तरुण भारत

दक्षिणेत दुपारनंतर मतदानासाठी उत्साह

प्रतिनिधी/ बेळगाव

दक्षिण मतदारसंघामध्ये सकाळच्या सत्रात अत्यंत संथगतीने मतदानाला सुरुवात झाली. कोरोना भीतीच्या छायेखाली मतदान केंद्रांवर म्हणावी तशी गर्दी होताना दिसत नव्हती. सकाळी 9 पर्यंत 2.8 टक्केच मतदान झाले होते. सकाळी 11 पर्यंत 12.75 टक्के मतदान झाले. त्यानंतर दुपारी 1 वाजता 20.28 टक्के मतदान झाले. सायंकाळच्या सत्रात मात्र मतदारराजा घराबाहेर पडला आणि मतदानाचा हक्क बजावताना दिसत होता.

Advertisements

दक्षिण मतदारसंघातील ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरामध्ये काही प्रमाणात अधिक उत्साह दिसला. मात्र मच्छे, पिरनवाडी, येळ्ळूर या परिसरातही मतदारराजा सकाळी आणि सायंकाळीही मतदानाचा हक्क बजावताना दिसत होता. दुपारी 3 पर्यंत 39.3 टक्के मतदान झाले होते तर 5 वाजता 42.3 टक्के मतदानाची टक्केवारी पोहोचली होती.

कोरोना आणि उन्हाचा तडाखा यामुळे दुपारच्या सत्रात मतदान केंद्रांमध्ये तुरळक गर्दी दिसत होती. यातच मतदान केंद्र आणि मतदान क्रमांक मिळत नसल्यामुळे अनेकांना नाहक त्रास सहन करावा लागला. ग्रामीण भागातील मतदार सकाळच्या सत्रात मतदानासाठी बाहेर पडला नाही. त्यानंतर दहाच्या सुमारास काही ठिकाणी गर्दी दिसत होती. मात्र विधानसभा, जिल्हा पंचायत, तालुका पंचायत आणि ग्राम पंचायतींच्या निवडणुकांवेळी जो उत्साह असतो तो या निवडणुकीत दिसून आला नाही.

मराठी भाषिक असलेल्या दक्षिण मतदारसंघामध्ये म. ए. समितीचे कार्यकर्ते मात्र मतदान करून घेण्यासाठी झटत होते. घरोघरी मतदारांच्या पावत्या पोहोचवून मतदान करण्याचे आवाहन ते करत होते. इतर राष्ट्रीय पक्षांचे कार्यकर्ते काही ठिकाणी टेबल थाटून होते. मात्र, त्यांच्यामध्ये म्हणावा तसा उत्साह दिसून येत नव्हता.

थर्मल स्क्रिनिंग-सॅनिटायझरचा वापर

थर्मल स्क्रिनिंग करूनच मतदारांना आत सोडण्यात येत होते. याचबरोबर प्रत्येकाला सॅनिटायझर देण्यात येत होते. कोरोनाबाबतची दक्षता घेण्यात आली होती. यासाठी आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी कर्मचारी, होमगार्ड यांच्या मदतीने ही कामे करण्यात येत होती. तोंडावर मास्क असल्याशिवाय प्रवेशही देण्यात येत नव्हता. त्यामुळे मास्क न घालता आलेल्या अनेक मतदारांना माघारी परतावे लागले.

येळ्ळूर येथील शिवाजी विद्यालय, येळ्ळूरवाडी शाळा, मराठी मॉडेल स्कूल, येळ्ळूर वेशीतील समिती शाळा येथे मतदान झाले. सुळगा-येळ्ळूर येथे सरकारी मराठी शाळेमध्ये मतदान करण्यात आले. अवचारहट्टी येथे मराठी प्राथमिक शाळेमध्ये मतदान घेण्यात आले. धामणे येथे कन्नड शाळेमध्ये मतदान झाले. 

वडगाव येथील पाच क्रमांक, तीन क्रमांक या शाळांमध्ये मतदान पार पडले. टिळकवाडी येथील सुभाष मैदान येथे मतदान झाले. टिळकवाडी हायस्कूल आणि स्वाध्याय विद्यामंदिर येथेही मतदान पार पडले. भवानीनगर येथील शाळेमध्ये मतदान झाले. मंडोळी येथेही मोठय़ा चुरशीने मराठी शाळेमध्ये मतदान झाले. या ठिकाणी महिलांनीच अधिक मतदान केल्याची आकडेवारी उपलब्ध झाली आहे.

शहापूर येथील चिंतामण स्कूल, होसूर येथील प्राथमिक शाळा या परिसरात मतदान झाले. अनगोळ, मजगाव, झाडशहापूर येथेही शांततेत मतदान होताना दिसत होते. या ठिकाणी कार्यकर्ते मोठय़ा जोशामध्ये मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करत होते. शहरामध्ये मात्र सकाळच्या सत्रातच अधिक मतदान झाले होते. दुपारी मात्र शहरामध्ये मतदार मतदान करण्यासाठी बाहेर पडले नाहीत. सायंकाळच्या सत्रात पुन्हा मतदारांनी गर्दी केल्याचे दिसून आले. दक्षिण मतदारसंघामध्ये मोठय़ा चुरशीने मतदान झाले तरी मतदानाचा वेग मात्र संथच होता.

ईव्हीएमचे बटण दाबल्यानंतर उशिराने प्रतिसाद

ईव्हीएम यंत्राद्वारे हे मतदान घेण्यात आले. मतदानासाठी बटण दाबल्यानंतर मतदान झाल्याचा बऱयाच उशिरानंतर आवाज येत होता. त्यामुळे मतदारांना बराच उशीर त्या ठिकाणी थांबावे लागत होते. काही ठिकाणी तर आवाजच येत नव्हता. अशा तक्रारी वाढल्या होत्या. ईव्हीएममधील बटण दाबल्यानंतर व्हीव्हीपॅटमध्ये  कोणत्या उमेदवाराला मतदान पडल्याचे दिसत होते.

अनेक मतदारांच्या नावांमध्ये चुका

अनेक ठिकाणी मतदारांच्या नावांमध्ये चुका होत्या तर महिलेच्या ठिकाणी पुरुषाचा फोटो असल्याचे आढळून आले. त्यामुळे मतदारांतून नाराजी व्यक्त करण्यात आली. वडगाव येथील शाळा क्रमांक पाचमधील 152 मतदान क्रमांक केंद्रावर मतदार याद्यांमध्ये चुका असल्याचे दिसून आले. सुषमा उत्तम पाटील या मतदान करण्यासाठी गेल्या असता त्यांचे नाव तेथून डिलीट झाले होते तर त्याच ठिकाणी असलेल्या 145 क्रमांक मतदान केंद्रावर त्यांचे नाव होते. त्या ठिकाणी दुसऱयाच व्यक्तीचा फोटो होता. त्यामुळे मतदान करण्यास त्यांना मुकावे लागले. याबद्दल त्यांनी निवडणूक अधिकाऱयांकडे तक्रारही केली.

मतदार याद्यांमधून अनेकांची नावे गायब

मतदार याद्यांमधून अनेकांची नावे गायब झाली होती. दरवेळी अशाप्रकारे नावे गायब होत आहेत. त्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. येळ्ळूर येथील अनेक तरुणांनी यापूर्वीच्या अनेक निवडणुकांवेळी मतदान केले आहे. मात्र यावेळी त्यांची नावे गायब झाल्याचे दिसून आले. यामुळे त्या तरुण मतदारांतून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.

Related Stories

स्मार्ट सिटी कामांचे साहित्य पळविण्याचे प्रकार

Patil_p

बेळगाव जिल्हय़ात साडेतीन हजार अहवाल निगेटिव्ह

Rohan_P

स्थलांतरित भाजी मार्केटमध्ये वर्दळ वाढली

Amit Kulkarni

होळीवर पुन्हा कोरोनाचे सावट

Amit Kulkarni

एस. एल. घोटणेकर यांची डी. के. शिवकुमारांशी चर्चा

Omkar B

सोशल डिस्टन्स पाळत योग दिन साजरा

Patil_p
error: Content is protected !!