तरुण भारत

विराट कोहली नव्हे, बाबर आझम ‘टॉप’वर!

आयसीसी वनडे मानांकन जाहीर, बाबर टॉपला पोहोचणारा चौथा पाकिस्तानी फलंदाज

दुबई / वृत्तसंस्था

Advertisements

तब्बल 1258 दिवसांपासून विराट कोहली आयसीसी वनडे फलंदाजांच्या यादीत अव्वलस्थानी विराजमान होता. विराटचे ते अधिराज्य ताज्या मानांकन यादीत पाकिस्तानच्या बाबर आझमने संपुष्टात आणले आहे. 26 वर्षीय बाबर आझमच्या खात्यावर 865 गुण असून विराटपेक्षा तो 8 गुणांनी आघाडीवर राहिला आहे. आयसीसी वनडे मानांकनात टॉपवर पोहोचणारा बाबर हा केवळ चौथा पाकिस्तानी फलंदाज आहे.

26 वर्षीय बाबर आझमने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सेंच्युरियनवर झालेल्या शेवटच्या लढतीत 82 चेंडूत 94 धावांची धडाकेबाज खेळी साकारली आणि यामुळे तेथे त्याला 13 गुणांची कमाई करता आली. 2010 व 2012 मधील यू-19 विश्वचषक स्पर्धेतील स्टार फलंदाज बाबर 2015 पासून वनडे क्रिकेट खेळत आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिकेपूर्वी त्याच्या खात्यावर 837 रेटिंग गुण होते. मात्र, पहिल्याच लढतीत 103 धावांची शतकी खेळी साकारल्यानंतर तो 858 अंकांसह विराटपेक्षा पुढे आला.

दुसऱया वनडेत त्याला 32 धावा करता आल्या आणि यावेळी तो मानांकनात 852 अंकांसह खाली घसरला. त्यानंतर मात्र तिसऱया लढतीत आणखी एका दमदार खेळीसह त्याने अव्वलस्थान काबीज केले. बाबर आझम हा आयसीसी फलंदाजांच्या यादीत अव्वलस्थानी पोहोचणारा चौथा पाकिस्तानी फलंदाज असून यापूर्वी झहीर अब्बास (1983-84), जावेद मियांदाद (1988-89), मोहम्मद युसूफ (2003) यांनाच असा पराक्रम गाजवता आला आहे.

बाबर कसोटी क्रिकेटमध्ये सध्या सहाव्या स्थानी तर टी-20 मध्ये तिसऱया स्थानी आहे. डावखुरा पाकिस्तानी सलामीवीर फक्र झमान देखील वनडे फलंदाजांच्या यादीत कारकिर्दीतील सर्वोत्तम सातव्या स्थानी पोहोचला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिकेदरम्यान त्याने 101 धावांची खेळी साकारली होती.

डावखुरा जलद गोलंदाज शाहिन आफ्रिदी कारकिर्दीतील सर्वोत्तम 11 व्या तर डावखुरा फिरकीपटू मोहम्मद नवाज 96 व्या स्थानावरुन चक्क 29 व्या स्थानी झेपावले आहेत. कोहलीचा डेप्युटी रोहित शर्माला 825 गुणांसह तिसरे स्थान मिळाले आहे.

गोलंदाजांमध्ये जसप्रित बुमराहने चौथे स्थान कायम राखले असून न्यूझीलंडचा ट्रेंट बोल्ट, अफगाणचा मुजीब रहमान, न्यूझीलंडचाच मॅट हेन्री पहिल्या तीन स्थानी आहेत. पहिल्या 10 अष्टपैलू खेळाडूंच्या मानांकनात भारताचा रविचंद्रन अश्विन हा एकमेव समाविष्ट आहे. त्याला नववे स्थान मिळाले आहे. बांगलादेशचा शकीब हसन यात आघाडीवर आहे.

Related Stories

केएल राहुलच्या तडाख्यात चेन्नई सुपरकिंग्सचा धुव्वा!

Amit Kulkarni

बांगलादेशला विजयासाठी 299 धावांचे आव्हान

Patil_p

स्पेनचा टेनिसपटू पेरेझवर आठ वर्षांची बंदी

Patil_p

इंग्लंड-भारत डे-नाईट कसोटी अहमदाबादमध्ये

Patil_p

आशियाई सांघिक टेटे चॅम्पियनशिपमध्ये भारताला कांस्यपदक

Patil_p

आशिया चषक महिलांची फुटबॉल स्पर्धा पुढील वर्षी भारतात

Amit Kulkarni
error: Content is protected !!