तरुण भारत

‘ताऊजीं’ची मोहीम फत्ते…

नक्षलींच्या तावडीतील कमांडोच्या सुटकेसाठी ‘मध्यस्थी’, बस्तर परिसरातील सेवाव्रत सार्थकी लागल्याची प्रचिती

मुलींच्या शिक्षणाच्या ध्यासापोटी नक्षलप्रवण क्षेत्रात कार्य

Advertisements

मागील आठवडय़ात छत्तिसगडमधील विजापूर येथे सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमधील चकमकीत 22 सैनिक हुतात्मा झाले. तसेच कोब्रा कमांडो राकेश्वर सिंग मनहास यांना नक्षलवाद्यांनी पळवून नेले. आधीच 22 जवानांच्या हौतात्म्याने शोकाकुल झालेला देश कमांडोच्या अपहरणामुळे आणखी चिंतीत झाला. या कमांडोचे नक्षलवादी काही बरे-वाईट तर करणार नाहीत ना, असा प्रश्नही मनाला स्पर्श करून गेला. दोन वर्षांपूर्वी ‘पीओके’मध्ये घडलेले सर्जिकल स्ट्राईक आणि पाकिस्तानच्या तावडीत सापडलेला भारतीय जवान अभिनंदन याच्या आठवणीही ताज्या झाल्या. याच दरम्यान केंद्र सरकार आणि सुरक्षा-पोलीस प्रशासनाने नक्षलवाद्यांशी चर्चा करण्यासाठी आणि भारतीय कमांडोच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू पेले. अखेरीस पाच दिवसांनंतर राकेश्वर सिंग याची सुखरुपपणे सुटका करण्यात आली. या सर्व प्रक्रियेमध्ये 92 वर्षीय धरमपाल सैनी उर्फ ‘ताऊजी’ यांनी चोखपणे मध्यस्थाची भूमिका निभावली.

वयोवृद्ध धरमपाल सैनी बस्तरमध्ये ‘ताऊजी’ म्हणून प्रसिद्ध आहेत. कमांडोच्या सुटकेसाठी त्यांनी सरकार आणि नक्षलवाद्यांमध्ये मध्यस्थी केली. धरमपाल सैनी यांची जीवनगाथा खूपच रंजक आहे. बस्तर परिसरात गेल्या कित्येक वर्षांपासून
ते सक्रियपणे जागृतीपर सेवा बजावत आहेत. मुलींच्या आयुष्यात उषःकाल निर्माण करणारे त्यांचे कार्य प्रत्येकासाठी प्रेरणादायी असेच आहे.

गुरुंची आज्ञा मानत ‘क्रांती’मार्गाकडे…

धरमपाल सैनी हे मूळचे मध्यप्रदेशातील धार जिल्हय़ातील रहिवासी आहेत. ते विनोबा भावे यांचे शिष्य होते. ते उत्तम ऍथलिट्स असून आग्रा विद्यापीठातील वाणिज्य पदवीधरही आहेत. 60 च्या दशकात त्यांनी एका वर्तमानपत्रात बस्तरमधील मुलींसंबंधीचे वृत्त वाचले होते. सदर बातमीमध्ये दशहरा जत्रेतून परतताना काही उपद्व्यापी पोरांनी मुलींची छेड काढल्याचा उल्लेख होता. या
प्रकारानंतर त्या मुलींनी छेडछाड करणाऱयांचे हात-पाय कापून त्यांना मारल्याचेही नमूद केले होते. हे वृत्त वाचून सैनी थक्क झाले. मुलींच्या आक्रमक पवित्र्याचा हेवा वाटल्याने त्यांनी इथल्या मुलींना बस्तर येथे जाऊन योग्य दिशा देण्याची तयारी  दर्शवली. त्यानंतर आपली इच्छा त्यांनी आपले गुरू विनोबा भावे यांच्याकडे बोलून दाखवली. विनोबा भावे यांनीही त्यांना होकार दर्शवत त्यांच्या हातावर पाच रुपये टेकवत परवानगी देऊन टाकली. तसेच किमान दहा वर्षे बस्तरमध्ये राहण्याची अटही घातली. सैनी यांनी गुरुज्ञा शिरसावंद्य मानत बस्तरकडे मार्गक्रमण केले अन्  तेथील मुलींच्या आयुष्याला बळ देत नवी क्रांती घडविली.

मुलींच्या आयुष्याला दिली नवी दिशा

1976 साली सैनी बस्तर येथे दाखल झाले. त्यानंतर त्यांनी विविध पातळीवर आपले अध्ययन सुरू केले. बस्तर भागात वास्तव्य करतानाच तेथील लोकांचा अगदी सखोलपणे अभ्यास केला. जेव्हा ते बस्तरला आले, तेव्हा त्यांनी लहान मुलेसुद्धा 15 ते 20 किलोमीटर सहजपणे चालत-फिरत असल्याचेही पाहिले. हाच धागा पकडत त्यांनी खेळ व शिक्षण अशा दोन्ही क्षेत्रात मुलींना तरबेज करण्याचा विडाच उचलला. तेथील लोकांमध्ये जागृती निर्माण करत त्यांनी मुलींना मुख्य
प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. स्वतः आश्रम सुरू करून तेथे ते मुलींना शिक्षण देऊ लागले. 1985 मध्ये पहिल्यांदा त्यांनी आश्रमातील विद्यार्थ्यांना क्रीडा स्पर्धेत उतरवले. यानंतर त्यांनी बस्तरमधील हजारो मुलींना खेळाशी जोडले. त्यांच्या या कार्याची दखल राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली गेली. 1992 साली मुलींच्या शिक्षणातील उल्लेखनीय योगदानाबद्दल सैनी यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच 2012 मध्ये ‘द वीक’ मासिकाने सैनी यांना ‘मॅन ऑफ दी इयर’ म्हणून गौरविले होते. या सन्मानातूनच त्यांच्या कार्याची ओळख अधोरेखित होते.

‘चमक’दार कार्य…

गांधीवादी विचारांवर आणि आदर्शांवर विश्वास ठेवणारे सैनी सध्या बस्तर विभागात 37 आश्रम चालवितात. हे आश्रम म्हणजे एक प्रकारची वसतिगृहे असून आदिवासी मुली येथे राहून अभ्यास करतात. येथील मुली सैनींच्या
आश्रमामध्ये शिकून उच्चपदस्थ अधिकारीही बनलेल्या आहेत. 1975 च्या सुमारास बस्तरमधील साक्षरता आलेख दहा टक्केदेखील नव्हता. मुलींना शाळेची ओळखही नव्हती. मात्र, सैनी यांनी जगजागृती करत मुलींच्या आयुष्यात शिक्षणाचे द्वार खुले करून दिले. आता येथील मुली-महिलांमधील साक्षरतेचे प्रमाण
प्रचंड सुधारलेले आहे. आज सैनींच्या आश्रमात शिकलेल्या विद्यार्थिनी मुख्य
प्रवाहात आलेल्या आहेत. काहीजणी महत्त्वाच्या पदांवर कार्यरत आहेत.

समाजभान राखत ध्येयपूर्ती

सैनांच्या आश्रमात राहणाऱया मुलींना विविध क्रीडा स्पर्धांमध्ये कित्येक पुरस्कार मिळाले आहेत. आता दरवषी किमान 100 विद्यार्थिनी वेगवेगळय़ा स्पर्धांमध्ये आपली चमक दाखवतात. आतापर्यंत 2,300 आश्रम विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा स्पर्धांमध्ये उत्तुंग भरारी घेतलेली आहे. डिमरापाल येथील आश्रमात मुलींनी जिंकलेली कित्येक पदके आणि ट्रॉफी ठेवण्यात आल्या आहेत. आश्रमातील विद्यार्थ्यांनी आतापर्यंत खेळात बक्षीस म्हणून 30 लाखाहून अधिक रक्कमही जिंकली आहे. हेच सैनी यांच्या समाजभानाचे मोठे गमक आहे.

…अन् सूचले ‘ताऊजीं’चे नाव !

चकमकीनंतर नक्षलींनी अपहृत केलेल्या राकेश्वर मनहास या कमांडोला सोडविण्यासाठी पोलीस, प्रशासन आणि गुप्तचर यंत्रणा सर्वतोपरी प्रयत्न करत होते. याचदरम्यान निष्पक्ष व्यक्तीशी बोलल्यानंतर नक्षलवादी कमांडोची सुटका करू शकतील, अशी जाणीव यंत्रणांना झाली. या जाणीवेतूनच ‘ताऊजी’ अर्थात धरमपाल सैनी यांचे नाव पुढे आले. ‘ताऊजी’ यांना 1976 पासून बस्तरची चांगली ओळख आहे. ते येथील नक्षलग्रस्त गावांमध्ये शिक्षण जागृतीचे काम करत आहेत. अशा परिस्थितीत ‘ताऊजी’ सरकार आणि नक्षलवादी यांच्यात संवाद घडवून आणण्यासाठी मध्यममार्ग काढू शकतील, याची खात्री पटताच पोलिसांनी त्यांच्याशी तातडीने संपर्क साधला. पोलीस-प्रशासनाच्या प्रस्तावावर त्यांनीही होकार दर्शवत हे आव्हान पेलण्याची तयारी दर्शवली. ‘ताऊजी’ यांनी यापूर्वीही अनेकवेळा नक्षलवाद्यांशी संवाद साधून बस्तरमध्ये शांतता प्रस्थापित करण्याची इच्छा व्यक्त केली होती. अखेरीस ‘ताऊजी’ यांच्यासह गोंडवाना समाज अध्यक्ष तेलम बोरैया आणि काही निवडक पत्रकारांना या मोहिमेवर पाठविण्यात आले. सरकारने मध्यस्थाची भूमिका पार पाडण्याची दिलेली मोठी जबाबदारी यशस्वीपणे पेलत ताऊजींनी आपली ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली.

नक्षलवादाशी आव्हानात्मक लढाई

विजापूर येथील चकमकीत नक्षलवाद्यांची किती जीवितहानी झाली हे गुलदस्त्यात असले तरी 22 वीर जवानांना प्राण गमवावे लागल्याने नक्षलवाद्यांची ताकद अद्याप कमी झालेली नाही, हेच दिसून येते. वर्षामागून वर्षे उलटत असतानाच नक्षली कारवाया पूर्णपणे रोखण्यात सरकारला अद्याप यश आलेले नाही. काही भागातील कारवाया कमी झाल्या तरी छत्तिसगड, आंध्रप्रदेश, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, बिहार, उत्तर प्रदेशधील अरण्यमय भागात नक्षलवादी किंवा तत्सम संघटना आजही
सक्रियपणे वावरताना दिसतात. या संघटनांशी लढा द्यायचा असल्यास सरकारला अधिक प्रभावीपणे नियोजन करावे लागेल. सुरक्षा यंत्रणांवरील हल्ले किंवा चकमकी ताबडतोब थांबणार नाहीत, हे निश्चित आहे. तरीही शूर सैनिकांचे प्राण वाचविण्यासाठी काहीतरी धडपड करणे क्रमप्राप्त आहे.

काय करता येईल…

नक्षलवादी हल्ल्याची सखोल चौकशी होणे आवश्यक

नक्षलवाद्यांचा वाढता प्रभाव वेळीच रोखण्याची गरज

सुरक्षा दलाच्या जवानांचे मनोबल वाढविण्याची गरज

सुरक्षा यंत्रणांमधील त्रुटींचा आढावा घेतला पाहिजे

जवानांच्या शौर्याबद्दल शंका-कुशंका उपस्थित करू नयेत

केंद्रीय अर्धसैनिक दलाला सर्व कायदेशीर हक्क द्यावेत

आदिवासींना विकासाशी जोडण्याबरोबरच भागीदार बनवावे

राजकारणी व सामाजिक संस्थांनी पुढाकार घ्यायला हवा

संकलन – जयनारायण गवस

Related Stories

सोने ‘पन्नाशी’पार, चांदीलाही चकाकी

Patil_p

विश्व हिंदू परिषदेतर्फे सैनिकांसाठी राखी संकलन अभियान

Rohan_P

पौलोमी पाविनी फोर्ब्सच्या यादीत

Amit Kulkarni

दगडूशेठ मंदिरात श्री गणेश परिवारातील मूर्तींची कायमस्वरुपी स्थापना

prashant_c

सौरऊर्जेचा ‘पॉवर’फुल प्रयोग

Patil_p

गुगलचे पद्मश्री आरती साहा यांच्या जयंतीनिमित्त खास डूडल

Rohan_P
error: Content is protected !!