनेक बाबतीत अपयशी ठरल्याचेच स्पष्टपणे जाणवत आहे. विकासाच्यादृष्टीने तर शून्यच आणि प्रशासकीयदृष्टय़ा उपेक्षा पदरी पडल्याने बेळगावची जनता राजकीय बदलाच्या तयारीत असल्याचे आपल्या पाहणी अहवालात दिसून आले आहे. यामुळे सर्व स्तरातील जनतेने आपला कौल काँग्रेसच्या बाजूने दर्शविला असल्याचे त्यांनी सांगितले.

सरकारचा वेंधळा कारभार

बेळगावचा समावेश स्मार्ट सिटीमध्ये झाला. केंदाने तो केला याचे स्वागतच आहे. मात्र, या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची जी काही अवस्था कर्नाटक सरकार व प्रशासनाने केली आहे, ते बघून दुःख होते. पाच वर्षे झाली तरी अद्याप रस्ते सुस्थितीत नाहीत, असा आरोप त्यांनी केला.

 वाहनधारकांचे कंबरडेच मोडले

केंद्रात युपीएचे सरकार असताना प्रुड ऑईलचे दर वाढले होते. तरीही पेट्रोल, डिझेल योग्य दरात उपलब्ध होत होते. आज प्रुड ऑईल स्वस्त असताना उलट परिस्थिती आहे. भारत सरकारने अर्थात एनडीएने वाढीव अबकारी करांचा मारा करून वाहनधारकांचे कंबरडेच मोडले आहे. घरगुती सिलिंडरचा दर 900 रुपयांपर्यंत गेला आहे. यातच आता 35 रुपये लिटरने मिळणारे रॉकेल वाटपच हद्दपार केले जाणार आहे. गॅसचा दर कमी न करता हा निर्णय घेणे म्हणजे सरकारने गोरगरिबांना आगीतून फुफाटय़ात नेऊन टाकल्यासारखेच आहे, याची जाणीव त्यांना करून द्यावी लागेल.

नोटाबंदीचा निर्णय सर्व स्तरात हाहाकार माजविणारा ठरला आहे. आज याचे परिणाम दिसत आहेत. उद्योजक व व्यापाऱयांना जीएसटीचा फटका बसला आहे. अधिकारराज वाढले की भ्रष्टाचार वाढतो याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे बेळगावची महापालिका आहे. तीन वर्षे लोकप्रतिनिधी नाहीत, यामुळे विकासकार्यावर कुणाचाच अंकुश नाही. आरक्षणाच्या नावाखाली समाजघटकांची दिशाभूल कर्नाटकात होत आहे. मराठा समाजाचे आरक्षणाचे घोंगडे फडणवीस काळात महाराष्ट्रात भिजत पडले तसेच ते कर्नाटकातही आहे. पंचमसाली समाजालाही आरक्षण देण्याचे गाजर दाखवून कर्नाटकाने फसविले आहे, असे ते म्हणाले.

अर्थव्यवस्थेचे वाटोळेच

पंतप्रधान मोदींनी प्रत्येक वर्षी तरुणांना रोजगार देऊ, असे आश्वासन सात वर्षांपूर्वी दिले होते. मात्र, झाले उलटेच. बेरोजगारी वाढत आहे, अर्थव्यवस्था तर कोरोना येण्यापूर्वीच घसरली होती. रोग आल्यावर तिचे वाटोळे झाले. लाखो लोक निरुद्योगी बनले. एका अहवालानुसार भारतातील बेरोजगारीचे प्रमाण 6.5 टक्के झाले असून याची चिड तरुणांमध्ये आहे. महिलांनाही बेरोजगारीचा फटका बसतोय. दरडोई उत्पन्न कमी आहे. याच मतदारसंघातील खादरवाडीचे उदाहरण बोलके होते. पूर्वी हे गाव ग्रामीण क्षेत्रात होते. तेथील महिलांना मनरेगातून कामे मिळत होती. आज विकासाच्या नावाखाली सारासार विचार न करता हे गाव मनपा क्षेत्रात घालण्यात आले अन् उत्पन्न बंद झाले. उलट वाढीव घरपट्टी भरावी लागत आहे, याचा त्यांनी उल्लेख केला.

Related Stories

निकृष्ट दर्जाचे पीपीई कीट ठरत आहेत त्रासदायक

Patil_p

सकाळची बेंगळूर फेरी होणार पूर्ववत

Patil_p

साहाय्यक अभियंत्याच्या घरावर एसीबीचा छापा

Patil_p

आता पुन्हा भाजीमार्केट तीन ठिकाणी स्थलांतरित

Amit Kulkarni

निपाणीत माहेरवाशिणीची गरजूंना मदत

Patil_p

आज पहिल्या टप्प्यातील मतदान

Patil_p
error: Content is protected !!