तरुण भारत

पश्चिम बंगालमध्ये काय होणार ?

सध्या आसाम, प. बंगाल, तामिळनाडू आणि केरळ ही चार राज्ये तसेच पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशात विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. बंगाल वगळता इतरत्र मतदान पूर्ण झाले आहे. बंगालमध्ये मतदानाचे निम्मे म्हणजे 4 टप्पे पूर्ण झाले आहेत. या राज्यात विधानसभेच्या 294 जागा असून त्यापैकी 135 मतदारसंघांमध्ये मतदान झाले आहे. वास्तविक विधानसभा निवडणुकांची ही फेरी वृत्तपत्रे किंवा माध्यमे यांच्या दृष्टीने नेहमीचीच व सामान्य ठरली असती. तथापि, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत अनपेक्षितरित्या या राज्यात भाजपने जोरदार कामगिरी केली आणि राजकीय अभ्यासकांच्या, विशेषतः विचारवंतांच्या भुवया उंचावल्या. तामिळनाडू, केरळ आणि आंध्र प्रदेश आदी काही राज्यांप्रमाणे बंगालमध्येही भाजपचे अस्तित्व अगदी कालपरवापर्यंत नाममात्र होते. विधानसभेच्या 2-3 जागा किंवा लोकसभेच्या 1-2 जागा मिळाल्या तरी मोठेच यश मिळाले असे वाटावे अशी स्थिती होती. पण लोकसभा निवडणुकीने सारेच चित्र पालटले. या राज्यात आपली एवढी शक्ती असू शकेल याची भाजपलाही कल्पना नसावी. कारण लोकसभा निवडणुकीत या राज्यात त्या पक्षाने फारसे प्रयत्नही केले नव्हते. तरीही एवढे यश पदरात पडल्यामुळे विधानसभा निवडणुकीतही या यशाची पुनरावृत्ती करता येईल. इतकेच नव्हे, तर या यशात अधिक भर टाकता येईल, अशी त्या पक्षाची मनोभूमिका बनली असल्यास ते स्वाभविकच मानावे लागेल. त्यामुळे त्या पक्षाने या राज्यात या विधानसभा निवडणुकीत प्रयत्नांची पराकाष्ठा चालविली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः पुढाकार घेऊन प्रचाराची धुरा सांभाळली आहे. साहजिकच या संग्रामाला ‘मोदी विरूद्ध दीदी’ असे स्वरूप आले आहे. हे स्वरूप येण्यामध्ये केवळ हे 2 नेतेच कारणीभूत आहेत असे नव्हे, तर नेहमी टीआरपीच्या शोधात असणारा टीव्ही मीडियाही याला कांकणभर अधिक कारणीभूत आहे. त्यामुळे या राज्यात भाजपचे अचानकपणे समोर आलेले सामर्थ्य व आपले वर्चस्व टिकवून धरण्यासाठी ममता बॅनर्जी यांनी चालविलेला संघर्ष, यामुळे ही निवडणूक अन्य चार प्रदेशांमधील निवडणुकीपेक्षा अधिक रंगतदार होत असून सर्वाधिक चर्चेचा विषय झाली आहे. वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या, सोशल मीडिया इत्यादी सर्व माध्यमांवर या निवडणुकीला जितकी प्रसिद्धी होत आहे, तिच्यासमोर इतर निवडणुका फिक्या पडल्या आहेत, असे दिसून येते.  बंगालमध्ये काय होणार, कोण येणार, मोदी की दीदी हे प्रश्न राजकीय तज्ञांपासून सर्वसामान्यांच्या तोंडी आहेत. खरे तर या प्रश्नांचे नेमके उत्तर आज कोणालाच निश्चितपणे माहीत नाही. जो तो त्याच्या स्वतःच्या राजकीय कलानुसार या राज्यातील घटनांचे अर्थ लावून स्वतःच्या विचारसरणीला अनुकूल अशी उत्तरे मांडण्यात मग्न आहे. त्यातच ममता बॅनर्जींची प्रचाराची पद्धती, त्यांची भाषा आणि देहबोली यामुळे गोंधळात भरच पडली आहे. पहिल्या टप्प्याचे मतदान होण्यापूर्वी काही दिवस त्यांचा पाय अपघातात दुखावल्याचे सांगण्यात आले. भाजपने हल्ला करून आपली अशी अवस्था केली असे सांगण्याचा प्रयत्न त्यांनी प्रथम केला. तथापि, या प्रसंगाच्या सीसीटीव्ही चित्रणातून हल्ला झाल्याचे कोणतेही लक्षण दिसत नाही. प्राथमिक चौकशीतून तसे सिद्धही झाले आहे. मात्र, या ‘जखमनाटय़ा’चा फारसा उपयोग होत नाही, हे लक्षात येताच त्यांनी हल्ल्याची भाषा बंद केल्याचे दिसून येते. नंतर त्यांनी भाजपच्या हिंदू मतपेढीला उत्तर देण्यासाठी आपण ब्राह्मण आहोत व आपले गोत्र शांडिल्य आहे, असे भर जाहीर सभेत सांगितले. चंडीपाठही म्हणून दाखविला. आपल्या धर्मनिरपेक्ष प्रतिमेचा अभिमान बाळगणाऱया बॅनर्जींना चंडीपाठ म्हणून आपले जात-गोत्रही सांगावे लागले हा विचारवंतांच्या दृष्टीने आश्चर्याचा, तर त्यांच्या राजकीय विरोधकांच्या दृष्टीने टीकेचा विषय बनला. निवडणूक जशी पुढे सरकू लागली तसा त्यांचा संयम अधिकच सुटत चालल्याचेही स्पष्ट होऊ लागले. पंतप्रधान मोदींवर टीका करताना त्या अद्वातद्वा भाषा वापरत असल्याचे दिसते. पंतप्रधान मोदींच्या गळय़ात दोरी बांधून त्यांना मारले पाहिजे, अशा पद्धतीची वक्तव्ये एका मुख्यमंत्र्याच्या तोंडी आल्याचे पाहून अनेकांना अचंबा वाटत आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी मुस्लीम मतदारांना एकगठ्ठा मतदान करण्याचे आवाहन केले. त्याची केंद्रीय निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेतली. निवडणुकीच्या कामासाठी आलेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या सैनिकांना घेराव घाला, असा प्रक्षोभक संदेश त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला. त्यातूनच चौथ्या टप्प्याचे मतदान सुरू असताना उसळलेल्या हिंसाचारात 5 जणांचा बळी गेला, असा आरोप होत आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने त्यांच्यावर एक दिवसाची प्रचारबंदी घातली. त्यातच भर म्हणून त्यांचे राजकीय सल्लागार प्रशांत किशोर यांनी काही पत्रकारांशी केलेल्या गुप्त चर्चेची ध्वनीफित बाहेर पडली. बंगालमध्ये पंतप्रधान मोदी मोठय़ा प्रमाणात लोकप्रिय आहेत. भाजपचा जोर वाढत आहे, लोक ममता बॅनर्जींसंबंधात नाराज आहेत, असे अनेक गौप्यस्फोट किशोर यांनी ध्वनिफितीतून केल्याचे दिसून येते. नंतर त्यांनी त्याचे स्पष्टीकरणही दिले आहे. मात्र, या साऱया घडामोडी अनोख्या आहेत. त्यामुळे या निवडणुकीची स्थिती धूसर बनली आहे. ममता बॅनर्जी व त्यांचे राजकीय सल्लागार हे सर्व जाणून बुजून आणि त्यांच्या राजकीय डावपेचांचा भाग म्हणून करीत आहेत, की त्यांना आपल्या राजकीय भवितव्याची चिंता वाटू लागली आहे, याचे स्पष्ट उत्तर मिळणे कठीण आहे. भल्या भल्या तज्ञांनाही या घडामोडींचा वेध घेणे अशक्य वाटू लागले आहे. त्या ज्या आक्रस्ताळय़ा पद्धतीने प्रचार करीत आहेत, तो त्यांचा स्वभाव आहे, की त्यांना निवडणूक निकालाच्या चिंतेने ग्रासल्याने त्या असा त्रागा करीत आहेत हे देखील कोडेच आहे. पण एक खरे, की या साऱया कृतींमुळे या निवडणुकीचे ‘वृत्तमूल्य’ प्रचंड वाढले आहे. नेमके काय होणार हे 2 मे या दिवशीच समजणार आहे. तोपर्यंत उत्सुकतेवर नियंत्रण ठेवणे सर्वांना भाग आहे.

Related Stories

बेगडय़ा सहानुभूतीचे राजकारण

Omkar B

आमची खटय़ाळ पिढी

Patil_p

ओबीसींना न्याय, मराठा युवकांवर अन्याय!

Patil_p

जुन्या पुस्तकातले जग

Patil_p

पाकिस्तानला एकदा धडा शिकवाच

Patil_p

आर्जव

Patil_p
error: Content is protected !!