तरुण भारत

सांखळीत सूडाचे राजकारण थांबता थांबेना

राजेश सावळ नंतर राया पार्सेकर यांना अपात्रता नोटिस : धर्मेश सगलानी गटाला नामोहरम करण्याचा सरकारी प्रयत्न

प्रतिनिधी / पणजी

Advertisements

भाजप उमेदवाराच्या पराभवाच्या धक्क्यातून अद्याप बाहेर न आलेल्या सरकारने पालिकेत बहुमतासाठी आवश्यक आकडा पार केलेल्या धर्मेश सगलानी यांच्या गटातील आणखी एका नगरसेवकाला अपात्र करण्यासाठी पोलीस फौज पाठवून नगरसेवकाच्या घरावर नोटिस चिकटविली आहे. आज शुक्रवारी सांखळीचे नगराध्यक्ष यशवंत माडकर यांच्या विरोधात अविश्वास ठरावावर चर्चा होण्याअगोदर एका नगरसेवकाला अपात्र करण्याची जबाबदारी पुन्हा एकदा नगरविकासमंत्री मिलिंद नाईक यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

सांखळी नगरपालिकेच्या राजकारणावरुन धुमश्चक्री सुरु झाली आहे. 12 सदस्यीय या पालिकेत धर्मेश सगलानी यांच्या पारडय़ात 7 सदस्यांचे बळ आहे तर विद्यमान भाजप प्रणित नगराध्यक्ष यशवंत माडकर यांच्याकडे केवळ 6 नगरसेवक आहेत. मात्र धर्मेश सगलानी यांना नगराध्यक्षपद मिळू नये यासाठी भाजपने प्रचंड आटापिटा चालू केला आहे.

गेल्याच महिन्यात झालेल्या पोट निवडणुकीत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी निवडणुकीत उभा केलेला उमेदवार पडला आणि त्या जागी धर्मेश सगलानी गटाचा उमेदवार विजयी झाल्याने सत्ताधारी भाजपने या पालिकेत बहुमत गमविले आहे. धर्मेश सगलानी यांनी नगराध्यक्षाविरोधात अविश्वास ठरावाची नोटीस देताच 30 एप्रिल पर्यंत हा ठराव पुढे ढकलण्याचा निर्णय नगरविकास खात्याने घेतला होता.

राजेश सावळ अपात्रता निवाडा 19 रोजी

सगलानी यांनी उच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर सांखळीसाठी वेगळा न्याय व कुडचडेसाठी वेगळा न्याय कसा? असा सवाल केला. न्यायालयात प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी 16 एप्रिल तारीख मुकर केली. आज त्यावर दुपारी 2.30 वा. सांखळी पालिका बैठकीत चर्चा होणार आहे. या पार्श्वभूमीवर धर्मेश सगलानी गटातील एका नगरसेवकाला अपात्र ठरविण्यासाठी नगरविकासमंत्री मिलिंद नाईक यांच्या न्यायालयात सुनावणी घेण्यात आली. गुरुवारी दुपारी राजेश सावळ हे नगरसेवक अपात्र ठरणार होते मात्र सगलानी यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली असता दि. 19 एप्रिलपर्यंत कोणताही निवाडा दिला जाऊ नये असे आदेश सरकारला दिल्याने सरकार पक्षाचा पराभव झाला. सरकारला चांगलीच चपराक मिळाली व शुक्रवारी होणाऱया अविश्वास ठरावात नगराध्यक्ष यशवंत माडकर यांचा पराभव निश्चित होता.

नगरसेवक राया पार्सेकर यांनाही अपात्रता नोटिस

मात्र राजकीय सूड एवढय़ावरच न थांबता शुक्रवारच्या अविश्वास ठरावाच्या बैठकीच्या पूर्वसंध्येला सायंकाळी 7.30 वा. दरम्यान धर्मेश सगलानी गटाचे नगरसेवक राया पार्सेकर यांच्या घरी पोलीस फौज पोहोचली. त्यांना अपात्र का करण्यात येऊ नये? अशा आशयाची नोटीस त्यांच्या घराच्या दारावर चिकटविण्यात आली आणि या विषयावरील सुनावणी आज शुक्रवारी दुपारी 12.30वा. नगरविकासमंत्री मिलिंद नाईक यांच्या वास्को येथील शासकीय बंगल्यावर होणार आहे. राया पार्सेकर यांना या सुनावणीच्या वेळी जातीने हजर राहाण्यास सांगितले आहे. तक्रारदार खुद्द नगराध्यक्ष यशवंत माडकर हे आहेत.

यानंतर दुपारी 2.30 वा. नगराध्यक्षवरील अविश्वास ठरावावर चर्चा होईल. सायंकाळी या घटनेचे वृत्त समजताच सांखळीत एकच खळबळ माजली तसेच संतप्त प्रतिक्रिया सुरु झाल्या.

लोकशाहीची हत्या करण्याचा डाव : कामत

मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने सरकारला योग्य निर्देश दिल्यानंतरही सांखळी नगरपालिकेत लोकशाहीची हत्या करण्याचा भाजप सरकारचा डाव असल्याची टीका विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी केली आहे. अविश्वास ठराव प्रस्तावावरील चर्चेत भाग घेऊन मतदान करण्याचा प्रत्येक नगरसेवकास घटनात्मक अधिकार आहे. सरकारला कुटील डावाने तो हिरावुन घेण्याचा अधिकार नाही, असे कामत यांनी म्हटले आहे.

Related Stories

मडगाव पालिकेच्या कचरापेटय़ा मोठय़ा प्रमाणात पडून

Patil_p

पशुखाद्य दरवाढीप्रकरणी दुध उत्पादकांचे आंदोलनास्त्र

Patil_p

शांतादुर्गा फातर्पेकरीणचा जत्रोत्सव उत्साहात

Amit Kulkarni

कळंगुटकवासीयांना शहरीकरण नको असल्यास अध्यादेश रोखणार : मंत्री लोबो

Amit Kulkarni

मडगाव परिसरात 13.62 लाखाचा ड्रग्ज जप्त

Patil_p

गणेश बाप्पाच्या आगमनासाठी सत्तरी तालुका सज्ज

Patil_p
error: Content is protected !!